Three buses hit by blasts in Israel 'suspected terror attack'
जेरुसेलम: इस्त्रायलच्या तेल अवीव शहरात तीन बस विस्फोट झाले असून यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरलेले आहे. हे स्फोट दहशतवादी हल्ल्याचा भाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. हमासकडून युद्धविरामातंर्गत गाझातून चार ओलिसांचे मृतदेह परत केल्यानंतर इस्त्रायलमध्ये दु:खाचे वातावरण होते आणि हा स्फोट झाला. या स्फोटांनी 2 हजारच्या दशकातील पॅलेस्टिनी उठावाच्या काळातील स्फोटांची आठवण करून दिली. परंतु हे हल्ले अलीकडे दुर्मीळ झाले होते.
परिसरात दहशतीचे वातावरण
इस्त्रायलचे पोलिस प्रवक्ते SSI अहरोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झालेल्या बसांशिवाय दोन अन्य बसांमध्येही स्फोटके आढळली, परंतु ती फुटली नाहीत. पोलिसांनी सांगितले की, सर्व पाचही स्फोटके एकाच प्रकारची होती आणि टाइमर सेट करण्यात आला होता. बॉम्बशोधक पथकाने ती निकामी केली. या हल्ल्यामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. शहराच्या महापौर ब्रॉट यांनी सांगितले की, हल्ल्यात कोणालाही दुखापत झालेली नाही. बस कंपनीच्या प्रमुखांनी तातडीने सर्व चालकांना बस थांबवून तपासण्याचे आदेश दिले. सुरक्षित आढळल्यानंतरच सर्व बस पुन्हा मार्गावर सोडण्यात आल्या.
घटनेची चौकशी सुरु
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी घटनांवर लक्ष ठेवले असून, त्यांच्या लष्करी सचिवांकडून तपशील घेत आहेत. सध्या या घटनांची सखोल चौकसी सुरु आहे. पोलिसांनी सांगितले की, स्फोट एकाच संशयिताने केला की अनेक संशयित होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्ल्याती स्फोटके वेस्ट बँकमध्ये वापरल्या गेलेल्या स्फोटकांशी मिळतीजुळती असल्याचे समजले, परंतु अधिक तपशील देण्यात आले नाही.
पॅलेस्टिनी नागरिकांना प्रवेश बंद
हमासच्या ७ ऑक्टोबर २०२३ च्या हल्ल्यानंतर इस्रायलने वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी संशयितांवर सातत्याने छापे टाकले आहेत. या कारवाईच्या अंतर्गत वेस्ट बँकमधून पॅलेस्टिनी लोकांच्या इस्रायलमध्ये प्रवेशावर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. हमासच्या कसम ब्रिगेडच्या एका गटाने टेलीग्रामवर “आमच्या जमिनीवरील कब्जा संपेपर्यंत आम्ही आमच्या शहीदांचा बदला घेणं विसरणार नाही.” असा संदेश जारी केला आहे. मात्र, त्यांनी हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही.
तुळकारेम शहर आणि दोन निर्वासित छावण्या गाझा युद्धविरामानंतर इस्रायलच्या लष्करी कारवाईचे केंद्र बनल्या आहेत. बॅट याम शहराच्या महापौरांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, शाळा आणि सार्वजनिक वाहतूक सुरू राहणार असल्याचे सांगितले. सध्या तेल अवीवमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.