संयुक्त राष्ट्रात ट्रम्पविरोधी कट? एस्केलेटर, टेलिप्रॉम्प्टर आणि आवाज गायब, ट्रम्पचा संतापजनक आरोप ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये त्यांच्याविरुद्ध “मोठा कट” रचल्याचा गंभीर आरोप केला.
एस्केलेटर थांबणे, टेलिप्रॉम्प्टर बंद पडणे आणि आवाज गायब होणे या तीन घटना ट्रम्प यांनी “तिहेरी तोडफोड” म्हटल्या.
ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र महासचिवांकडे तात्काळ चौकशीची मागणी केली असून, या घटनेला संस्थेची लाज मानले आहे.
Trump UN sabotage : न्यूयॉर्कमध्ये नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) महासभेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. “माझ्याविरुद्ध संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात मोठा कट रचण्यात आला,” असे म्हणत त्यांनी एकामागोमाग तीन रहस्यमय घटनांचा उल्लेख केला. या घटनांमध्ये एस्केलेटर अचानक थांबणे, भाषणावेळी टेलिप्रॉम्प्टर बंद पडणे आणि शेवटी संपूर्ण सभागृहात आवाज बंद होणे अशा “तिहेरी अडथळ्यां”चा समावेश आहे. ट्रम्प यांनी हे योगायोग नसून “योजून केलेली तोडफोड” असल्याचा आरोप केला आहे.
घटना घडली ती त्या क्षणी जेव्हा ट्रम्प आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी मुख्य सभागृहाकडे जात होते. ते दोघे एस्केलेटरवर चढले आणि अचानकच एस्केलेटर थांबला.
ट्रम्प यांनी म्हटले :
“जर आम्ही रेलिंग घट्ट पकडले नसते तर मोठी दुर्घटना झाली असती. हा काही साधा अपघात नव्हता, हा स्पष्ट कट होता. जबाबदार लोकांना अटक केली पाहिजे.”
शेवटी ट्रम्प आणि मेलोनी यांना बंद एस्केलेटरवरून चालतच वर जावे लागले. या घटनेमुळे संपूर्ण कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोंधळ निर्माण झाला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Pharmacist Day 2025 : का साजरा केला जातो जागतिक फार्मासिस्ट दिन? जाणून घ्या यामागील रंजक कारण
एस्केलेटरच्या धक्क्यातून सावरत ट्रम्प जेव्हा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भाषण देण्यासाठी व्यासपीठावर पोहोचले, तेव्हा आणखी एक अडचण त्यांची वाट पाहत होती.
टेलिप्रॉम्प्टर अचानक बंद पडला!
लाखो लोक दूरचित्रवाणीवर पाहत होते, जगातील नामवंत नेते सभागृहात बसले होते, आणि ट्रम्पसमोर अचानक भाषणाचा आधारच नाहीसा झाला.
ट्रम्प यांनी नंतर आठवण सांगितली :
“मी मनात म्हटलं, आधी एस्केलेटर, आता टेलिप्रॉम्प्टर… हे नक्की काय चाललंय?”
तरीही त्यांनी हार मानली नाही. जवळजवळ ५७ मिनिटे त्यांनी टेलिप्रॉम्प्टरशिवाय थेट भाषण केले. १५ मिनिटांनी टेलिप्रॉम्प्टर पुन्हा सुरू झाला. ट्रम्प म्हणाले,
“लोकांना कदाचित माझे भाषण आवडले असेल कारण फारच कमी नेते हे करू शकतात.”
ट्रम्प यांचे भाषण संपल्यानंतर आणखी एक गोंधळ उडाला. संपूर्ण सभागृहात आवाज ऐकूच येत नव्हता. जागतिक नेत्यांना भाषण ऐकण्यासाठी इअरपीस घालावे लागले.
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनीच थेट ट्रम्पला सांगितले :
“तुम्ही बोललात ते काहीच ऐकू आलं नाही!”
यामुळे ट्रम्प संतप्त झाले आणि त्यांनी या तिन्ही घटनांना “तिहेरी तोडफोड” ठरवले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia Iran Deal : रशिया-इराणमध्ये झाला गुप्त अणुकरार; 8 नवीन धोकादायक प्रकल्पांमुळे जागतिक स्तरावर संतापाची लाट
ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांकडे तात्काळ चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी विशेषत: एस्केलेटरवरील आपत्कालीन स्टॉप बटण आणि सुरक्षा कॅमेऱ्यांचे फुटेज जपून ठेवण्याचा आदेश द्यावा, असे म्हटले आहे.
ते म्हणाले :
“मला संयुक्त राष्ट्रांकडून दोनच गोष्टी मिळाल्या एक सदोष एस्केलेटर आणि एक निकामी टेलिप्रॉम्प्टर. हे सर्व आधीपासून आखलेले षड्यंत्र आहे.”
या आरोपांवर संयुक्त राष्ट्रांनी प्रत्युत्तर दिले आहे. सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी सांगितले की, एस्केलेटर थांबण्यामागे सुरक्षा प्रणाली कारणीभूत होती. त्यांच्या मते, एस्केलेटरच्या वरच्या भागातील “कंघी पायरी” सक्रिय झाल्यामुळे प्रणाली आपोआप बंद झाली. ही यंत्रणा लोक अडकू नयेत म्हणून बसवलेली असते. तंत्रज्ञांनी लगेच एस्केलेटर रीसेट केला आणि ट्रम्प सभागृहात पोहोचले. उर्वरित समस्यांवरही अधिकृत चौकशी सुरू असल्याचे संयुक्त राष्ट्रांकडून सांगण्यात आले.
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी म्हटले :
“जर संयुक्त राष्ट्रांमध्ये कोणीतरी जाणूनबुजून एस्केलेटर अडवले असेल, तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे.”
ही संपूर्ण घटना केवळ तांत्रिक त्रुटी होती की खरोखरच एखाद्या मोठ्या कटाचा भाग होता? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. मात्र, ट्रम्प यांच्या आरोपांमुळे संयुक्त राष्ट्रांच्या विश्वसनीयतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राजकारणातील कट-कारस्थानं, सुरक्षेतील त्रुटी आणि जागतिक स्तरावरची प्रतिष्ठा या सगळ्यांचा संगम या घटनेत दिसतो. ट्रम्प यांच्या या विधानांमुळे आंतरराष्ट्रीय पटलावर नव्या चर्चांना तोंड फुटणार हे नक्की.