Afghanistan earthquake (photo - social media)
Afghanistan Earthquake : पहाटेच्या वेळी उत्तर अफगाणिस्तानात 6.3 रिश्टर स्केल इतकी तीव्रता असलेला भूकंप झाला. या भूकंपाने संपूर्ण अफगाणिस्तानात हाहाकार माजवला असून आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 150 पेक्षा अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढायचे काम सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या खोल्मपासून भूकंपाचे केंद्र सुमारे 22 किमी पश्चिम-नैऋत्येस होते तर, त्या भूकंपाची खोली 28 किमी इतकी होती. अफगाणिस्तानमध्ये या भूकंपाने हाहाकार माजवला असून देशात भीतीचे वातावरण आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, सोमवारी पहाटे अफगाणिस्तानची राजधानी असलेली काबूलपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवल्याने भीतीचे वातावरण तयार झाले होते. मजार-ए-शरीफ शहरातील नागरिक घरे कोसळतील म्हणून घराबाहेर येऊन सैरभैर धावत होती.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेची माहिती दिली, सोमवारी सकाळी मजार-ए-शरीफ शहरांसोबत खुल्म शहराजवळ ही भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तर बल्ख प्रांताची राजधानी मजार-ए-शरीफ ही उत्तरी अफगाणिस्तानाची सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेले एक शहर आहे. मजार-ए-शरीफतील पीडित रहिवाशाने वृत्तांशी बोलताना सांगितले की, अचानक जमीन हादरायला लागल्याने परिसरातील लोक घाबरले आणि घराबाहेर पडून सैरभैर जीवाच्या आकांताने धावू लागले.
अफगाणिस्तानच्या उत्तरेस असलेल्या सीमेवरील देश ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान व उझबेकिस्तानच्या काही ठिकाणी सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : Attacks On Christians : ख्रिश्चनांविरुद्ध होणारी हिंसा थांबवा…! ‘या’ देशाला दिली जाणारी मदत थांबवण्याचे ट्रम्प यांचे आदेश
अफगाणिस्तानचा भूभाग हा भूकंप प्रभावित क्षेत्र असल्याने इथे सारखे भूकंपाचे धक्के बसत असतात. यापूर्वीही 31 ऑगस्टला पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या पूर्व अफगाणिस्तानला 6.0 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता इतकी भीषण होती की यामध्ये 2200 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर अनेकांचे घर उध्वस्त झाले. तर, 2023 मध्ये 7 ऑक्टोबरला 6.3 तीव्रतेचा भूकंप येऊन किमान 4000 लोक मृत्यूमुखी पडले होते.






