Putin praised India as globally respected and key to solving world issues
India globally respected : भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना हार्दिक शुभेच्छा देत एक हृदयस्पर्शी संदेश पाठवला आहे. अमेरिकेसोबत वाढत्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी भारताबद्दल व्यक्त केलेले कौतुक जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरत आहे.
“भारताने सामाजिक-आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय प्रगती साधली आहे. तुमच्या देशाला जगभरात योग्य तो मान मिळतो आणि आंतरराष्ट्रीय अजेंडावरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर भारताची भूमिका निर्णायक ठरते.”
पुतिन यांनी भारत-रशिया संबंधांबाबत विशेष भर देत सांगितले की, दोन्ही देशांमधील “विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी” ही परस्पर विश्वास आणि परस्पर आदरावर आधारलेली आहे. या भागीदारीमुळे दोन्ही देश केवळ व्यापार आणि संरक्षण क्षेत्रातच नव्हे तर ऊर्जा, तंत्रज्ञान, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या इतर क्षेत्रांमध्येही मजबूतपणे जोडले गेले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ट्रम्पची ‘राजकीय कारकीर्द’ संपवू शकतात रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन; खळबळजनक व्हिडिओ आणि कागदपत्रे असल्याचा दावा
पुतिन यांनी स्पष्टपणे नमूद केले की, आजच्या बहुपक्षीय जगात भारताची भूमिका केवळ प्रादेशिक पातळीवर मर्यादित नसून जागतिक स्तरावर आहे. हवामान बदल, शाश्वत विकास, दहशतवादविरोध, अणु निरस्त्रीकरण यांसारख्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर भारताची मते आणि नेतृत्व महत्त्वाचे ठरते.
रशिया आणि अमेरिकेमध्ये युक्रेन युद्धासंदर्भात सुरू असलेल्या तणावाच्या काळात पुतिन यांचा हा संदेश राजनैतिक दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. विशेष म्हणजे, १५ ऑगस्ट रोजीच पुतिन अमेरिकेतील अलास्का येथे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. या भेटीत युक्रेन युद्धावर चर्चा होण्याची शक्यता आहे. अशा संवेदनशील काळात भारताबद्दल इतक्या सकारात्मक शब्दांत बोलणे हे भारताच्या जागतिक महत्त्वाचे स्पष्ट निदर्शक आहे.
भारत आणि रशिया यांची मैत्री शीतयुद्धाच्या काळापासूनच अढळ राहिली आहे. संरक्षण, अंतराळ संशोधन, अणुऊर्जा, तेल-गॅस पुरवठा, तसेच सांस्कृतिक देवाणघेवाण या अनेक क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांनी परस्परांना बळकटी दिली आहे. पुतिन यांचा संदेश या ऐतिहासिक नात्याला आणखी अधोरेखित करतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : गाझा ते सुदान… युद्धात महिलांचा शारीरिक छळ मोठ्या प्रमाणावर; संयुक्त राष्ट्रांनी सादर केला थरारक अहवाल
पुतिन यांच्या संदेशातून एक गोष्ट स्पष्ट होते भारताचा सन्मान हा फक्त आशियापुरता मर्यादित नसून, जगभरात आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणातील बदलत्या समीकरणांमध्ये भारताची भूमिका केवळ ‘तटस्थ’ नसून, ‘सक्रिय’ आणि ‘प्रभावी’ आहे. स्वातंत्र्यदिनाच्या या शुभेच्छा केवळ औपचारिकता नसून, भविष्यातील सहकार्य आणि विश्वासाचा दृढनिश्चय आहेत.