मुंबई : ‘अवाडा समूह’ (Avaada Group) या भारतातील आघाडीच्या ऊर्जा संक्रमण कंपनीने ‘रोबोटिक क्लीनिंग सोल्युशन्स’ (Robotic Cleaning Solutions) वापरून सोलर मॉड्युल्सची (Solar Modules) देखभाल करून घेण्यासाठी इस्रायलमधील ‘एअरटच सोलर’ या कंपनीशी दीर्घकालीन करार केला आहे. ‘अवाडा सोलर फार्म्स’मध्ये ‘एअरटच रोबोटिक क्लीनिंग सिस्टीम’चा पुरवठा, उभारणी, चाचणी, कार्यान्वयन आणि देखभाल अशी कामे करण्यात येतील. या कराराची मुदत २५ वर्षे आहे.
या हातमिळवणीबद्दल बोलताना ‘अवाडा समुहा’चे सीओओ किशोर नायर म्हणाले, “एअरटच रोबोटिक टेक्नॉलॉजी सोल्युशन्स ही कंपनी ‘सोलर मॉड्युल्स’वर जमा झालेली धूळ साफ करून आमच्या प्लॅंटच्या कार्यक्षमतेत सुधारणा करेल. त्यामुळे आमचा तोटा कमी होईल. कमी पाऊस असलेल्या, कोरड्या भागांत पाण्याची बचत साधून शाश्वत मूल्ये टिकविण्याची आमची कटिबद्धता या एअरटचसोबतच्या भागीदारीमुळे साधली जाईल. अचूक असे हे इस्रायली तंत्रज्ञान भारतात वापरले जाणार असल्याने “मेड इन इंडिया” हे तत्व अमलात येऊन दोन्ही कंपन्यांसाठी हितकारक ठरणार आहे.”
या सहयोगाबद्दल ‘एअरटच सोलर’चे सीईओ ताल लौफर म्हणाले, “आम्ही भारतातील आमच्या कामकाजाचा विस्तार करीत आहोत, कारण भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे. अवाडासारख्या आघाडीच्या विकसकाकडून आम्हाला ऑर्डर्स मिळाल्याने एअरटच रोबोट्सची गुणवत्ता आणि विश्वासार्हता सिद्ध होते. गेल्या काही वर्षांत स्थानिक उत्पादन, लॉजिस्टिक्स, सेवा आणि विक्रीची पायाभूत सुविधा या माध्यमातून आम्ही येथील ग्राहकांशी जवळीक साधली आहे, तसेच गुणवत्तापूर्ण सेवा व त्वरीत प्रतिसाद अशी सुधारणाही घडवली आहे.”
‘एअरटच’ची कार्यपद्धती अंमलात आणणे सोपे आहे आणि धुळीमुळे होणारे नुकसान त्यातून कमी होते. हे रोबो तैनात करून आम्ही ८० ते १०० लिटर पाणी प्रति मेगावॅट इतकी बचत करू शकू. या तंत्रज्ञानामुळे साफसफाईचे काम जलद गतीने होईल, वीजनिर्मिती वाढेल आणि एकंदरीत उत्पन्नही वाढेल.
‘सर्वांसाठी वीज’ हे सरकारचे ध्येय आहे आणि ते साध्य करण्यासाठी सौरऊर्जा महत्त्वाची भूमिका बजावत आहे. २०३० पर्यंत ५०० जीडब्ल्यू एवढी अपारंपरीक ऊर्जा क्षमता गाठण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. ते साध्य करण्यात अवाडा समुहाची महत्त्वाची भूमिका असणार आहे. एअरटचसोबतचे पाणी वाचवण्याचे आणि प्रकल्प अधिक कार्यक्षम बनविण्याचे साह्य आम्हाला त्यात लाभणार आहे,” असे किशोर नायर यांनी पुढे म्हटले.
या कराराचा एक भाग म्हणून, एअरटच कंपनी तिच्या राजस्थानातील भाडला आणि महाराष्ट्रातील पानगाव व दमणगाव येथील प्लॅंट्समध्ये सोलर मॉड्युल्स ड्राय-क्लीन करण्यासाठी रोबोटिक सोल्युशन्स वापरेल. या प्रकल्पांच्या अनेक परस्परमान्य टप्प्यांमध्ये रोबोंचा पुरवठा आणि त्यांचे कार्यचालन ही व्यवस्था एअरटच करेल. त्याकरीता ६ लाख डॉलर इतका खर्च गृहीत धरण्यात आला आहे. या व्यतिरिक्त, पुढील २५ वर्षांसाठी प्रकल्पाचा सर्वसमावेशक वार्षिक देखभाल करार करण्यात येईल आणि त्यासाठी ‘एअरटच’तर्फे १४ लाख डॉलरची आकारणी करण्यात येईल.
कंपनीने विकसित केलेले कोरडे (पाणीमुक्त) रोबोटिक क्लिनिंग सोल्युशन हा सोलर पॅनेलवर साठलेल्या धुळीच्या समस्येवरील एक आदर्श उपाय आहे. २०२५पर्यंत रोबोटिक क्लीनिंग सोल्युशन्सची बाजारपेठ ११ अब्ज डॉलर इतकी होईल, असा अंदाज आहे. सध्या या पॅनेल स्वच्छ करण्याच्या बाजारपेठेत ९५ टक्के काम हे रोबोटिक क्लिनिंग सोल्युशनशिवाय होत आहे.






