Turkey Bangladesh Pakistan relations pose a threat to India due to growing partnership
अंकारा: एकीकडे भार-बांगलादेश तणावात वाढ सुरु असताना बांगलादेश पाकिस्तान आणि तुर्कीसोबत संबंध प्रस्थापित करत आहे. यामुळे पाकिस्तान-बांगलादेश-तुर्कीच्या एकत्र येण्याने भारतासाठी मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैयप एर्दोगन यांनी तुर्कीला इस्लामिक जगताचे नेते बनवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न सुरू केला आहे. या दिशेने त्यांचे लक्ष बांगलादेशाकडे वळले आहे.
पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर आणि देश सोडून जाण्यानंतर बांगलादेशातील राजकीय बदलांमुळे तुर्कीला आपला प्रभाव वाढवण्याची संधी मिळाली आहे. बांगलादेशच्या भारतासोबतच्या तणावाचा फायदा घेत तुर्कीने बांगलादेशसोबत व्यापार, संरक्षण आणि सांस्कृतिक सहकार्याच्या माध्यमातून आपली उपस्थिती लक्षणीय वाढवली आहे.
बांगलादेशात तुर्कीचा वाढता प्रभाव
तुर्कीच्या व्यापारमंत्री ओमेर बोलात यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने 9 जानेवारी 2025 रोजी बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनूस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान बांगलादेशने तुर्कीला देशाच्या विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीचे आमंत्रण दिले आणि त्यांच्या तरुण कार्यक्षमतेचा उपयोग करण्याचे सुचवले. यासोबतच, त्यांनी संरक्षण उद्योग विकसित करण्यासाठी तुर्कीची मदत मागितली.
तुर्की-बांगलादेश संबंध संरक्षण क्षेत्रात अधिक मजबूत होत आहेत. बांगलादेशने तुर्कीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपले संरक्षणक्षेत्र सुधारण्याची तयारी दर्शवली आहे. सध्या तुर्की बांगलादेशला ड्रोन आणि लाइट टँक पुरवठ्याच्या करारावर काम करत आहे, यामुळे या संबंधांना आणखी गती मिळाली आहे. यापूर्वी देखील बांगलादेशने तुर्कीकडून अनेक शस्त्रे खरेदी केली होती.
तुर्की-पाकिस्तान-बांगलादेश युती
तुर्की, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सहकार्य भारतासाठी चिंतेचे कारण ठरत आहे. एकीकडे तुर्कीसोबत संबंध प्रस्थापित करत असताना पाकिस्तान आणि बांगलादेशने नुकताच ऐतिहासिक सामंजस्य करार केला आहे. या करारांतर्गत फेब्रुवारी 2025 मध्ये नौदल सराव आयोजित केला जाणार आहे. 1971 नंतर ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा पाकिस्तान आणि बांगलादेश सैन्य सहकार्य करत आहेत. तुर्की या युतीत प्रमुख भूमिका बजावत असून, तो बांगलादेशला भारताच्या जागी महत्त्वाचा भागीदार बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तुर्कीच्या संरक्षण उपकरणांमुळे बांगलादेशची सैन्य क्षमता वाढेल आणि क्षेत्रीय शक्ती संतुलनात बदल होईल.
भारतासाठी धोका
तुर्की-पाकिस्तान-बांगलादेशच्या एकत्र येण्याने दक्षिण आशियामदील भारताच्या भूमिका आणि प्रभावासाठी धोका निर्माण होऊ शकतो असे म्हटले जात आहे. तुर्कीती संरक्षण तंत्रज्ञानातील प्रगती आणि बांगलादेशातील वाढता प्रभाव भारतासाठी कडवे आव्हान निर्माण करु शकतो. भारताला या बदलत्या समीकरणाचा काळजीपूर्वक आढावा घ्यावा लागेल आणि त्यानुसार आपल्या क्षेत्रीय धोरणात सुधारणा करावी लागेल. तुर्कीचा हा ‘मास्टर प्लॅन’ भारताच्या संरक्षण आणि व्यापारी हितसंबंधांना धक्का पोहोचवू शकतो. यामुळे भारताने आपली रणनीती अधिक मजबूत आणि गतिशील करणे आवश्यक आहे.