
shakib al hasan house petrol bomb attack magura bangladesh marathi news
बांगलादेश (Bangladesh) क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि जागतिक दर्जाचा महान अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनच्या (Shakib Al Hasan) मागुरा जिल्ह्यातील पैतृक घरावर बुधवारी रात्री काही अज्ञात समाजकंटकांनी हिंसक हल्ला केला. या घटनेत हल्लेखोरांनी घराच्या खिडक्यांच्या काचा फोडून थेट घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे मागुरा परिसरात प्रचंड भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री पावणे नऊच्या (८:४५) सुमारास मागुरा शहरातील केशनपूर भागातील शकिबच्या घरावर घडली. हल्लेखोरांनी घरावर मोठ्या प्रमाणात दगड आणि विटा फेकल्या. स्थानिक माध्यमांनी आणि आवामी लीग पक्षाने असा दावा केला आहे की हल्लेखोरांनी घरावर पेट्रोल बॉम्बदेखील फेकले, ज्यामुळे घराच्या काही भागात आगीचे गोळे दिसले. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून त्यावेळी घरात कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sahara: सहारा वाळवंटात पुन्हा वाहणार नद्या? शास्त्रज्ञांनी शोधले 20,000 वर्षांचे रहस्य; वाळूच्या ढिगाऱ्यांखाली दडलंय साम्राज्य
हा हल्ला सहजासहजी झालेला नसून यामागे राजकीय संदर्भ असल्याचा तीव्र संशय व्यक्त केला जात आहे. बांगलादेशातील तत्कालीन सत्तापालट आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे शकिब आधीच वादात सापडला होता. बुधवारी नवी दिल्लीतील ‘फॉरेन करस्पॉन्डंट्स क्लब ऑफ साऊथ एशिया’तर्फे आयोजित एका व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत शेख हसीना यांनी भाषण केले. या कार्यक्रमात शकिब अल हसननेही व्हर्च्युअली सहभाग घेतला होता. या पत्रकार परिषदेत सहभागी झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्याच्या घरावर हा भीषण हल्ला घडवून आणण्यात आला.
After Bangladesh’s ex-PM Sheikh Hasina held a press conference, people threw a petrol bomb at cricket star Shakib Al Hasan’s house and damaged it. pic.twitter.com/kB20i1sPXy — Ankit (@Extreo_) August 6, 2026
credit – social media and Twitter
पत्रकार परिषदेत बोलताना शेख हसीना यांनी जुलै-ऑगस्ट २०२४ च्या विद्यार्थी आंदोलनावर टीका केली होती आणि हे आंदोलन उत्स्फूर्त नसून सरकार पाडण्यासाठी आखलेला एक सुनियोजित कट होता, असा दावा केला. या कार्यक्रमानंतर बांगलादेश नॅशनल पार्टी (BNP), जमात-ए-इस्लामी आणि नॅशनल सिटिझन्स पार्टी (NCP) सारख्या प्रमुख विरोधी पक्षांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. आवामी लीगने दावा केला आहे की हा हल्ला विरोधी पक्षांकडून राजकीय सूडबुद्धीने केला गेला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Cesar Gastelum: लाईव्हस्ट्रीम बनले मृत्यूचे साक्षीदार; मेक्सिकोमध्ये एका इन्फ्लुएन्सरची जाहीरपणे गोळ्या घालून हत्या, VIDEO
मागुरा सदर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अब्दुल्ला अल मामून यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून शकिबच्या घराभोवती अतिरिक्त सुरक्षा पोलीस तैनात करण्यात आले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे, जेणेकरून हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करता येईल.
ऑगस्ट २०२४ मध्ये सत्तापालट झाल्यापासून शकिब अल हसन बांगलादेशमध्ये परतलेला नाही. त्याच्यावर खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शकिब सध्या आपल्या कुटुंबासह अमेरिकेत राहत असून तो जगभरातील विविध टी-२० फ्रँचायझी क्रिकेट लीगमध्ये (जसे की LPL, CPL) खेळत आहे. शकिबने स्पष्ट केले आहे की, जर त्याला आणि त्याच्या कुटुंबाला योग्य सुरक्षेची हमी मिळाली तरच तो बांगलादेशात परत येऊन कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाईल.