Russia's biggest attack on Ukraine so far 597 drones and 26 deadly missiles fired
Russia Ukraine war 2025 : युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा कठोर चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. शुक्रवारी रात्री रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि धक्कादायक हवाई हल्ला केला. या हल्ल्यात 597 ड्रोन आणि 26 क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला. यातील बहुतांश ड्रोन हे इराणने बनवलेले ‘शाहेद’ प्रकाराचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी स्वतः ही माहिती दिली असून, त्यांनी जागतिक समुदायाला आवाहन केले की आता फक्त शब्दांपेक्षा कृती आवश्यक आहे. झेलेन्स्की म्हणाले, “रशियाच्या या युद्धवृत्तीला रोखण्यासाठी कठोर निर्बंध लावले गेले पाहिजेत. या युद्धात ड्रोन बनवणारे आणि रशियाच्या तेल विक्रीतून नफा कमावणारेही जबाबदार आहेत.”
रशियाकडून डागण्यात आलेल्या ड्रोनपैकी अर्ध्याहून अधिक ड्रोन हे ‘शाहेद’ प्रकारातील होते. हे ड्रोन इराणमध्ये तयार होतात आणि कमी खर्चात जास्त नुकसान करणारी क्षमता यामध्ये असते. त्यामुळेच रशिया या ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे. युक्रेनियन हवाई दलाच्या माहितीनुसार, त्यांनी 319 ड्रोन आणि 25 क्षेपणास्त्र यशस्वीरित्या पाडले. तरीही, 20 हून अधिक ड्रोन आणि एक क्षेपणास्त्र हे युक्रेनच्या विविध भागांवर आदळले. यामुळे पाच ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे, मात्र संरक्षण खात्याने नेमकी स्थाने उघड केली नाहीत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : दरवर्षी थोडं थोडं बुडतंय ‘हे’ विमानतळ, पण जगातलं सर्वोत्तम! जपानचं कान्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ धोक्यात
झेलेन्स्की यांनी पाश्चात्य देशांवर टीका करत स्पष्टपणे सांगितले की, “फक्त संकेत देऊन हे युद्ध थांबवता येणार नाही. आता रशियावर कडक आर्थिक आणि तांत्रिक निर्बंध लादण्याची गरज आहे.” ते पुढे म्हणाले, “जे देश रशियाला ड्रोन बनवण्यासाठी मदत करत आहेत किंवा रशियाच्या तेलातून कमाई करत आहेत, त्यांच्यावरही कठोर पावले उचलली गेली पाहिजेत. हेच उत्पन्न रशियाच्या युद्धाला पोसत आहे.”
झेलेन्स्कींच्या मते, रशियाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने तेल निर्यातीवर आधारित आहे. त्यातून मिळणारा निधी हा ड्रोन, क्षेपणास्त्रे, आणि इतर लष्करी सामग्री खरेदीसाठी वापरला जातो. त्यामुळे जर या तेल व्यापारावर आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्बंध घालण्यात आले, तर रशियाच्या युद्धयंत्रणेला मोठा धक्का बसेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Gaza Crisis 2025 : युद्धबंदीच्या आशा क्षीण! गाझामध्ये अन्न-पाण्याविना मृत्यूचे तांडव; 800हून अधिक बळी
हा हल्ला केवळ एका रात्रीचा नसून युक्रेनमध्ये सुरू असलेल्या दैनंदिन भीतीचे, विनाशाचे आणि असहायतेचे चित्र आहे. युक्रेनच्या नागरिकांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे देशाची स्थिती गंभीर होत चालली आहे. शेवटी, झेलेन्स्की म्हणाले की, “जगाने आता थांबण्याची भाषा नव्हे तर थांबवण्याची कृती करावी. जोपर्यंत ड्रोन तयार करणाऱ्यांवर, विक्रेत्यांवर, आणि आर्थिक पाठबळ देणाऱ्यांवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत रशियाचे हे हल्ले थांबणार नाहीत.”