भारत-अमेरिका संबंधांमध्ये निर्णायक क्षण? करवाढीच्या पार्श्वभूमीवर मोदी-ट्रम्प भेटीची शक्यता, रशियन तेल व व्यापार वाद चर्चेच्या केंद्रस्थानी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
India-US Relations : भारत-अमेरिका संबंध नव्या वळणावर उभे आहेत. अमेरिकेच्या करवाढीच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये न्यू यॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी अमेरिकेला जाऊ शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार, या दौऱ्यात त्यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक होऊ शकते.
ही संभाव्य बैठक केवळ औपचारिक भेटीपुरती मर्यादित न राहता व्यापार, करवाढ आणि रशियन तेल खरेदीसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर निर्णायक ठरू शकते. गेल्या सात महिन्यांत ही दोन्ही नेत्यांची दुसरी भेट असू शकते. फेब्रुवारी २०२५ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी व्हाईट हाऊसला भेट दिली होती. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात दोघांमध्ये उबदार संबंध दिसून आले होते, मात्र दुसऱ्या कार्यकाळात करवाढ व व्यापार धोरणांमुळे तणाव वाढला आहे.
भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारावर अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू असली तरी शेती व दुग्धजन्य क्षेत्रात भारताची अनिच्छा हा मोठा अडथळा ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासनाने भारतीय उत्पादनांवर २५% करवाढ जाहीर केली असून, रशियन तेल खरेदीवर आणखी २५% कर लावला आहे. यामुळे एकूण कराचा बोजा ५०% पर्यंत पोहोचला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अजब शोध! पृथ्वीखाली दडलेल्या जीवसृष्टीचे सापडले पुरावे, चिनी- कॅनेडियन शास्त्रज्ञांचा अनोखा दावा
या करवाढीपैकी अर्धे कर ७ ऑगस्टपासून लागू झाले असून, उर्वरित कर २७ ऑगस्टपासून लागू होणार आहेत. अंतिम मुदतीपूर्वी उच्चस्तरीय बैठकीतून काही तोडगा निघावा, यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील आहेत. हा वाद केवळ व्यापारापुरता मर्यादित नसून, तो अमेरिकेच्या आर्थिक सुरक्षे आणि भारताच्या जागतिक व्यापार हितसंबंधांमधील संघर्षाचे प्रतीक बनला आहे.
युक्रेन युद्धादरम्यान भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी सुरू ठेवली, ही गोष्ट अमेरिकेसाठी चिंतेचा विषय आहे. व्हाईट हाऊसचे म्हणणे आहे की या उत्पन्नामुळे रशियाच्या युद्ध प्रयत्नांना चालना मिळत आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर आयात कमी करण्यासाठी दबाव टाकला असून, आर्थिक दबावामुळे रशियाला युद्ध संपवावे लागेल अशी त्यांची भूमिका आहे. भारताने या आरोपांना प्रत्युत्तर देताना अमेरिकेला ‘ढोंगी’ म्हटले आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी नमूद केले की, अमेरिकन कंपन्याच रशियाकडून युरेनियम, रसायने आणि खते खरेदी करत आहेत. यामुळे दोन्ही देशांतील राजनैतिक तणाव आणखी तीव्र झाला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : रशियानंतर ‘या’ देशातही भयानक भूकंप; रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.3, त्सुनामीचा धोका नाही
१५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीकडे भारताचे लक्ष लागले आहे. युक्रेन युद्ध संपवण्याच्या संभाव्य मार्गांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. भारतासाठी ही केवळ भू-राजकीय घडामोड नसून, आपल्या ऊर्जा आणि व्यापार धोरणांना नव्याने आकार देण्याची संधी आहे. पंतप्रधान मोदींचा अमेरिकेचा संभाव्य दौरा आणि ट्रम्प यांच्याशी होणारी भेट, भारत-अमेरिका संबंधांच्या भविष्यातील दिशेचा निर्णय घेऊ शकते. करवाढीच्या सावटाखाली होणारी ही चर्चा, जागतिक व्यापार समीकरणे व भू-राजकारणावर दूरगामी परिणाम घडवू शकते.