फोटो सौजन्य: =iStock
सणासुदीच्या वेळेस अनेक ऑटो कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी धमाकेदार डिस्कॉउंट्स देत असतात. नुकतेच महाराष्ट्रात गुढीपाडवा मोठ्या धुमधडाक्यात साजरा झाला. या शुभ मुहूर्तावर अनेक जण नवीन वाहनं खरेदी करताना दिसतात. या सणाच्या दिवशी बजाजच्या वाहनांमधील विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्रात ऑटो क्षेत्रातील मोठी कंपनी बजाजने एकाच दिवसात विक्रमी 26,938 वाहनांची विक्री केली. यामध्ये कंपनीच्या लोकप्रिय बाईक्ससह इलेक्ट्रिक स्कूटर चेतकचा देखील समावेश आहे. कंपनीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गुढीपाडव्याच्या सणानिमित्त महाराष्ट्रात बजाजने आतापर्यंतची सर्वाधिक एका दिवसाची विक्री नोंदवली आहे. अंदाजानुसार, ही विक्री गेल्या वर्षी गुढीपाडव्याच्या विक्रीच्या जवळपास दुप्पट होती आणि दिवाळीसारख्या मोठ्या सणांच्या विक्रीपेक्षाही जास्त होती.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात वाहनांची ताबडतोड विक्री, मोडला मागील वर्षाचा रेकॉर्ड
पुण्यातील बजाज ऑटोने गुढीपाडव्याच्या दिवशी एकूण 19,017 बाईक्स आणि 6,570 इलेक्ट्रिक चेतक स्कूटर विकल्या, जे एकूण चेतक विक्रीच्या जवळपास एक चतुर्थांश आहे. याशिवाय, कंपनीने 658 केटीएम बाइक्स आणि 693 प्रीमियम ट्रायम्फ बाईक्स विकल्या.
कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नुकत्याच लाँच झालेल्या प्रीमियम चेतक 35 सीरिजच्या प्रचंड मागणीमुळे ही विक्रमी विक्री शक्य झाली आहे. ही सीरिज ₹ 1 लाखांपेक्षा जास्त किंमत असलेल्या विभागात येते. चेतक 3502 ची सुरुवातीची किंमत ₹ 1.30 लाख पासून आहे तर उच्च व्हेरियंटची किंमत ₹ 1.42 लाख पर्यंत आहे.
₹ 1 लाख आणि त्याहून अधिक प्रीमियम कॅटेगरीमध्ये बजाजचा बाजार हिस्सा पूर्वी सुमारे 15% होता, जो या नवीन उत्पादनामुळे वाढण्यास मदत होऊ शकते. सध्या, इलेक्ट्रिक स्कूटर बाजारपेठेत या विभागाचा वाटा जवळजवळ 50% आहे.
दुसरे प्रमुख कारण म्हणजे बजाजचे त्यांच्या मूळ राज्यात मजबूत डिस्ट्रिब्युशन नेटवर्क आहे, जिथे त्यांच्या बहुतेक दुचाकी वाहनांचे उत्पादन केले जाते. अंदाजानुसार, कंपनीचे महाराष्ट्रात 1200 हून अधिक डीलर्स आहेत.