फोटो सौजन्य: iStock
महाराष्ट्रात नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याने होते. त्यामुळेच हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. या नववर्षाच्या शुभमुहूर्तावर अनेक जण नवीन वाहनं खरेदी करत असतात. त्यामुळेच सर्वच वाहन उत्पादक कंपन्या आपल्या वाहनांवर आकर्षक सूट देत असतात.
चैत्र नवरात्र आणि गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या हिंदू नववर्षाच्या सुरुवातीच्या निमित्ताने महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबईसह राज्यभरात वाहनांची विक्री विक्रमी उच्चांकावर होती. राज्य सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गुढीपाडव्यानिमित्त गेल्या 7 दिवसांत महाराष्ट्रात टू व्हीलर , फॉर व्हीलर आणि इतर वाहनांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
1 एप्रिल 2025 पासून Maruti Suzuki ची ‘ही’ कार मार्केटला कायमचा करणार टाटा बाय बाय
2024 च्या तुलनेत यावर्षी वाहन नोंदणीमध्ये 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अनेक नागरिक नवीन वाहने खरेदी करतात आणि या वाहनांची नोंदणी संबंधित प्रादेशिक आणि उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत केली जाते. वाहन खरेदी करण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह होता, त्यामुळे यावर्षी वाहन नोंदणीमध्ये 30 टक्के वाढ नोंदली गेली. आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत 20,057 अधिक वाहने खरेदी करण्यात आली आहेत.
फॉर व्हीलर वाहनांच्या सेगमेंटमध्ये, 2025 मध्ये 22,081 वाहनांची नोंदणी झाली, जी मागील वर्षाच्या तुलनेत 4,942 जास्त आहे. ही 28.84% ची वाढ दर्शवते. त्याचप्रमाणे, बाईक आणि स्कूटरसह टू व्हीलर सेगमेंटमध्ये, 2025 मध्ये नागरिकांकडून 51,756 नवीन वाहने खरेदी होण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी ही संख्या 40,675 होती. ही 11,081 ची वाढ आहे, जी 27.14% अधिक नोंदणी दर्शवते. राज्यात सर्वाधिक वाहन नोंदणी पाच प्रमुख परिवहन कार्यालयांअंतर्गत झाली. यापैकी 11,056 नोंदणी पुणे परिवहन कार्यालयात, 6,648 पिंपरी-चिंचवड परिवहन कार्यालयात, 3,626 नाशिक येथे, 3,154 मुंबई (मध्य) परिवहन कार्यालयात आणि 3,107 वाहन नोंदणी ठाणे परिवहन कार्यालयात झाल्याचे परिवहन विभागाने सांगितले.
चैत्र नवरात्रीनिमित्त महाराष्ट्रातील नागपूर दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनीही लोकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी यावेळी मराठी भाषेत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आरएसएस मुख्यालयात डॉ. हेडगेवार आणि गुरुजींना पुष्पांजली अर्पण केल्यानंतर पंतप्रधान मोदी दीक्षाभूमीला गेले. यानंतर त्यांनी माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी, जेव्हा पंतप्रधान मोदींनी मराठीत अभिनंदन केले तेव्हा सभास्थळ टाळ्यांच्या कडकडाटात दुमदुमले.