सिंधू नदी कोरडी पडत असल्याने पाकिस्तानमध्ये जलसंकट, शेरी रहमान यांचा शाहबाज सरकारवर जोरदार हल्ला ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये वाढत्या जलसंकटावरून राजकीय वातावरण तापले आहे. पाकिस्तानच्या वरिष्ठ महिला खासदार आणि माजी हवामान बदल मंत्री शेरी रहमान यांनी सिंधू नदीतील पाण्याच्या पातळीत झालेल्या भीषण घटेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी थेट पंतप्रधान शाहबाज शरीफ सरकारवर निशाणा साधत, झोपलेल्या सरकारला जागं करण्याची गरज असल्याचे स्पष्टपणे सांगितले. सिनेटमध्ये बोलताना सिनेटर शेरी रहमान म्हणाल्या, “सिंधू नदी आपल्या डोळ्यांसमोर कोरडी पडत आहे. ही वेळ आरोप-प्रत्यारोपांची नाही, तर एकत्रित उपाययोजनांची आहे. जर सरकार आता जागं नाही झालं, तर भविष्यात पाकिस्तानला अत्यंत गंभीर पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.”
शेरी रहमान यांनी निदर्शनास आणले की सिंधू नदीतील पाण्याची पातळी सध्या गेल्या 100 वर्षांतील सर्वात नीचांकी स्तरावर पोहोचली आहे. सिंधू नदी ही पाकिस्तानच्या शेती, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि पर्यावरणीय समतोलासाठी अत्यंत आवश्यक आहे. पण अलीकडील काळात हवामान बदल, पावसाच्या कमतरतेमुळे आणि चुकीच्या जलव्यवस्थापनामुळे नदी कोरडी पडत चालली आहे.
सुक्कुर बॅरेजवरील पाण्याच्या पातळीत 71 टक्के घट झाली असून, एकूण तीनही बॅरेजमधील पाणीपुरवठा ६५ टक्क्यांनी कमी झाला आहे. ही आकडेवारी धक्कादायक असून, जलस्रोत वाचवण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई न झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताने डाव टाकला, बांगलादेशची केली गळचेपी; आर्थिक नुकसान अनिवार्य
शेरी रहमान यांनी सरकारवर टीका करत सांगितले की, “पाणी संकट इतकं तीव्र असताना देखील सिंधू नदीतील पाणी कालव्यांत वळवण्याचे काम सुरूच आहे. जलस्रोतांचा नाश होत असताना सरकार नुसतं बघ्याची भूमिका घेत आहे.” त्यांनी असेही स्पष्ट केले की पाण्याच्या हक्कावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. “पीपीपी पक्ष नेहमी लोकांच्या मूलभूत हक्कांसाठी उभा राहिला आहे आणि या जलसंपत्तीवर सर्वांचा हक्क आहे. आम्ही पाणी अधिकाराच्या लढ्यात कोणतीही माघार घेणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
सिनेटच्या हवामान बदल आणि पर्यावरणविषयक स्थायी समितीच्या प्रमुख म्हणून रहमान यांनी पाणीटंचाईला “राष्ट्रीय हवामान आणीबाणी” म्हणून जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना तातडीने सीसीआय (Council of Common Interests) ची बैठक बोलावण्याचे आवाहन केले, जेणेकरून प्रांत आणि केंद्र सरकार यांच्यात समन्वय साधता येईल. “जर आता एकत्रित आणि निर्णायक कृती केली नाही, तर पाकिस्तान भविष्यात पिण्याच्या पाण्याविना तग धरू शकणार नाही. हे संकट राजकारणापलीकडे गेले आहे आणि यावर राष्ट्रीय पातळीवर निर्णय घ्यावा लागेल,” असे शेवटी त्यांनी बजावले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जपानी दणक्याने ट्रम्पची तंतरली; बाँडची विक्री सुरू झाल्याचे कळताच टॅरिफच्या अंमलबजावणीला ब्रेक
पाकिस्तानमधील सिंधू नदी कोरडी पडण्याच्या संकटामुळे संपूर्ण देशात चिंता वाढली आहे. शेरी रहमान यांचे वक्तव्य हे शाहबाज सरकारसाठी एक गंभीर इशारा असून, आता सरकारने जर पावले उचलली नाहीत, तर जलसंकट भयानक स्वरूप धारण करू शकते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून, देशाच्या भविष्यासाठी सर्वपक्षीय, सर्वस्तरीय आणि तातडीच्या कृतीची गरज आहे, हे या परिस्थितीतून स्पष्ट होते.