फोटो सौजन्य: iStock
लय हवेत उडतो का? असे आपण नेहमीच कोणाला तरी टोमणा मारताना म्हणत असतो. पण जर आम्ही तुम्हाला सांगितले की आता हवेत उडणे शक्य आहे तेही टॅक्सिच्या मदतीने तर. हो हे खरे आहे. लवकरच देशात फ्लाइंग टॅक्सी सुरु होणार असल्याचे बोलले जात आहे.
कर्नाटक राज्यातील बंगळुरू हे देशातील आयटी हब म्हणून ओळखले जाते. परंतु याच शहरात आता सतत ट्रॅफिक जाम पाहायला मिळते. आता या ट्रॅफिकमधून तेथील रहिवाश्यांची सुटका होणार आहे. शहरात एअर टॅक्सी सुरू होणार असून, त्यामुळे तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.
मनी कंट्रोलच्या अहवालानुसार, सरला एव्हिएशन आणि बेंगलुरु इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (BIAL) मिळून शहरात इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी सुरू करणार आहेत. ही एअर टॅक्सी शहरातील प्रमुख ठिकाणी आणि विमानतळाजवळ चालविली जाऊ शकते. ही फ्लाइंग टॅक्सी सुरू झाल्यास लोकांचा प्रवासातील बराच वेळ वाचणार आहे.
अहवालानुसार, या भागीदारी अंतर्गत प्रगत एअर मोबिलिटी सोल्यूशन्सवर लक्ष केंद्रित केले आहे. या एअर टॅक्सी केवळ वेळच वाचणार नाही, तर प्रदूषणही कमी होणार आहे. ही एअर टॅक्सी जलद आणि पर्यावरणपूरक बनवण्यावरही कंपनीचा भर असणार आहे.
हे देखील वाचा: कारमधील ‘हे’ सेफ्टी फिचर देते सुरक्षेची हमखास हमी, जाणून घ्या याची काम करण्याची पद्धत
एअर टॅक्सीने प्रवास केल्यास आपला बराच वेळ वाचणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने इंदिरानगर ते विमानतळापर्यंत प्रवास केला तर त्याला साधारण 1.5 तास लागतील, तर या फ्लाइंग टॅक्सी सह हा प्रवास फक्त 5 मिनिटात पूर्ण केला जाणार आहे. रिपोर्ट्सनुसार, जर ही एअर टॅक्सी सुरू झाली तर सुमारे 20 मिनिटांच्या प्रवासासाठी प्रति व्यक्ती 1700 रुपयांचा खर्च येऊ शकतो.
एअरटॅक्सीचा हा प्रकल्प अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. या फ्लाइंग टॅक्सीचा प्रोटोटाइप अजून बनवायचा आहे. तसेच, रेगुलेटरी मान्यता मिळण्यासाठी काही वर्षे लागू शकतात. BIAL च्या मते, ही सेवा बेंगळुरूमध्ये सुरू होण्यासाठी सुमारे दोन ते तीन वर्षे लागू शकतात.