Russia to test nuclear missile 9M730 Burevestnik before Putin-Trump meet
9M730 Burevestnik : १५ ऑगस्ट २०२५ रोजी अलास्कामध्ये होणाऱ्या रशिया-अमेरिका शांतता चर्चेपूर्वी जागतिक राजकारणाला हादरा देणारी लष्करी हालचाल सुरू झाली आहे. रशियाने जगातील सर्वात वादग्रस्त आणि धोकादायक मानल्या जाणाऱ्या ९एम७३० ‘बुरेवेस्टनिक’ अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची तयारी सुरू केली आहे. ही हालचाल पुतिन आणि ट्रम्प यांच्या ऐतिहासिक बैठकीच्या काही दिवस आधी होत असल्याने भू-राजकीय तणावाला उधाण आले आहे.
अलास्कामध्ये होणारी पुतिन-ट्रम्प बैठक रशिया-युक्रेन युद्धाच्या शांततेसाठी महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, चर्चेपूर्वीच वातावरण तापले आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, “ही बैठक पुतिन यांनी स्वतः बोलावली कारण रशियाची अर्थव्यवस्था संकटात आहे.” या वक्तव्याने रशियात संताप पसरला असून, मॉस्कोने आपल्या लष्करी ताकदीचे प्रदर्शन सुरू केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-US Relations: भारत-अमेरिका संबंधांमध्ये निर्णायक क्षण? जागतिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोदी-ट्रम्प भेटीची शक्यता
९एम७३० ‘बुरेवेस्टनिक’ हे रशियाचे तथाकथित ‘अजिंक्य शस्त्र’ आहे. अणुऊर्जेवर चालणारे हे क्रूझ क्षेपणास्त्र अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असून, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात अचूक हल्ला करू शकते. त्यात मार्ग बदलण्याची क्षमता असल्याने ते रोखणे जवळपास अशक्य मानले जाते. अमेरिकेच्या संरक्षण विश्लेषकांच्या मते, हे क्षेपणास्त्र प्रत्यक्ष तैनात झाले तर रशियाला असा धोरणात्मक फायदा मिळेल, ज्यावर पाश्चात्य देशांना प्रत्युत्तर देणे कठीण जाईल.
रशियाने ७ ते १२ ऑगस्टदरम्यान ४०,००० चौरस किलोमीटर परिसरासाठी NOTAM (हवाई जवानांना सूचना) जारी केली आहे, जी सहसा मोठ्या क्षेपणास्त्र चाचण्यांपूर्वी केली जाते. यासोबतच, पंकोवो चाचणी रेंजजवळून चार रशियन जहाजे हटवून त्यांना बॅरेंट्स समुद्रातील पाळत चौक्यांवर तैनात करण्यात आले आहे. रोगाचेव्हो विमानतळावर रोसाटॉमची दोन विशेष विमाने सज्ज ठेवण्यात आली आहेत. मालवाहू जहाजांची हालचाल वाढवून रसद पुरवठ्याची मोठी तयारी सुरू आहे. नॉर्वेच्या द बॅरेंट्स ऑब्झर्व्हरनुसार, या ठिकाणी गेल्या काही आठवड्यांपासून चाचणीसाठी सज्जतेचे काम सुरू आहे.
जर ‘बुरेवेस्टनिक’ची चाचणी यशस्वी झाली, तर रशिया अणुऊर्जेवर चालणारे क्रूझ क्षेपणास्त्र असलेला जगातील पहिला देश ठरेल. यामुळे पाश्चात्य देशांच्या हवाई संरक्षण प्रणालींसाठी नवे आव्हान निर्माण होईल. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ही केवळ तांत्रिक चाचणी नाही, तर पुतिनकडून अमेरिकेला दिलेला एक स्पष्ट राजकीय संदेश आहे “रशिया आपल्या लष्करी क्षमतेशी कोणतीही तडजोड करणार नाही.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अजब शोध! पृथ्वीखाली दडलेल्या जीवसृष्टीचे सापडले पुरावे, चिनी- कॅनेडियन शास्त्रज्ञांचा अनोखा दावा
जगभरातील संरक्षण विश्लेषकांचे लक्ष आता १५ ऑगस्टच्या बैठकीकडे लागले आहे. या बैठकीपूर्वी होणारी क्षेपणास्त्र चाचणी ही रशियाची मानसिक दबावाची नीती मानली जाते. चर्चेच्या टेबलावर शांततेचे प्रस्ताव ठेवले जात असतानाच आकाशात अणुशक्तीच्या छायेतली सावली तरंगत राहणार आहे.