
taiwan war drills president lai ching te bunker bulletproof armored vehicle han kuang marathi news
पूर्व आशियामध्ये युद्धाचे ढग अधिकच गडद होत चालले आहेत. चीनकडून (China) मिळणाऱ्या सातत्यपूर्ण लष्करी धमक्या आणि संभाव्य आक्रमणाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी तैवानने आपल्या राष्ट्रीय सुरक्षेची तयारी अभूतपूर्व पातळीवर नेली आहे. तैवानच्या वार्षिक ‘हान कुआंग’ (Han Kuang) या सर्वात मोठ्या लष्करी सरावाचा भाग म्हणून एक अत्यंत नाट्यमय आणि महत्त्वपूर्ण प्रात्यक्षिक पार पडले. चीनकडून युद्ध सुरू झाल्यास सर्वात आधी तैवानच्या सर्वोच्च नेतृत्वाला लक्ष्य केले जाऊ शकते, या भीतीपोटी तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाई चिंग-ते (Lai Ching-te) यांना तातडीने एका सुरक्षित बुलेटप्रूफ आर्मर्ड वाहनातून गुप्त कमांड सेंटर म्हणजेच बंकरमध्ये हलवण्यात आले.
या विशेष सरावादरम्यान राजधानी तैपेईमध्ये अचानक धोकादर्शक सायरन वाजवण्यात आले. सायरन वाजताच सुरक्षा यंत्रणा तात्काळ सक्रिय झाल्या. राष्ट्राध्यक्ष लाई चिंग-ते यांनी स्वतः जड संरक्षक जॅकेट (Bulletproof Vest) आणि लष्करी हेल्मेट परिधान केले होते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शत्रूला चकवा देण्यासाठी राष्ट्राध्यक्ष कार्यालयातून एकाच वेळी तीन वेगवेगळे ताफे बाहेर काढण्यात आले. यातील एका विशेष चिलखती वाहनातून (Clouded Leopard Armored Carrier) राष्ट्राध्यक्षांना अत्यंत गोपनीय पद्धतीने दाझी परिसरातील डोंगराळ भागात असलेल्या ‘नॅशनल पोलिटिकल अँड मिलिटरी ऑपरेशन्स कमांड सेंटर’ या भुयारी बंकरमध्ये पोहोचवण्यात आले.
युद्ध किंवा आणीबाणीच्या प्रसंगात तैवानच्या शीर्ष नेतृत्वाला सुरक्षितस्थळी हलवण्याच्या या विशेष मोहिमेला ‘वान चुन’ (Wan Chun Plan) असे नाव देण्यात आले आहे. शीतयुद्धाच्या काळापासून चालत आलेल्या या रणनीतीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे, जरी चीनने तैवानवर क्षेपणास्त्र हल्ला केला किंवा सैनिकांची तुकडी पाठवून राष्ट्रपतींवर थेट हल्ला करण्याचा ‘डीकॅपिटेशन’ (Decapitation Strike) म्हणजेच ‘शिरच्छेद’ प्रयत्न केला, तरीही तैवानचे सरकार आणि लष्करी कमांड सिस्टीम एका क्षणासाठीही बंद पडू नये.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran Tension: ट्रम्प यांनी दुसऱ्या महायुद्धासारखा भीषण हल्ला का रोखला? इराणच्या ‘अशा’ एका कॉलमुळे टळले महायुद्ध
राष्ट्राध्यक्ष लाई चिंग-ते यांनी या सरावानंतर स्वतः सोशल मीडियावर काही छायाचित्रे प्रसिद्ध केली. या फोटोंमध्ये ते लष्करी गणवेशात, हेल्मेट आणि बुलेटप्रूफ जॅकेट घालून गुप्त बंकरमधील डिजिटल स्क्रीनवर देशाच्या सुरक्षेचा आणि लष्करी हालचालींचा आढावा घेताना दिसत आहेत. “युद्धकाळात सर्व नागरी आणि लष्करी विभागांमध्ये अखंड समन्वय राखणे आणि देश चालवणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे,” असे स्पष्टीकरण राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे.
Taiwan President Lai Ching-te made a late-night dash in the back of an armoured personnel carrier to a command centre as part of annual war games designed to show how the government would continue to work in the event of a war. Taiwan kicked off the Han Kuang exercises on… pic.twitter.com/MA0MqVqSOb — Mintel World (@mintelworld) August 6, 2026
credit – social media and Twitter
१० दिवस चालणाऱ्या या महाकाय ‘हान कुआंग’ सरावात संपूर्ण तैवानमधून २०,००० हून अधिक राखीव सैनिकांना (Reserve Soldiers) तातडीने सैन्यात पाचारण करण्यात आले आहे. तैवानच्या चारी बाजूंनी समुद्रातून होणाऱ्या आक्रमणाला रोखण्यासाठी तैपेई बंदर, आशुई नदीचा परिसर आणि मुख्य समुद्रकिनाऱ्यांवर अडथळे उभारण्यात आले आहेत. शत्रूची जहाजे रोखण्यासाठी समुद्रात सुरुंग (Naval Mines) पेरण्याचे आणि तटरक्षक दलाच्या (Coast Guard) क्षेपणास्त्र सज्ज जहाजांची चाचणी घेण्याचे प्रात्यक्षिकही यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.
या सरावात केवळ पारंपारिक युद्धाचीच तयारी केली जात नसून, चीनकडून होणाऱ्या संभाव्य सायबर हल्ल्यांचा (Cyber Attacks) सामना कसा करावा, दळणवळण यंत्रणा ठप्प झाल्यावर सॅटेलाइट नेटवर्क कसे वापरावे आणि नागरी भागातील विमानतळे व मेट्रो स्थानकांचा लष्करी तळ म्हणून कसा वापर करावा, याचेही खडतर प्रशिक्षण दिले जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Imran Khan Release: 27 सप्टेंबरला इस्लामाबादला घेराव; इम्रान खान यांच्यासाठी PTIचा पाकिस्तानात आरपारच्या संघर्षाचा इशारा
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि चिनी कम्युनिस्ट पक्ष नेहमीच तैवान हा चीनचाच अविभाज्य भाग असल्याचा दावा करतात. आवश्यक पडल्यास लष्करी बळाचा वापर करून तैवानवर ताबा मिळवू, अशी उघड धमकी चीनकडून वेळोवेळी दिली जाते. अलीकडच्या काळात चिनी सैन्याने (PLA) तैवानच्या राष्ट्रपती भवन आणि लष्करी तळांच्या हुबेहूब प्रतिकृती (Mock-ups) वाळवंटात उभारून त्यावर हल्ल्याचा सराव केल्याचे अहवाल समोर आले होते.
परंतु, तैवानच्या लोकशाही सरकारने चीनचे हे सर्व दावे आणि धमक्या पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष लाई चिंग-ते यांनी स्पष्ट शब्दांत जगाला सांगितले की, “तैवान हा एक स्वतंत्र आणि लोकशाही देश आहे. तैवानचे भवितव्य काय असेल, हे ठरवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त येथील २ कोटी ३० लाख नागरिकांनाच आहे. कोणत्याही परकीय आक्रमणासमोर तैवान कधीही झुकणार नाही.” या युद्ध सरावामुळे तैवान सामुद्रधुनीतील (Taiwan Strait) भू-राजकीय तणाव अधिकच ताणला गेला असून, संपूर्ण जगाचे लक्ष या भागातील हालचालींकडे लागले आहे.