PM Modi vows India's support for Mauritius in development defense and education
पोर्ट लुईस : भारत आणि मॉरिशस यांच्यातील संबंध केवळ हिंदी महासागरापुरते मर्यादित नसून, समान सांस्कृतिक परंपरा आणि मूल्यांमुळेही दोन्ही देश एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मॉरिशस दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी मॉरिशसच्या विकास योजनांमध्ये भारताची महत्त्वपूर्ण भूमिका असेल, तसेच संरक्षण, शिक्षण आणि आरोग्य यासारख्या विविध क्षेत्रांत सहकार्य अधिक दृढ होईल, असे स्पष्ट केले.
मॉरिशससोबत भागीदारी अधिक मजबूत करण्यावर भर
पंतप्रधान मोदी यांनी मॉरिशसच्या पंतप्रधान नवीन चंद्र रामगुलाम यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, भारत आणि मॉरिशस हे केवळ भागीदार नाहीत, तर परस्पर सहानुभूती असलेले देश आहेत. गेल्या दहा वर्षांत दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये अनेक नवीन आयाम जोडले गेले आहेत आणि विकास सहकार्य तसेच क्षमता बांधणीच्या क्षेत्रात नवे विक्रम प्रस्थापित झाले आहेत. “नैसर्गिक आपत्ती असो किंवा कोविडसारखी जागतिक संकटे, भारत आणि मॉरिशस नेहमीच एकमेकांसोबत उभे राहिले आहेत. संरक्षण, शिक्षण, आरोग्य आणि अवकाश क्षेत्रात आपण खांद्याला खांदा लावून पुढे जात आहोत,” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीनबाहेर जन्म घेणार दलाई लामांचा उत्तराधिकारी; बीजिंगवर उभे ठाकले नवे संकट
सुरक्षित हिंदी महासागर – दोन्ही देशांची समान प्राथमिकता
हिंदी महासागरातील मुक्त आणि सुरक्षित सागरी क्षेत्र ही दोन्ही देशांची समान प्राथमिकता आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. ते म्हणाले, “संरक्षण सहकार्य आणि सागरी सुरक्षा ही आमच्या धोरणात्मक भागीदारीचा महत्त्वाचा भाग आहेत. मॉरिशसच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या सुरक्षेसाठी भारत पूर्ण सहकार्य देण्यास वचनबद्ध आहे. ग्लोबल साउथ, हिंद महासागर आणि आफ्रिका खंडातील स्थिरता आणि समृद्धीसाठी मॉरिशस आमचा एक महत्त्वाचा भागीदार आहे.”
मोदी यांनी पुढे स्पष्ट केले की, १० वर्षांपूर्वी मॉरिशसमध्ये ‘व्हिजन सागर’ म्हणजेच सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास या योजनेची पायाभरणी करण्यात आली होती. या भागातील स्थिरता आणि समृद्धीसाठी भारताने ‘सागर व्हिजन’ पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षण आणि नागरी सेवा क्षेत्रात सहकार्याचा विस्तार
भारत आणि मॉरिशस यांच्यातील परस्पर सहकार्य केवळ संरक्षण किंवा सागरी सुरक्षेपुरते मर्यादित नसून, दोन्ही देश आर्थिक आणि सामाजिक प्रगतीच्या मार्गावर एकमेकांचे साथीदार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली की, येत्या पाच वर्षांत मॉरिशसच्या ५०० नागरी सेवकांना भारतात विशेष प्रशिक्षण दिले जाईल. याशिवाय, दोन्ही देशांनी परस्पर व्यापारासाठी स्थानिक चलनाचा वापर करण्याच्या निर्णयावरही सहमती दर्शवली. हे पाऊल आर्थिक स्थैर्य वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरेल.
#WATCH | Port Louis | PM Modi says, “Be it the Global South, the Indian Ocean, or the African continent, Mauritius is our important partner. Ten years ago, the foundation stone of Vision SAGAR – ‘Security and Growth for All in the Region’ was laid here in Mauritius. We have come… pic.twitter.com/7WL536km8d
— ANI (@ANI) March 12, 2025
credit : social media
नवीन संसद भवनासाठी भारताचा महत्त्वपूर्ण सहभाग
पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान रामगुलाम यांनी मॉरिशसच्या संसदेची नवीन इमारत उभारण्यासाठी भारत सहकार्य करेल, असा महत्त्वाचा निर्णय घेतला. पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारतातील लोकशाहीच्या मूळ परंपरेतून मॉरिशसला ही भेट असेल. ‘मदर ऑफ डेमोक्रसी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताकडून मॉरिशसच्या लोकशाही संस्थांना बळकट करण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा असेल.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘जे करायचे ते करा…’ इराणचे ट्रम्प यांना रोखठोक उत्तर; महासत्ता अमेरिकेला आव्हान
भारत-मॉरिशस संबंधांचे नवे पर्व
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात भारत आणि मॉरिशस यांच्यातील भागीदारीला ‘वर्धित धोरणात्मक भागीदारी’ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. संरक्षण असो की शिक्षण, सागरी सुरक्षा असो की आरोग्यसेवा – भारत आणि मॉरिशस खऱ्या अर्थाने खांद्याला खांदा लावून उभे आहेत. या दौऱ्याद्वारे दोन्ही देशांचे संबंध आणखी दृढ होणार असून, हिंदी महासागर क्षेत्रातील शांतता, स्थैर्य आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यास मदत होणार आहे.