Pakistani army claims to have killed 12 terrorists in drone attack on its own citizens
इस्लामाबाद: पाकिस्तानी सैन्याने आपल्याच देशातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात ड्रोन हल्ले केल्याचे वृत्त समोर आले आहे. या हल्ल्यांमध्ये नऊ पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानी सैन्याने मात्र हा दहशतवाद्यांवर केलेला हल्ला असून, यात 12 दहशतवादी देखील ठार झाल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी(29 मार्च) सकाळी दहशतवाद विरोधी अभियाना अंतर्गत हे हल्ले करण्यात आले. मरदान जिल्ह्यातील कटलांग या भागातील डोंगराळ भागात लपलेल्या दहशतवाद्यांना यात लक्ष्य करण्यात आले होते.
दहशतवादी निवासी भागात लपल्यामुळे हल्ल्यांमध्ये सामान्य नागरिकांचा देखील बळी गेल्याचे पाकिस्तानी सैन्याने म्हटले आहे. मृत नागरिकांमध्ये सात पुरूष आणि दोन महिलांचा समावेश आहे. या सर्वांचे मृतदेह मेडिकल कॉम्प्लेक्समध्ये नेण्यात आले आहेत. रेस्क्यू 1122 चे प्रवक्ते मोहम्मद अब्बास यांनी सांगितले, की मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेह अगदी छिन्न-विछिन्न अवस्थेत आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत नागरिक हे स्वात जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांचा दहशतवाद्यांशी कोणताही संबंध नव्हता.
हल्ल्यानंतर स्थानिकांनी नागरिकांच्या मृतदेहांना हायवेवर ठेऊन पाकिस्तीनी सैन्याचा विरोध करण्यास सुरूवात केली होती. मात्र, काही काळानंतर सैन्याने त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेत मृतदेह कॉम्प्लेक्समध्ये नेण्यास परवानगी दिली. रेस्क्यू सर्व्हिस 1122 हे मृतदेहांचे डीएनए परिक्षण करत आहेत.
दरम्यान, सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, या ऑपरेशनमध्ये 12 कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यातील मोहसीन बाकिर या दहशतवाद्यावर 7 दशलक्ष पाकिस्तानी रुपयांचे बक्षीस देखील होते. सशस्त्र दहशतवाद्यांबाबत मिळालेल्या एका गुप्त माहितीनुसार, हे अभियान राबवण्यात आले होते.
खैबर पख्तूनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री अली अमीन गंदापुर यांनी ही सामान्यांचा मृत्यू होणे ही दुःखद बाब असल्याचे म्हटले आहे. जखमी नागरिकांवर उपचार सुरू आहेत, तसेच भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करू असंही त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांचे सल्लागार बॅरिस्टर मोहम्मद अली सैफ यांनीदेखील या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. सरकार या कठीण परिस्थितीमध्ये मृतांच्या कुटुंबीयांसोबत उभे आहे, तसेच अशा अभियानांदरम्यान नागरिकांच्या सुरक्षेला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देत आहोत; असेही ते म्हणाले.