Pakistan finds rare treasure Antimony deposits in Balochistan gold mines discovered in Gilgit
इस्लामाबाद : आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात दुर्मिळ अँटिमनी धातूचा मोठा साठा सापडला असून, याशिवाय गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये सोने, तांबे, निकेल आणि कोबाल्टच्या खाणी आढळल्या आहेत. हे खनिज संपत्तीचे भांडार पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठी संधी ठरू शकते. परंतु, बलुचिस्तानमधील अस्थिर परिस्थितीमुळे या संसाधनांचे व्यावसायिक उत्खनन किती सहज होईल, हा प्रश्न अद्याप कायम आहे.
बलुचिस्तानमध्ये सापडलेला अँटिमनी हा एक दुर्मिळ आणि मौल्यवान धातू असून, त्याचा उपयोग मिश्रधातू, इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरी, लष्करी उपकरणे आणि सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादनामध्ये केला जातो. विशेषतः सेमीकंडक्टर आणि नाईट व्हिजन उपकरणांच्या निर्मितीसाठी अँटिमनीला मोठी मागणी आहे. त्यामुळे या शोधाने पाकिस्तानला जागतिक बाजारात एक नवीन स्थान मिळवून देण्याची संधी मिळू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : कोहिनूर हिरा भारताला परत मिळणार? ब्रिटनच्या ‘या’ महत्त्वपूर्ण निर्णयानंतर चर्चेला उधान
पाकिस्तान एक्स्प्रेस न्यूजच्या वृत्तानुसार, ऑइल अँड गॅस डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (OGDCL) आणि पाकिस्तान मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (PMDC) यांनी संयुक्त उपक्रमाद्वारे बलुचिस्तानमध्ये अँटिमनीचा शोध घेतला आहे. हे दोन्ही उद्योग 50-50% भागीदारीत उत्खनन प्रकल्प राबवणार आहेत. पाकिस्तान सरकारने या प्रकल्पाची अधिकृत घोषणा पाकिस्तान मिनरल्स इन्व्हेस्टमेंट फोरम 2025 मध्ये एप्रिल महिन्यात करण्याची शक्यता आहे.
बलुचिस्तानव्यतिरिक्त, गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये सुमारे 10 खनिज ब्लॉक शोधले गेले आहेत, जिथे सोने, तांबे, निकेल आणि कोबाल्टसारख्या मौल्यवान धातूंच्या उपस्थितीला पुष्टी मिळाली आहे. यामुळे पाकिस्तानच्या खाण उद्योगाला मोठी चालना मिळू शकते.
चिनिओट (पंजाब) मध्ये देखील उत्खनन वेगाने सुरू आहे, आणि OGDCL तसेच पाकिस्तानच्या खनिज विभागामध्ये या प्रकल्पांबाबत गंभीर चर्चा सुरू आहे. पाकिस्तान ओमानच्या अत्याधुनिक शुद्धीकरण सुविधांचा वापर करून अँटिमनी प्रक्रिया करण्याच्या शक्यता शोधत आहे, जेणेकरून या धातूला आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करता येईल.
पाकिस्तान सरकार खनिज क्षेत्राच्या विस्तारासाठी विविध योजना आखत आहे. OGDCL उच्च शिक्षण आयोग (HEC) आणि देशातील विद्यापीठांशी सहकार्य करत आहे, जेणेकरून देशांतर्गत तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ यांचा विकास करता येईल. बलुचिस्तानमधील अँटिमनी साठ्यांचे भूगर्भीय सर्वेक्षण आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने संपूर्ण विश्लेषण करण्याची तयारी सुरू आहे. या संशोधनामुळे पाकिस्तानच्या खाण उद्योगाला नवी दिशा मिळू शकते.
तथापि, बलुचिस्तानमध्ये सतत सुरू असलेल्या हिंसाचार आणि फुटीरतावादी हालचालींमुळे या खाणींवर नियंत्रण ठेवणे आणि उत्खनन करणे हे पाकिस्तानसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. बलुचिस्तानमधील फुटीरतावादी गट अनेक वर्षांपासून पाकिस्तानी सैन्याशी संघर्ष करत आहेत, त्यामुळे या क्षेत्रात स्थिरता निर्माण केल्याशिवाय मोठ्या प्रमाणावर खनिज उत्खनन करणे शक्य होणार नाही.
अनेक तज्ज्ञांचे मत आहे की, या खनिज संपत्तीचा योग्य प्रकारे वापर केल्यास पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होऊ शकतो. अरब देशांनी आपली नैसर्गिक संपत्ती (तेल आणि वायू) योग्य प्रकारे वापरून स्वतःला श्रीमंत राष्ट्रांमध्ये सामील केले आहे. मात्र, पाकिस्तानकडे अशा मोठ्या प्रकल्पांसाठी आवश्यक स्थिरता, व्यवस्थापन आणि गुंतवणूकदारांचा विश्वास याचा अभाव आहे.
जर पाकिस्तानने सुरक्षित आणि प्रभावी उत्खनन धोरण राबवले, परदेशी गुंतवणूक आकर्षित केली आणि खाण क्षेत्रासाठी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारले, तर याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा सकारात्मक प्रभाव पडू शकतो. मात्र, सध्या पाकिस्तान आर्थिक संकट, कर्जबाजारीपणा आणि अंतर्गत अस्थिरतेच्या समस्यांना सामोरे जात असल्याने या संधींचा पुरेपूर फायदा घेणे कठीण ठरू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : कोण आहे ‘हा’ मुलगा? ज्याने 3 आठवडे आधीच केली होती म्यानमारच्या भूकंपाची भविष्यवाणी
बलुचिस्तानमध्ये सापडलेला अँटिमनीचा साठा आणि गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये आढळलेल्या सोन्याच्या आणि इतर मौल्यवान धातूंच्या खाणी पाकिस्तानच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरू शकतात. योग्य नियोजन, गुंतवणूक आणि राजकीय स्थिरता मिळाल्यास पाकिस्तानची अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते. मात्र, बलुचिस्तानमधील अस्थिरतेमुळे या क्षेत्राचा पूर्णतः विकास करणे पाकिस्तानसाठी एक मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे पाकिस्तान अरब देशांप्रमाणे श्रीमंत होणार की या संपत्तीवर संघर्ष आणि भ्रष्टाचाराची सावली पडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.