Stones hurled at Hanuman Jayanti procession in Birganj Nepal curfew imposed
काठमांडू/बीरगंज : नेपाळमधील बीरगंज शहरात शनिवारी हनुमान जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान अचानक दगडफेकीची घटना घडली असून, त्यामुळे शहरातील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. या घटनेनंतर नेपाळ प्रशासनाने संपूर्ण बीरगंज शहरात कर्फ्यू लागू केला असून, पोलीस आणि सुरक्षा दलांनी शहरात तातडीने कडक बंदोबस्त तैनात केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, बीरगंज शहरातील छपाकिया परिसरात मिरवणूक जात असताना मदरशाच्या छतावरून काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मिरवणुकीत सहभागी असलेल्या पोलिस आणि भाविकांपैकी सुमारे डझनभर जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात अफरातफर उडाली आणि तणावाची स्थिती निर्माण झाली.
घटनेनंतर तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधूराचा वापर केला. परंतु, जमावाने माघार घेण्यास नकार दिल्याने हुल्लडखोरांनी दुकानांना आणि दुचाकींना आग लावल्याची माहिती आहे. परिणामी, तणाव अधिक वाढला. यामुळे परसा जिल्हाधिकारी गणेश अर्याल यांनी संपूर्ण बीरगंज शहरात कर्फ्यू लागू केला असून, हा कर्फ्यू उद्या (रविवार) दुपारी १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. बीरगंज शहरासह आसपासच्या परिसरात पोलीस छावणीचे स्वरूप धारण करण्यात आले असून, पोलीस विविध ठिकाणी गस्त घालत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानच्या घशाला कोरड; शेरी रहमान यांचा शाहबाज सरकारवर जोरदार हल्लाबोल
भारत-नेपाळ सीमेवरील रक्सौल गेटवरील वाहतूक पूर्णतः थांबवण्यात आली आहे. येथील शंकराचार्य गेटजवळ नेपाळ सशस्त्र दलाची तैनाती करण्यात आली आहे. रक्सौलच्या उपविभागीय अधिकारी (SDO) शिवक्षी दीक्षित स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. नागरिकांना सीमेवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
बीरगंजचे पोलीस अधीक्षक (SP) गौतम मिश्रा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “घटनेची सखोल चौकशी सुरू आहे आणि दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.” दरम्यान, शहरातील धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर पावले उचलण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून आणि धार्मिक संघटनांकडून करण्यात येत आहे.
या घटनेवर विश्व हिंदू परिषद आणि इतर धार्मिक संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस जितेंद्र सिंह यांनी या घटनेचा तीव्र निषेध करताना सांगितले की, “ही घटना सामाजिक सौहार्द बिघडवणारी आहे. प्रशासनाने दोषींना तात्काळ अटक न केल्यास उद्या संपूर्ण बीरगंज शहर बंद ठेवण्यात येईल.” त्याचबरोबर त्यांनी सर्व हिंदू संघटनांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : लालमोनिरहाट एअरफील्डवर चीनची नजर; भारतासाठी धोरणात्मक इशारा, सुरक्षा यंत्रणा सतर्क
नेपाळमधील बीरगंज शहरात हनुमान जयंतीच्या दिवशी घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. धार्मिक मिरवणुकीवर झालेल्या हल्ल्यामुळे सामाजिक सलोखा धोक्यात आल्याची चिन्हे दिसत आहेत. प्रशासनावर आता दोन्ही समाजांमध्ये शांतता आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचे मोठे आव्हान आहे. घटनास्थळी सुरक्षा दलांचे तैनातीसह शहरात तणावपूर्ण शांतता आहे. नागरिकांनी शांतता आणि संयम बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.