Taliban seizes Torkham border as Pakistani army withdraws
इस्लामाबाद/काबूल – अफगाणिस्तान आणि पाकिस्तानदरम्यान तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून तालिबानने पाकिस्तानच्या तोरखाम सीमेवर कब्जा केल्याचा दावा केला आहे. तालिबानच्या लढवय्यांनी सोमवारी (3 मार्च 2025) जोरदार चकमकीनंतर पाकिस्तानी लष्कराला माघार घेण्यास भाग पाडले. गेल्या अनेक आठवड्यांपासून या सीमेवर दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू होता, जो आता अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.
तणाव का वाढला?
तोरखाम हा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानदरम्यानचा एक महत्त्वाची सीमा चौकी आहे. या सीमेमुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि दैनंदिन गरजा भागवल्या जातात. मात्र, पाकिस्तानने काही आठवड्यांपूर्वी हा मार्ग बंद केला होता, ज्यामुळे तालिबान आणि पाकिस्तानी सैन्यामध्ये संघर्षाला तोंड फुटले. तालिबानने तोरखाम सीमेच्या जवळ नवीन चौकी आणि बंकर उभारण्यास सुरुवात केली होती. पाकिस्तानने याला आक्षेप घेतला आणि हे आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन असल्याचा दावा केला. याच कारणामुळे वाद अधिक चिघळला आणि सीमेवर सतत चकमकी होऊ लागल्या.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ऑस्कर ट्रॉफी विकली जाणार कवडीमोल भावात; लाखोंच्या सोन्याच्या ट्रॉफीची विक्री फक्त 87 रुपये
तालिबानने सीमेवर कब्जा केल्याचा दावा
एका वृत्तवाहिनीच्या अहवालानुसार, सोमवारी तोरखाम सीमेवर झालेल्या संघर्षात तालिबानच्या लढवय्यांनी जोरदार हल्ला चढवला. सुरुवातीला दोन्ही बाजूंनी हलक्या शस्त्रांचा वापर करण्यात आला. मात्र, हळूहळू हे युद्ध अधिक भडकले आणि दोन्ही सैन्यांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रांचा वापर केला. तालिबानने सांगितले की, या संघर्षात पाकिस्तानी सैनिक मोठ्या प्रमाणात जखमी झाले आणि त्यांनी माघार घेतली. तालिबानी सैन्याने संपूर्ण सीमा चौकीवर ताबा मिळवला आणि आता हा भाग त्यांच्या नियंत्रणाखाली असल्याचा दावा केला जात आहे.
पाकिस्तानची प्रतिक्रीया आणि तोरखाम सीमेचे महत्त्व
तोरखाम सीमा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानसाठी अतिशय महत्त्वाची आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर व्यापार आणि प्रवासी वाहतूक होते. मात्र, संघर्षामुळे पाकिस्तानला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सांगितले की, तालिबानकडून सीमेवरील करारांचे उल्लंघन होत आहे आणि त्यांनी अनधिकृत चौक्या उभारल्या आहेत. पाकिस्तानच्या लष्कराने हा मार्ग बंद केल्याने दोन्ही देशांतील व्यापारावर गंभीर परिणाम झाला आहे. व्यापारासाठी वापरण्यात येणारी वाहने आणि मालवाहू ट्रक परत पाठवण्यात आले आहेत.
तालिबानचा आरोप – पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठबळ देतो
तालिबानने पाकिस्तानवर गंभीर आरोप केले आहेत. तालिबानच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले की, पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी दहशतवाद्यांना पाठबळ देत आहे. त्यामुळे ते सीमेवरील नियंत्रण मजबूत करत आहेत. विशेष म्हणजे, पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील संबंध आधीपासूनच तणावपूर्ण राहिले आहेत. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार स्थापन झाल्यापासून पाकिस्तानवर दहशतवाद्यांना शरण देण्याचे आरोप होत आहेत. अशा परिस्थितीत तोरखाम सीमेवरील संघर्ष दोन्ही देशांतील संबंध अधिकच बिघडवू शकतो.
संघर्षामुळे व्यापारी आणि सामान्य नागरिक संकटात
या संघर्षाचा फटका केवळ लष्करी पातळीवरच नाही, तर सामान्य नागरिकांनाही बसला आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याशिवाय, सीमेवर प्रवास करणाऱ्या नागरिकांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : कोरियाच्या नव्या पराक्रमाने जग झाले थक्क; नदीवर धावणाऱ्या बसचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
पुढे काय?
तोरखाम सीमेवरील हा संघर्ष दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढवू शकतो. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवर तालिबानच्या या कारवाईविरोधात आवाज उठवण्याची शक्यता आहे. तसेच, दोन्ही देशांमध्ये लवकरच उच्चस्तरीय चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, तालिबान आणि पाकिस्तान यांच्यातील हा संघर्ष पुढील काही दिवसांमध्ये कोणत्या वळणावर जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.