
Zimbabwe Lake Kariba boat accident 2026
दक्षिण आफ्रिकेतील झिम्बाब्वे (Zimbabwe) देशातून एक अत्यंत वेदनादायी आणि सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. झिम्बाब्वे आणि झांबियाच्या सीमेवर असलेल्या जगातील सर्वात मोठ्या मानवनिर्मित ‘करिबा सरोवरात’ (Lake Kariba) प्रवाशांनी खच्चून भरलेली एक बोट अचानक उलटली. या भीषण दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण अद्याप पाण्यात बेपत्ता आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत ७७ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे, ज्यांना सरोवरातील ‘लॉन्ग आयलंड’ वर सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी घडली. ‘म्बूया नेहांदा’ (Mbuya Nehanda) नावाची ही बोट उत्तरेकडील करिबा शहरातून चालला (Chalala) येथील मच्छीमार शिबिरांकडे प्रवाशांना घेऊन जात होती. हा मार्ग स्थानिक ग्रामीण नागरिक दैनंदिन वाहतुकीसाठी नियमितपणे वापरतात. मात्र, प्रवासाच्या दिवशी हवामान अत्यंत खराब होते आणि सरोवरात उंच लाटा उसळत होत्या. प्रत्यक्षदर्शींच्या मते, बोट जेव्हा करिबा सरोवराच्या मध्यभागी पोहोचली, तेव्हा तिचा सामना पाण्याच्या प्रचंड प्रवासाशी आणि शक्तिशाली लाटांशी झाला. लाटांच्या प्रचंड दणक्यामुळे बोटीचे इंजिन अचानक बंद पडले आणि क्षमतेपेक्षा जास्त वजन असल्याने बोटीचा समतोल पूर्णपणे बिघडला आणि ती क्षणार्धात पाण्यात उलटली.
या दुर्घटनेचे सर्वात मोठे कारण म्हणजे सुरक्षा नियमांकडे केलेले दुर्लक्ष आणि ‘ओव्हरलोडिंग’ असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. अधिकृत माहितीनुसार, या बोटीची कमाल प्रवासी क्षमता केवळ ९० लोकांची होती. मात्र, तिकिटांच्या नोंदीनुसार बोटीत ११४ प्रौढ नागरिक आणि ५ कर्मचाऱ्यांसह तब्बल ११९ हून अधिक लोक सवार होते. याशिवाय, तिकिट न लागणाऱ्या लहान मुलांची संख्या या नोंदींमध्ये समाविष्ट नव्हती, ज्यामुळे अपघाताच्या वेळी बोटीत १६० हून अधिक नागरिक प्रवास करत असावेत असा अंदाज वर्तवला जात आहे. स्थानिक खासदार मुत्सा मुरोंबेद्झी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये, ही जुनी बोट किनाऱ्यावरून निघतानाच लोकांच्या मनात तिच्या सुरक्षेबाबत शंका निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Typhoon Dolphin: चीनमध्ये ‘डॉल्फिन’ चक्रीवादळाचे थैमान! मुसळधार पावसासह महापुर; 10 लाखांहून अधिक नागरिक सुरक्षित स्थळी हलवले
अपघाताची बातमी समजताच झिम्बाब्वेच्या ‘सिव्हिल प्रोटेक्शन युनिट’ (CPU) आणि स्थानिक पोलिसांच्या पाणबुडी पथकांनी (Sub-Aqua Unit) व्यापक बचाव मोहीम सुरू केली. बचावकार्यासाठी वेगवान बोटी आणि लष्कराचे हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. पाण्यात बुडणाऱ्या ७७ जणांना तात्काळ बाहेर काढून जवळच्या बेटावर प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. आतापर्यंत १५ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, त्यांची ओळख पटवण्याचे आणि शवविच्छेदनाचे काम सुरू आहे. मात्र, अजूनही २७ हून अधिक नागरिक बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
This is the (RIDA) Rural Infrastructure Development Agency transport boat that capsized in Lake Kariba yesterday. RIDA is a government agency. Captured here it was loading for one of its previous voyages from rural Kariba Nyaminyami to Kariba Urban a journey of upto 5hrs or so.… pic.twitter.com/nGbQwwy5pD — Mutsa Murombedzi MP🇿🇼 (@mutsamu) August 12, 2026
credit – social media and Twitter
करिबा सरोवर हे झिम्बाब्वे आणि शेजारील झांबिया देशाच्या सीमेवर, राजधानी हरारेपासून ईशान्येकडे सुमारे ३०० किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. हे पाण्याच्या आकारमानानुसार जगातील सर्वात मोठे मानवनिर्मित सरोवर मानले जाते. १९५० च्या दशकाच्या शेवटी प्रसिद्ध झांबेझी नदीवर ‘करिबा धरण’ बांधल्यानंतर या विशाल सरोवराची निर्मिती झाली. ५,४०० चौरस किलोमीटरहून अधिक क्षेत्रफळ असलेल्या या सरोवराची लांबी २०० किलोमीटरपेक्षा जास्त आणि रुंदी ४० किलोमीटरपर्यंत आहे. या विशाल जलसाठ्यामुळे येथे बऱ्याचदा समुद्रासारख्या मोठ्या लाटा निर्माण होतात, ज्यामुळे खराब हवामानात जलवाहतूक करणे अत्यंत धोकादायक ठरते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Elephant Day : पृथ्वीवरील सर्वात मोठ्या सजीवाच्या अस्तित्वाची लढाई; जाणून घ्या जागतिक हत्ती दिनाचा इतिहास आणि महत्त्व
या भीषण अपघातामुळे झिम्बाब्वे प्रशासनाच्या कारभारावर आणि सुरक्षा मानकांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. क्षमता ९० असताना १६० च्या आसपास प्रवाशांना जुन्या बोटीत बसू कसे दिले गेले? खराब हवामानाचा इशारा असतानाही बोटीला प्रवासाची परवानगी कोणी दिली? असे तीव्र सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी झिम्बाब्वे सरकारने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच या अपघाताला ‘राष्ट्रीय आपत्ती’ (State of Disaster) घोषित करण्याची शिफारस करण्यात आली आहे.