WHO sends Shaikh Hasina daughter Saima Wazed on leave
ढाका : सध्या बांगलादेशात राजकीय गोंधळ सुरु आहे. तसेच बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात मोठी कारवाई देखील सुरु आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारकडून शेख हसीनांना एकामागून एक धक्का मिळत आहे. शेख हसीना गेल्या वर्षी ऑगस्ट २०२४ मध्ये देश सोडून गेल्या. त्यानंतर युनूस सरकारची शेख हसीनांविरोधात कटकारस्थाने सुरु झाली. हसीनांवर हत्येपासून ते मानवतेच्या गुन्ह्यांपर्यंतचे आरोप करण्यात आले आहेत. शिवाय त्यांच्या कुटुंबियांवर देखील कारवाई केली जात आहे.
शेखी हसीनांवर बांगलादेशाच्या न्यायालयाने सहा हत्या, मानवी हक्कांचे उल्लंघन आणि अन्य गंभीर आरोप करत सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. आता शेख हसीनांची मुलगी साइमा वाजेद पुतुल यांच्याविरोधात देखील मोठी कारवाई करण्यात आली आहे.
युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने जागतिक आरोग्य संघटनेकडे (WHO)तक्रार केली आहे. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)साइमा वाजेद पुतुल यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. WHO ने सायमा वाजेद यांना अनिश्चित काळासाठी रजेवर पाठवले आहे. अधिकृत इमेलद्वारे WHO ने साइमा यांना ही माहिती दिली आहे.
साइमा वाजेद WHO मध्ये दक्षिण-पूर्व आशिया विभागाच्या क्षेत्रीय संचालक होत्या. परंतु युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने त्यांच्यावर भ्रष्टाचारातचे गंभीर आरोप केले आहे. या तक्रारीनंतर WHO चे महासंचालक टेड्रोस घेब्रेसेसस यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांनी ११ जुलै पासून साइमा वाजेद पुतुल यांना रजेवर पाठवले आहे. त्यांच्या जागी डॉ. कैथरीना बोएमी या दक्षिण-पूर्व आशिया विभागाच्या क्षेत्रीय संचालक जबाबदारी घेणार आहेत.
मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्त्वाखालील अंतरिम सरकारच्या तक्रारीनुसार, साइमा वाजेद त्यांच्या आईच्या राजकीय प्रभावाचा वापर करुन विविध बॅंकामधून २.८ मिलियन डॉलर शूचन फाउंडेशनच्या माध्यमातून काढत आहे. तसेच त्यांच्याकडे WHO मध्ये काम करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता नसल्याचा आरोपही अंतरिम सरकारने केला आहे.
सध्या WHO या तक्रारीची चौकशी करत आहे. प्राथमिक तापासानंतर साइमा वाजेद यांना रजेवर पाठवण्यात आले आहे. तसेच बंगबंधू शेख मुजीब मेजिकल युनिव्हर्सिटीत साइमा वाजेदकडे कोणतेही पद नसल्याचेही विद्यापीठाने म्हटले आहे. शेख हसीनांविरोधात युनूस सरकारची ही मोठी कारवाई मानली जात आहे.