रशियाचा प्रभाव संपताच युक्रेनचा सीरियात हस्तक्षेप; परराष्ट्र मंत्रींनी घेतली जुलानी यांची भेट, 'या' मुद्द्यावर झाली चर्चा
कीव–दमास्कस: सीरियात बशर असद यांच्या पतनानंतर आता सीरियातील रशियाचा प्रभाव संपुष्टात आला आहे. यामुळे युक्रेनने सीरियाकडे मैत्रीचे हात पुढे केले आहेत. दरम्यान युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्री सिबिहा यांनी सीरियन बंडखोर गट हयात-तहरीर अल शाम चे प्रमुख अल-जुलानी यांची भेट घेतली. सध्या सीरियाची सत्ता जुलानी यांच्या हातात आहे. युक्रेनने सीरियाकडे धोरणात्मक भागीदारीसाठी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यावर भर दिला आहे.
युक्रेनचे सीरियात शांतता प्रस्थापित करण्याचे आश्वासन
युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्री सिबिहा जुलानी यांच्या भेटीदरम्यान सीरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी यूक्रेनसोबत रणनीतिक भागीदारीच्या इच्छेचा पुनरुच्चार केला. सीरियाचे मंत्री असद हसन अल शिबानी म्हणाले, “सीरिया आणि यूक्रेनच्या लोकांनी समान संघर्ष आणि दुःख अनुभवले आहेत.” यूक्रेनने सीरियाला मोठ्या प्रमाणात मदत पुरवण्याचे आश्वासन दिले आहे. यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, “रशियाच्या दीर्घकाळ हस्तक्षेपानंतर, आम्ही सीरियात स्थैर्य आणण्यास मदत करू शकतो.” याआधीच, यूक्रेनने सीरियाला 500 टन धान्य पाठवण्याची घोषणा केली होती.
सीरियामध्ये पहिल्यांदाच महिला सेंट्रल बँक प्रमुख
सत्तांतरानंतर सीरियामध्ये विविध बदल होत आहेत. विद्रोही समर्थित सरकारने पहिल्यांदाच मयासा सैबरिन या महिलेला सेंट्रल बँकेच्या प्रमुखपदी नेमले आहे. फाइनान्शियल क्षेत्रातील १५ वर्षांच्या अनुभवामुळे त्यांची निवड झाली.
रशिया-इराणचा प्रभाव कसा संपला?
सीरियामध्ये 2011 पासून असदला रशिया आणि इराणकडून मोठ्या प्रमाणावर मदत मिळत होती. पण २०२२ मध्ये युक्रेन युद्धामुळे रशियाने सीरियातून माघार घेतली. त्यानंतर २०२३ मध्ये इस्रायल-हमास संघर्षामुळे इराण आणि हिजबुल्लाहनेही सीरियाकडे दुर्लक्ष केले. हिजबुल्लाह कमकुवत झाल्यानंतर जुलानीने संधी साधत सीरियाच्या सैन्यावर हल्ला केला आणि 11 दिवसात बशर अल- असद सरकार उलथून टाकले.
सध्या सीरियाची सत्ता हयात-तहरीर अल शाम या बंडखोर गटाचा प्रमुख अल-जुलानी यांच्या हातात असून त्यांनी देशात शांतता प्रस्थापित करण्याचे आश्वासन सीरियन जनतेला दिले आहे. नवीन नेतृत्वाखालील या सरकारकडून सीरियामध्ये स्थैर्य आणि विकासाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
अमेरिका आणि सौदीचा नवा दृष्टिकोन
आता अमेरिका जुलानीला दहशतवादी मानत नाही. अमेरिकेने जुलानीवर ठेवलेले 85 कोटींचे बक्षीस देखील काढून घेतले आहे. ‘मिडल ईस्ट आय’च्या अहवालानुसार, अमेरिका तुर्कस्तानाला सीरियावर पूर्ण नियंत्रण मिळवू इच्छित नाही. यामुळे अमेरिकेने जुलानीला अल कायदापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय, जुलानीने सऊदी अरबशी संबंध सुधारण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी म्हटले की, “सीरियाच्या भविष्यात सऊदीचा महत्त्वाचा वाटा असेल.”