Zelensky step down after war
झेलेन्स्कींची मोठी घोषणा युद्ध संपताच राष्ट्रपतीपद सोडण्याची तयारी.
संयुक्त राष्ट्रात भावनिक आवाहन “जगाला कायद्यापेक्षा शस्त्रांची भाषा समजते.”
पुतिनवर आरोप युद्ध केवळ युक्रेनपुरते नाही, तर संपूर्ण युरोपात पसरवण्याचा हेतू.
Zelensky peace over power : न्यूयॉर्कमध्ये नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्र महासभेत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्क (Volodymyr Zelensky) यांनी केलेल्या विधानाने जगभरात खळबळ उडवली आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ चाललेल्या रशिया-युक्रेन ( Russia-Ukraine) युद्धात लाखो नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले की युद्ध संपताच ते आपले पद सोडण्यास तयार आहेत. त्यांच्या मते, “माझे ध्येय सत्तेमागे धावणे नाही, तर युद्धाचा शेवट करून देशाला शांतता मिळवून देणे आहे.”
सध्या युक्रेनमध्ये मार्शल लॉ लागू आहे. त्यामुळे लोकशाही प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. देशभरात युद्धाचे सावट असल्यामुळे लोकांना मतदानाचा हक्क वापरण्याची संधी मिळालेली नाही. झेलेन्स्की म्हणाले की युद्धबंदी झाल्यानंतर लगेचच ते संसदेला निवडणुका घेण्याची विनंती करतील. “हा काळ माझ्या देशासाठी आहे, माझ्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी नाही. युद्ध संपल्यानंतर मी राष्ट्रपती म्हणून नाही, तर एक साधा नागरिक म्हणून देशाच्या भविष्याला साथ देईन,” असे त्यांनी एका माध्यम मुलाखतीत सांगितले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : आशेचा किरण की आणखी एक राजकीय वादळ? 50 जहाजांचा ‘हा’ ताफा इस्रायल आणि अमेरिकेसाठी डोकेदुखी; गाझाच्या दिशेने रवाना
झेलेन्स्की यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या ८० व्या अधिवेशनात दिलेल्या भाषणात जगाला एक हृदयस्पर्शी संदेश दिला. ते म्हणाले
“आजच्या जगात कायद्यापेक्षा शस्त्रे निर्णय घेत आहेत. दर आठवड्याला युक्रेनमध्ये निरपराध लोक मरत आहेत. पण या युद्धाचा शेवट करण्यासाठी कोणत्याही शक्तिशाली देशाला रस नाही. ही शोकांतिका आहे.” त्यांच्या आवाजात वेदना होती. केवळ आपल्या देशाच्या नव्हे तर जगाच्या भवितव्याबद्दलची काळजीही त्यांच्या शब्दांतून जाणवत होती.
झेलेन्स्की यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “पुतिन यांचा हेतू केवळ युक्रेनपुरता मर्यादित नाही. त्यांचे युद्ध युरोपपर्यंत पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा धोका जगाने वेळीच ओळखायला हवा.” यासोबतच त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला इशारा दिला की सध्या मानवी इतिहासातील सर्वात मोठी आणि विनाशकारी शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेत जर जगाने एकत्र येऊन पाऊले उचलली नाहीत, तर भविष्यात संपूर्ण मानवजातीला त्याची किंमत मोजावी लागेल.
आपल्या भाषणादरम्यान झेलेन्स्की यांनी संयुक्त राष्ट्रांसारख्या जागतिक संघटनांवरही निशाणा साधला. त्यांनी म्हटले की आज या संघटना इतक्या कमकुवत झाल्या आहेत की युद्ध थांबवण्याची त्यांच्यात ताकद नाही. “जगाच्या सुरक्षिततेचे रक्षण करणारी संस्था जेव्हा नि:शक्त ठरते, तेव्हा छोट्या देशांचे काय होणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याआधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही संयुक्त राष्ट्रांवर टीका केली होती. आता त्याच धर्तीवर झेलेन्स्की यांनीही जगाला जागे होण्याचे आवाहन केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Escalator Gate : ‘मोठा अनर्थ टाळला!’ संयुक्त राष्ट्रांमध्ये माझ्याविरुद्ध एक मोठा कट रचण्यात आला; ट्रम्पचा खळबळजनक आरोप
झेलेन्स्की म्हणाले :
“या कठीण काळात माझ्या देशाला माझी गरज होती. त्यामुळे मी देशासोबत राहिलो. माझे ध्येय युद्ध संपवणे आहे, कोणत्याही किंमतीवर. सत्ता ही माझी प्राथमिकता नाही.”
त्यांच्या या विधानानंतर युक्रेनमध्ये नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. युद्ध संपल्यानंतर झेलेन्स्की खरोखरच पद सोडतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र त्यांनी दिलेले आश्वासन हे सत्तेची लालसा न ठेवता राष्ट्रहिताला प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वाचे उदाहरण मानले जात आहे.
झेलेन्स्कींचे विधान केवळ युक्रेनपुरते मर्यादित नाही, तर संपूर्ण जगासाठी एक इशारा आहे. युद्ध म्हणजे केवळ सीमा, सैन्य आणि शस्त्रे नव्हेत; तर ते लोकांच्या स्वप्नांचा, आयुष्याचा आणि भविष्याचा विनाश आहे. त्यांच्या या घोषणेमुळे जगातील इतर देशांच्या नेत्यांना देखील विचार करायला भाग पाडले आहे सत्ता टिकवणे महत्त्वाचे की लोकांचे प्राण वाचवणे?