Israel-Hamas War: हमासचा कमांडर अब्द अल-हादी ड्रोन हल्ल्यात ठार; इस्त्रायल लष्कराचा दावा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जेरुसेलम: सध्या-इस्त्रायल हमास युद्ध सुरुच आहे. दरम्यान एक मोठा दावा इस्त्रायलने केला आहे. इस्त्रायल संरक्षण दलाने पुष्टी केली की, अलीकडे हमासवर केलेल्या ड्रोन हल्ल्यात हमासच्या नुखबा प्लाटून कमांडर अब्द अल-हादी सबा याला ठार करण्यात आले आहे. IDF ने दिलेल्या माहितीनुसार, सबा हा 7 ऑक्टोबर 2023 रोजी किबुत्ज नीर ओजवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता. इस्रायली सैन्याने म्हटले आहे की, अब्द अल-हादी सबा दक्षिण गाझातील खान युनिस परिसरात लपलेल्या ठिकाणावर असताना त्याला ठार करण्यात आले.
दहशतवाद्यांचा खात्मा
IDF ने म्हटले आहे की, गुप्त सूत्रधाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे ऑपरेशन करण्यात आले होते. पश्चिमी खान युनिस बटालियनच्या नुखबा प्लाटून कमांडर सबा याने किबुत्ज नीर ओजवरील हल्ल्यामध्ये घुसखोरांचे नेतृत्व केले होते. या योजनेला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी IDF आणि इस्रायली सुरक्षा एजन्सी (ISA) ने एकत्रितपणे काम केले आणि अल-हादी सबा याचा खात्मा केला.
यापूर्वी, IDF ने शिन बेटसह संयुक्त ऑपरेशनमध्ये 14 हमास दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा केला होता. यापैकी 6 दहशतवाद्यांचा 7 ऑक्टोबर 2023 च्या हल्ल्यात सहभाग होता. 162व्या स्टील डिव्हिजनने गाझा पट्टीत जबालिया आणि बेट लाहिया परिसरात विशेष मोहीम राबवली, यामध्ये हल्ल्यात सामील असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांना इस्त्रायलने ठार केल्याचे म्हटले आहे.
2023 पासून युद्धाला सुरुवात
7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर मोठा दहशतवादी हल्ला केला होता, ज्यामध्ये 1,200 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आणि 250 हून अधिक लोकांना बंदिवासात ठेवले गेले. सध्या 100 हून अधिक लोक अजूनही हमासच्या कैदेत आहेत, ज्यांपैकी अनेकांच्या मृत्यूची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझा पट्टीत हमासच्या तळांवर जोरदार हल्ले केले आणि इस्त्रायल हमास युद्धाला सुरूवात झाली.
मात्र, या प्रतिसादात्मक कारवाईमुळे गाझामध्ये मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे, यामध्ये 45,000 हून अधिक पॅलेस्टिनी मृत्युमुखी पडले असून अनेकजण जखमी झाले आहेत. या परिस्थितीमुळे जागतिक पातळीवर चिंता वाढली आहे आणि युद्धबंदीची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, यमनमधील हूती बंडखोर आणि लेबनानमधील हिजबुल्लाहने, ज्यांना इराणच्या पाठिंब्याने चालणारे गट मानले जाते, इस्रायलविरुद्धचे हल्ले तीव्र केले आहेत.