US woman from varginia wins ₹17 crore jackpot after receiving wrong lottery ticket
वॉशिंग्टन: कोणाच नशीब कधी आणि कसे बदलेल हे कुणीच सांगू शकत नाही. कधी लाख प्रयत्न केले तरी यश मिळत नाही, तर कधी एक चूकसुद्ध मोठे भाग्य घेऊन येते. असेच काहीसे एका अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये राहणाऱ्या केली लिंडसे या महिलेसोबत घडले. एका साध्या चुकीमुळे तिचे नशिब पालटले आणि तिने तब्बल 2 मिलियन डॉलर म्हणजे भारतीय रुपयांमध्ये 17 कोटी रुपये जिंकले आहेत.
चुकीच्या लॉटरी तिकिटामुळे झाली नाराजी
इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, केली लिंडसे कॅरोलटन येथील निवासी आहे. तिने एका लोक स्टोअरमधून स्क्रॅच-ऑफ लॉटरी तिकिट खरेदी करायचे ठरवले. तिने विशिष्ट प्रकारचे तिकिट मागितले होते, परंतु कॅशियरच्या चुकीमुळे तिला वेगळे ‘मनी ब्लिट्ज स्क्रॅच-ऑफ’ तिकिट मिळाले. ही चूक लक्षात येताच केलीला राग आला. तिला हवे असलेले तिकिट न मिळाल्याने ती निराश झाली.
नशिबाची अनोखी खेळी
नाराज होऊनही केलीने तिकिट स्क्रॅच करायचे ठरवले आणि पार्किंगमध्येच तिने तिकिट उघडले. या चुकीच्या तिकिटाने तिची निराशा झाली होती, त्याच तिकिटाने काही क्षणातच तिच्या आयुष्याला नवे वळण दिले. तिला 2 मिलियन डॉलरचा जॅकपॉट लागला. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम जवळपास 17 कोटी 32 लाख होते.
राग क्षणात नाहीसा
केलीने तिकिट स्क्रॅच केल्यानंतर त्यावर 2 मिलियन डॉलरचे बक्षीस पाहताच ती आश्चर्यचकित झाली. काही क्षणांपूर्वी ती कॅशियरने दिलेल्या चूकीच्या तिकीटामुळे नाराज झाली होती. मात्र तिच्यासाठी ही चूक सर्वात मोठे भाग्य घेऊन आली. या घटनेबद्दल मजेशीर प्रतिक्रिया देत केली म्हटले की, “माझ्या आयुष्यातील ही सर्वांत भाग्यशाली चूक होती.”
त्यानंतर केली जिंकलेली रक्कम वार्षिक हप्तांमध्ये (Annuity Payment) घ्यायची नव्हती, म्हणून संपूर्ण रक्कम एकाच वेळी घेण्याचा निर्णय घेतला. कर भरल्यानंतर तिच्या हाती 1.25 दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास 10 कोटी रुपये मिळाले.
जॅकपॉट जिंकण्याची शक्यता खूपच कमी
इंग्रजी वृत्तपत्राच्या अहवालानुसार, ‘मनी ब्लिट्ज’ गेममध्ये जॅकपॉट जिंकण्याची शक्यता 11,42,400 पैकी केवळ एका व्यक्तीला असते. या गेममध्ये दोन टॉप बक्षीसे असतात, यामुळे अजून एक भाग्यवान विजेता समोर येणे बाकी आहे. ही घटना नशिब कधीही बदलू शकते याचे उदाहरण आहेत.
कधी कधी ज्या गोष्टी आपल्याला चुकल्यासारख्या वाटतात, त्या खऱ्या अर्थाने आपले आयुष्य बदलणाऱ्या ठरू शकतात. तुम्ही सुद्धा कधी ना कधी अशा गोष्टींचा अनुभव केला असेल. पण याचा अर्थ असा होता नाही की सगळे नशीबावरच सोडून द्यायचे. आयुष्य चांगले जगण्यासाठी तेवढेच प्रयत्न देखील आवश्यक आहेत.