
युद्धाचा भडका आणखी उडणार? अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांना केले लक्ष्य; एक जहाज नष्ट
वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक घडामोडी घडत आहेत. इराणवर अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून हल्ले करण्यात आले आहेत. त्यात अमेरिकेकडून अद्यापही हल्ले सुरुच आहेत. जागतिक व्यापारासाठी सर्वात संवेदनशील सागरी मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या लष्कराने इराणविरुद्ध आणखी एक मोठी लष्करी कारवाई केली आहे.
अमेरिकेच्या लष्कराने इराणवर हवाई हल्ल्यांचे दुसरे सत्र सुरू केल्याचे दिसून येत आहे. ही कारवाई अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि सशस्त्र दलांच्या सरसेनापतींच्या थेट निर्देशांनुसार करण्यात आली. दरम्यान, अमेरिकेच्या या हल्ल्यात इराणच्या अनेक भागांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) बुधवारी (स्थानिक वेळेनुसार) सांगितले की, अमेरिकेच्या लष्कराने इराणच्या बंदराकडे जाणारे एक रिकामे तेलवाहू जहाज निकामी केले आहे. इस्लामिक रिपब्लिकवर लादलेल्या नौदल नाकेबंदीचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करताना या जहाजाने अनेक इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना बॉम्बहल्ला करण्यापूर्वी त्यांनी इराणला काही मुदत दिली होती का? असे विचारण्यात आले होते. तेव्हा डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “मला मुदत द्यायला आवडत नाही, पण त्यांना खूप काही माहीत आहे. त्यांनी अधिक चांगल्याप्रकारे वागले पाहिजे. त्यांनी कोणत्याही इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नये”.
इराणच्या अहवाजमध्ये स्फोटांचे आवाज
इराणच्या मेहर न्यूज एजन्सीने इराकी सीमेजवळील अहवाज शहरात स्फोट झाल्याचे वृत्त दिले आहे. या महिन्यात तणाव पुन्हा वाढल्यापासून अमेरिकेच्या लष्कराने अहवाजला अनेक वेळा लक्ष्य केले आहे.
इराणची लष्करी तळे नष्ट करणार
अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या सूत्रांनुसार, या ताज्या हल्ल्यांचा मुख्य उद्देश इराणची लष्करी क्षमता नष्ट करणे हा आहे, ज्याचा वापर ते आंतरराष्ट्रीय जलमार्गांमध्ये जहाजांना घाबरवण्यासाठी आणि धमकावण्यासाठी करत आहे. व्यापारी जहाजांच्या, विशेषतः होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या सुरक्षित मार्गात अडथळा आणण्याच्या इराणच्या प्रयत्नांना रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. जागतिक व्यापारावर परिणाम करणाऱ्या कोणत्याही आक्रमकतेसाठी इराणला थेट जबाबदार धरले जाईल, हे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.