'प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचा आदर केला पाहिजे'; BRICS परिषदेत एस. जयशंकर यांचे वक्तव्य
कझान: 16 वी BRICS परिषद आज रशियातील कझान येथे पार पाडत आहे. या परिषदेदरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाच्या सन्मानाचा मुद्दा अधोरेखित केला. याबाबत त्यांनी BRICS म्हटले आहे की, राष्ट्रांसमोर असलेल्या सुरक्षेच्या आव्हानांवर भर दिला पाहिजे तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये आवश्यक सुधारणांची गरज देकील त्यांनी अधोरेखित केली.
जागतिक संस्थांमध्ये सुधारणांची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) सारख्या जागतिक संस्थांमध्ये सुधारणांची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ही प्रक्रिया कालबाह्य झालेली आहे. भारताने या सुधारणांचा मुद्दा अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवर सातत्याने मांडला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अधिक न्याय्य आणि समतोल जागतिक व्यवस्थेची निर्मिती करण्यासाठी प्रस्थापित आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये व्यापक सुधारणांची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.
जागतिक स्तरावर आर्थिक सुधारणांसाठी BRICS योगदान करू शकते
BRICS देशांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा उल्लेख करताना जयशंकर यांनी जागतिक दक्षिणेसाठी या मंचाने अधिक प्रभावी भूमिका बजावण्याचे आवाहन केले. जयशंकर यांनी म्हटले आहे की, विविध क्षेत्रांमध्ये स्वतंत्र व्यासपीठांचे विस्तार आणि अनावश्यक अवलंबित्व कमी करून जागतिक स्तरावर आर्थिक सुधारणांसाठी BRICS योगदान करू शकते. तसेच, बहुपक्षीय विकास बँकांमध्ये सुधारणांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Represented PM @narendramodi at the BRICS Outreach session in Kazan today.
As the old order changes while inequities of the past continues, BRICS is a statement in itself and can make real difference. In this context, highlighted 5 key points:
1️⃣ Strengthening and expanding… pic.twitter.com/t0HhxTvuPe
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) October 24, 2024
जयशंकर यांनी भारताच्या G-20 अध्यक्षतेचा दाखला देत सुधारणा पुढे नेण्याची प्रक्रिया कशी सुरु झाली याचे उदाहरण दिले. त्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेचे लोकशाहीकरण, उत्पादन केंद्रांची निर्मिती, तसेच जागतिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणांची गरज असल्याचे नमूद केले. प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाच्या संपूर्ण आदरासह, हे बदल जगाला अधिक सुरक्षित आणि परस्परसंवादी बनवतील असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या “हे युद्धाचे युग नाही” या वक्तव्याचा पुनरुच्चार
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी जागतिक तणाव आणि संघर्ष दूर करण्याच्या दिशेने प्रयत्नांची गरज देखील स्पष्ट केली. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या “हे युद्धाचे युग नाही” या वक्तव्याचा पुनरुच्चार केला, आणि सांगितले की बहु-ध्रुवीयतेकडे वाटचाल करण्यासाठी सध्याच्या विरोधाभासांचा सामना करण्याची वेळ आली आहे.