बांग्लादेशचे प्रमुख मोहम्मद युनूस यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; हिंदूंच्या सुरक्षेची दिली खात्री
राजधानी: बांग्लादेशमध्ये सत्तापालट झाल्यानंतर देखील काही भागात हिंसाचार सुरूच आहे. आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनाने तीव्र स्वरूप धारण केले आणि चक्क त्याकाळातील पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून जावे लागले आणि पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर तिथे सुरू झालेल्या हिंसाचारात हिंदू समाजातील लोकांवर देखील हल्ले होऊ लागले आहेत. यावर अनेक दिवसांपासून चिंता व्यक्त केली जात आहे. बांग्लादेशमध्ये सध्या अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनूस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरून बोलणे झाले आहे. बांग्लादेशमधील हिंदूंच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचे समजते आहे.
बांग्लादेशमध्ये सत्तापालट झाल्यानंतर त्या ठिकाणी हिंदू नागरिकांवर हल्ले होत आहेत. यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील चिंता व्यक्त केली होती. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहम्मद युनूस यांच्यात फोनवरून याबाबत चर्चा झाली आहे. हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत ही चर्चा झाली आहे. याबाबत मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट शेअर केली आहे. मोहम्मद युनूस यांनी बांग्लादेशातील हिंदूंच्या सुरक्षेचा विश्वास भारताला दिला आहे.
Received a telephone call from Professor Muhammad Yunus, @ChiefAdviserGoB. Exchanged views on the prevailing situation. Reiterated India's support for a democratic, stable, peaceful and progressive Bangladesh. He assured protection, safety and security of Hindus and all…
— Narendra Modi (@narendramodi) August 16, 2024
‘एक्स’ वरील पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”बांग्लादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांचा फोन आला. सद्य परिस्थितीवर आमची चर्चा झाली. प्रगतशील, शांतताप्रिय बांग्लादेशसाठी भारताने आपले समर्थन दिले. त्यांनी बांगलादेशातील हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची हमी दिली.” बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या ठिकाणी लष्कराच्या नेतृत्वातील अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले आहे. मोहम्मद युनूस हे त्या सरकारचे प्रमुख आहेत.
दरम्यान, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते काल महल येथील संघ कार्यालयात झेंडावंदन पार पडले. यावेळी मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, ”बांग्लादेशात राहणाऱ्या हिंदूंना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी त्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही आपली जवाबदारी आहे.”