
फोटो सौजन्य AI
रशिया युक्रेन युद्धात रशियाने आणखी तीन गावांवर ताबा मिळवल्याचाही दावा केला आहे . रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार , रशियन सैन्याने युक्रेनच्या सुमी प्रदेशातील ख्रापिव्श्चिना गावावर नियंत्रण मिळवले आहे . सुमी प्रदेश हा रशिया युक्रेन सीमेच्या जवळ असल्याने गेल्या काही काळापासून येथे काही लष्करी हालचाली वाढल्या आहेत . रशियन सैन्याच्या या कथित प्रगतीमुळे युक्रेनच्या उत्तर भागातील संघर्ष आणखीन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे .
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने डोनेत्स्क प्रदेशातील नोव्होआंद्रियिव्का आणि रूबिझने या दोन गावावर ताबा मिळवल्याचे म्हंटले आहे . या तीनही ठिकाणांवरील रशियन नियंत्रणाच्या दाव्याची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही . डोनेत्स्क हा युद्धाच्या सुरवातीपासूनच रशिया आणि युक्रेन मधील संघर्षाचा प्रमुख केंद्रबिंदू राहिला आहे .
या भागात रशियन सैन्य सातत्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करत असून , युक्रेनकडूनही विविध भागांमध्ये प्रतिकार सुरु आहे . तीन गावांवर ताबा मिळवल्याचा रशियाचा दावा हा युद्धाच्या सध्याच्या स्थितीत महत्वाचा मानला जातोय . मात्र प्रत्यक्ष नियंत्रणाची स्थिती आणि जमिनीवरील लष्करी हालचाली स्वतंत्र माध्यमांकडून तपासणे महत्वाचे ठरणार आहे .
रशिया आणि युक्रेन मधील युद्ध पाचव्या वर्षात पोहचले असून दोन्ही देशाकडून हल्ले आणि प्रतिहल्ले तसेच लष्करी कारवाया सुरु आहेत . रशियाकडून युक्रेनच्या विविध भागांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले होत असताना , युक्रेनकडूनही रशियाच्या लष्करी आणि ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष केले जात आहे .
अशा परिस्थितीत रशियाने डोनेत्स्क आणि सुमी प्रदेशातील तीन गावांवर ताबा मिळवल्याचा केलेला दावा युद्धाच्या आघाडीवरील बदलांकडे लक्ष वेधणारा आहे . विशेषतः सुमी प्रदेशातील रशियन हालचाली वाढल्यास युक्रेनच्या उत्तर सीमेवरील सुरक्षा परिस्थितीवर त्याचा परिणाम होऊ शकतो . दरम्यान रशियाच्या या दाव्याला युक्रेनकडून काय प्रतिक्रिया दिली जाते . आणि या गावांवरील नियंत्रणाची प्रत्यक्ष स्थिती काय आहे . याकडे आता लक्ष लागले आहे .