दहशतवादी हल्ल्याने पाकिस्तान पुन्हा हादरले; कलातमध्ये 7 सुरक्षा जवान मारले गेले, 18 जखमी
इस्लामाबाद: पाकिस्तान पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरले आहे. पाकिस्ताच्या बलुचिस्तानमधील कलात जिल्ह्यातील जोहानच्या डोंगराळ भागात हल्ला झाला आहे. हा हल्ला सुरक्षा चौकीवर करण्यात आला असून यामध्ये 7 जवान मारले गेले आहेत, तर 18 जण जखमी झाले. अशी माहिती पाकिस्तीनच्या अधिकाऱ्यांनी दिली. जखमींना लगेचच रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, कलात विभागाचे आयुक्त नईम बाझाई यांनी या हल्ल्यांची पुष्टी केली. या हल्ल्याबाबत माहिती देताना त्यांनी स्पष्ट कले की, “हा चेकपोस्टवर तैनात जवानांवर झाला असून, या हल्ल्यात सात जण शहीद झाले, 18 जखमी झाले आहेत.” मृतदेह आणि जखमींना क्वेट्टा येथील सैन्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
सुरक्षा दलांनी 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला
इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री शाह मर्दानजवळील सुरक्षा चौकीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यांनी रॉकेट, ग्रेनेड आणि स्वयंचलित जड शस्त्रांचा वापर केला. सुरक्षा दलांनी त्वरित प्रत्युत्तर दिले. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. मात्र, या हल्ल्यात सात सुरक्षा जवानांनी प्राण गमावले.
दहशतवादी हल्ल्याचा तपास सुरू
या हल्ल्यात सहभागी झालेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी जोहानन आणि त्याच्या आसपासच्या भागात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. अशी माहिती कलातचे उपायुक्त बिलाल शब्बीर यांनी दिली. तसेच घटनास्थळी सुरक्षा दलांचा बंदोबस्त करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
शाहबाज शरीफ यांची टिका
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “बलुचिस्तानमध्ये अशांतता पसरवणारे घटक लोकांचे आणि प्रांताच्या विकासाचे शत्रू आहेत. अशा दहशतवादी कृत्यांमुळे बलुचिस्तानच्या प्रगतीच्या दिशेने सरकारची वचनबद्धता कमी होणार नाही.” मात्र या हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये सुरक्षा व्यवस्थांवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत.
याआधी क्वेटा रेल्वेस्थानकावर हल्ला करण्यात आला होता
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या क्वेटा रेल्वेस्थानकावर आत्मघाती हल्ला करण्यात आला होता. या आत्मघाती विस्फोटामध्ये 42 जणांचा मृत्यू झाला होता तर 30हून अधिक लोक जखमी झाले होते. दरम्यान शहराच्या सुरक्षेसाठी बलुचिस्तानमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. आहेपाकिस्तान टेलिकम्युनिकेशन अथॉरिटी (PTA) च्या प्रवक्त्याने स्पष्ट केले की, सुरक्षेची चिंता लक्षात घेऊन आणि परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हे उपाय करण्यात आले आहेत.