फोटो सौजन्य: @Reuters एक्स अकाऊंट
मनीला: फिलिपाइन्समध्ये टायफून ट्रामीने मोठा हाहाकार माजवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिलीपाइन्समध्ये या वादळामुळे किमान 26 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 150,000 हून अधिक लोकांना याचा फटका बसला आहे. फिलीपाइन्सच्या अनेक नागरिकांना आपली घरे सोडावी लागली आहेत. ट्रामी टायफून फिलिपाइन्सच्या ईशान्येकडील प्रांतांमध्ये ताशी 95 किलोमीटर वेगाने वारे वाहून पूर आणि भूस्खलनाला कारणीभूत ठरले आहे. मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
बचाव कार्य सुरू आहे
तसेच अनेक गाड्या रस्त्यावरून वाहून गेल्या आहेत. बिकोल प्रदेशाला या टायफूनचा सर्वाधिक फटका बसला आहे. याशिवाय इफुगाओ डोंगराळ भागातही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पूर आणि भूस्खलनामुळे घरांच्या छतांवर अडकलेले लोक बाहेर काढण्यासाठी प्रमाणात बचावकार्य सुरू आहे. मोटरबोटींच्या साहाय्याने लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. अनेकांचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर काही ठिकाणी लोकांना त्यांच्या घरांमध्ये अडकले आहे.
Tropical Storm Trami makes landfall, floods northern Philippine provinces https://t.co/IdeADdx6N0 pic.twitter.com/EswehFYRli
— Reuters (@Reuters) October 24, 2024
बचाव कार्यात अडचणी
प्रादेशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या बचाव कार्यात अनेक अडचणी येत आहेत. कारण हवामान अत्यंत खराब आहे. फिलिपाइन्सच्या बचाव कार्यात मदत करण्यासाठी सुमारे 1,500 पोलिस आणि आपत्कालीन कर्मचारी काम करत आहेत. प्रादेशिक पोलिस प्रमुख ब्रिगेडियर आंद्रे डिझोन यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, बचाव कार्यासाठी अतिरिक्त मोटरबोट्सची आवश्यकता आहे, परिस्थिती अत्यंत बिकट आहे. बचाव पथकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच अन्न आणि इतर आवश्यक वस्तूंचीही तातडीने गरज भासत आहे.
याआधीही टायफूनमुळे मोठे नुकसान झाले होते
याआधीही फिलिपाइन्समध्ये टायफूनमुळे मोठे नुकसान झाले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात सुमारे 20 चक्रीवादळे देशाच्या किनाऱ्यांना धडकतात. 2013 मध्ये हैयान या चक्रीवादळामुळे 7,300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, आणि अनेक गावे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. ट्रामी हे वादळ त्या स्मरणात अजून एक मोठे संकट म्हणून नोंदले गेले आहे. सरकारने शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले असून, लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे.