
फोटो सौजन्य सोशल मीडिया
विशेष म्हणजे, मे २०२५ मधील भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षानंतर भारतात भेट देणारे ते पहिले पाकिस्तानी केंद्रीय मंत्री ठरले आहेत. यावेळी त्यांनी दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याबाबत आशावाद व्यक्त केला. ‘मला वाटते की आपले सर्व संबंध सुधारतील,’ असे विधान त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांबाबत नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
पाकिस्तानचे हवामान बदल आणि पर्यावरण समन्वय मंत्री मुसादिक मसूद मलिक हे २० नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत दाखल झाले. नवी दिल्लीतील पुराना किल्ला येथे २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या SCO सभ्यता संवाद परिषदेत ते पाकिस्तानच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत.
विमानतळावर पाकिस्तानच्या उच्चायोगातील प्रभारी अधिकारी साद वारैच यांनी त्यांचे स्वागत केले. मे २०२३ मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी गोव्यातील SCO बैठकीला हजेरी लावली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या मंत्र्याचा भारतातील हा पहिलाच दौरा आहे. त्यामुळे या भेटीला राजनैतिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Indonesia News : यूट्यूबची १९ हजारांहून अधिक चॅनेल्स हटवली; गुगलला इंडोनेशिया सरकारचा जाब
भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मुसादिक मलिक यांनी सकारात्मक उत्तर दिले. ‘मला वाटते की आपले सर्व संबंध सुधारतील. सध्या संपूर्ण प्रदेशात वेगाने बदल होत आहेत. जागतिक राजकारणाची समीकरणेही झपाट्याने बदलत आहेत,’ असे ते म्हणाले.
याशिवाय राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर व्यापक दृष्टिकोनातून चर्चा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. भारत, पाकिस्तान, रशिया, चीन आणि मध्य आशियातील देशांचे ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंध असल्याचेही त्यांनी नमूद केले. सभ्यता संवादाच्या माध्यमातून विविध देशांमध्ये परस्पर समजूतदारपणा वाढवण्याची ही चांगली संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
World News : ट्रम्प, जिनपिंग आणि पुतीन एकाच मंचावर; तीन महासत्तांच्या नेत्यांची ऐतिहासिक बैठक
मलिक यांच्या वक्तव्यामुळे संबंध सुधारण्याच्या चर्चेला वेग आला असला, तरी भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेबाबत त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. सीमापार दहशतवादाच्या मुद्द्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, ‘मी उद्या माझे निवेदन दिल्यानंतर यावर बरीच चर्चा होईल,’ असे त्यांनी सांगितले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिकच तणावपूर्ण झाले आहेत.
भारताने सातत्याने सीमापार दहशतवाद थांबवण्याची भूमिका मांडली आहे. त्यामुळे केवळ सांस्कृतिक संवादातून संबंध सुधारतील का, हा प्रश्न कायम आहे. दरम्यान, या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदीही संबोधित करणार आहेत. मात्र, भारत आणि पाकिस्तान यांच्यात स्वतंत्र द्विपक्षीय चर्चा होणार असल्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे मलिक यांच्या पुढील वक्तव्याकडे आणि परिषदेत होणाऱ्या चर्चांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.