Spain Train Crash : स्पेनमध्ये रेल्वे अपघातानंतर हिंसक आंदोलन; पंतप्रधानांसह परिवहन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, सौजन्य : आयएएनएस
स्पेनमध्ये दोन हायस्पीड रेल्वेगाड्यांच्या (Spain Train Crash) भीषण अपघातात 68 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तानंतर सरकारविरोधातील संताप उफाळून आला आहे. माद्रिदमध्ये बुधवारी रात्री शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आंदोलकांनी पोलिसांवर बाटल्या आणि फटाके फेकले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला आणि जमावाला पांगवले.
स्पॅनिश वृत्तसंस्था ईएफईच्या वृत्तानुसार, माद्रिदमध्ये एक हजारांहून अधिक नागरिकांनी सरकारविरोधी आंदोलन केले. उजव्या विचारसरणीच्या संघटनांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात रेल्वे सुरक्षेची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलकांनी पंतप्रधान पेद्रो सांचेझ आणि परिवहन मंत्री ऑस्कर पुएंते यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काही आंदोलकांनी परिवहन मंत्र्यांविरोधात तीव्र घोषणाबाजीही केली.
या आंदोलनाचे आयोजन दक्षिणपंथी ‘फालांज’ पक्ष आणि ‘रेवुएल्टा’ सारख्या संघटनांनी केले होते. तसेच ‘वॉक्स’शी संबंधित ‘सोलिदारिदाद’ या संघटनेने स्वतंत्र आंदोलन केले.
काही आंदोलकांनी पोलिसांचे सुरक्षा कडे तोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर तणाव वाढला. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रुधुराचे गोळे सोडले. त्यानंतर संतप्त आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने रिकाम्या बाटल्या आणि फटाके फेकले. अखेर पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून जमावाला पांगवले.
माद्रिदच्या दक्षिणेला उर्डा शहराजवळ बुधवारी सकाळी हा भीषण रेल्वे अपघात झाला. स्पेनच्या सरकारी प्रसारक आरटीव्हीईच्या वृत्तानुसार, सरकारी रेल्वे कंपनी रेनफेची एक रेल्वेगाडी खासगी कंपनी इर्योच्या रुळांवर उभ्या असलेल्या गाडीला धडकली. या दुर्घटनेत 68 जणांचा मृत्यू झाला, तर 180 हून अधिक जण जखमी झाले.
हायस्पीड रेल्वेगाड्या ताशी 200 किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने धावत असल्याने या अपघाताची तीव्रता मोठी होती. प्राथमिक वृत्तांनुसार, रेल्वे सुरक्षा यंत्रणेत बिघाड झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर नियंत्रण केंद्राने एका गाडीला पुन्हा प्रवास सुरू करण्याची परवानगी दिल्याने दुर्घटना घडल्याचे वृत्त आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होईल.
स्पेनमध्ये यापूर्वी जानेवारी महिन्यात अडामूजजवळ रेल्वे अपघात झाला होता. त्या दुर्घटनेत 46 जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर ताज्या अपघातानंतर रेल्वे सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अपघाताची जबाबदारी निश्चित करून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.
Ans: माद्रिदच्या दक्षिणेला उर्डा शहराजवळ बुधवारी सकाळी रेल्वे अपघात झाला.
Ans: अपघातात 68 जणांचा मृत्यू झाला, तर 180 हून अधिक जण जखमी झाले.
Ans: रेल्वे अपघातानंतर रेल्वे सुरक्षेतील संभाव्य त्रुटी आणि जबाबदारी निश्चित करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलन केले.






