
'We have enough nuclear bombs to destroy the world 150 times'; Donald Trump's shocking claim
अमेरिकेने भारत, चीनसह काही देशांवर आयात शुल्क म्हणजेच टॅरिफ लागू केल्यामुळे अनेक देशांसोबत तणाव वाढला आहे. त्यातच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरही मोठ्या प्रमाणात टॅरिफ लागू केले. त्यावर प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेवर आयात शुल्क लागू केले. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव सातत्याने वाढत चालला आहे. त्यातच दुसरीकडे रशिया आणि अमेरिकेचे संबंधही बिघडत चालले आहेत. या तणावाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे.
“ज्याप्रमाणे चीन अमेरिकेला धोका निर्माण करत आहे, त्याचप्रमाणे अमेरिका देखील चीनसाठी धोका निर्माण करु शकते. जे आम्हाला पाहतात, त्यांना आम्हीही पाहत असतो. जग खूप स्पर्धात्मक झाले आहे. जर मुद्दा अमेरिका आणि चीनचा असेल तर. असा अप्रत्यक्ष इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.
माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन आणि अमेरिकेने संघर्ष टाळून परस्पर सहकार्याचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की, “चांगले परिणाम मिळविण्यासाठी दोन्ही देशांनी संघर्षात न अडकता एकत्र काम करणे आवश्यक आहे.” असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, अलीकडे अमेरिकन गुप्तचर संस्थांनी चीनवर अमेरिकेच्या वीज आणि पाणीपुरवठा यंत्रणांमध्ये व्यत्यय आणल्याचे आरोप केल्यानंतर ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं आहे. ट्रम्प यांनी चीनच्या वाढत्या अणुशस्त्र विकासाबद्दलही चिंता व्यक्त केली.
“चीन अतिशय वेगाने नवीन अणुशस्त्रे विकसित करत आहे. पुढील पाच वर्षांत ते रशिया आणि अमेरिकेच्या बरोबरीचे सामर्थ्य प्राप्त करू शकतात. त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी अणु निःशस्त्रीकरणाबाबत चर्चा केल्याचे म्हटले आहे. तसेच, जागतिक स्थैर्यासाठी अशा संवादाची गरज असल्याचे ट्रम्प यांनी नमुद केलं.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन आणि रशियासोबतच्या अमेरिकेच्या संबंधांबाबत बोलताना म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये स्पर्धा असली तरी ती “युद्ध किंवा शत्रुत्वात परिवर्तित होता कामा नये.सहकार्याद्वारे हे तीनही देश जगाला चांगली दिशा देऊ शकतात. आपल्याकडे सर्वाधिक अण्वस्त्रे आहेत, रशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि चीन सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण चीन अत्यंत वेगाने प्रगती करत आहे. सर्व देशांनी आता अण्वस्त्रे कमी करण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे.”
ट्रम्प म्हणाले, “आपल्याकडे या ग्रहाचा १५० वेळा नाश करण्याइतकी अण्वस्त्रे आहेत. रशियाकडेही मोठा साठा आहे आणि चीनकडेही लवकरच मोठी संख्या असेल. जर हे तिन्ही देश अण्वस्त्र नियंत्रणासाठी एकत्र पावले उचलतील, तर तो जगासाठी एक शक्तिशाली संदेश ठरेल.”