
हार्ले-डेव्हिडसन आणि हिरो मोटोकॉर्प मधील भागीदारी आता एका मोठ्या टप्प्यात प्रवेश करत आहे. या भागीदारीअंतर्गत भारतात अनेक प्रीमियम बाइक्स लाँच केल्या जाणार असून, येथून परदेशातही गाड्या निर्यात करण्याची योजना आहे. अमेरिकन ब्रँड ‘हार्ले-डेव्हिडसन’ भारतीय बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय स्तरासाठी एन्ट्री-लेव्हल मोटारसायकल्स आणि क्रूझर बाइक्सची मोठी श्रेणी तयार करण्यासाठी हिरोच्या उत्पादन क्षमता आणि वितरण नेटवर्कचा वापर करणार आहे.
या नव्या लाँचिंग सायकलची सुरुवात चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस ‘हार्ले-डेव्हिडसन स्प्रिंट’ या बाइकने होण्याची शक्यता आहे. ‘स्प्रिंट’ नंतर येणाऱ्या बाइक्स प्रीमियम कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या किंमतींच्या रेंजमध्ये उपलब्ध असतील. भारतात उत्पादन सुरू झाल्यानंतर, यातील काही मॉडेल्स पहिल्यांदाच परदेशातही विकली जातील.
राजस्थानमधील प्लांट ठरणार महत्त्वाचा केंद्रबिंदू
या विस्तारीकरण योजनेत हिरो मोटोकॉर्पच्या राजस्थानमधील नीमराना प्लांटची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल. या प्लांटमध्ये हार्ले-डेव्हिडसनसाठी हाय-कॅपॅसिटी मोटारसायकल्स आणि दोन्ही कंपन्यांनी मिळून विकसित केलेली नवीन मॉडेल्स तयार केली जाऊ शकतात. भारतात उत्पादन होत असल्यामुळे हार्ले-डेव्हिडसनला जागतिक बाजारपेठेत गाड्यांची किंमत कमी ठेवण्यास मदत होईल, तसेच हिरोच्या नेटवर्कमुळे ग्राहकांपर्यंत पोहोचणे सोपे होईल.
यापूर्वी या भागीदारीतून ‘हार्ले-डेव्हिडसन X440’ आणि हिरो ब्रँडची ‘मॅव्ह्रिक 440’ बाजारात आली आहे, ज्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नुकतीच ‘हार्ले-डेव्हिडसन X440T’ सुद्धा या ताफ्यात सामील झाली आहे.
Harley Davidson Sprint 440: भारतात तयार होणारी सर्वात स्वस्त हार्ले, जाणून घ्या फीचर्स आणि लाँच डेट
प्रीमियम सेगमेंटमध्ये पकड मजबूत
या संयुक्त प्लॅटफॉर्ममुळे हिरो मोटोकॉर्पने ३५० सीसी ते ५०० सीसी सेगमेंटमध्ये स्वतःचे स्थान मजबूत केले आहे. मागील आर्थिक वर्षात हिरोने या सेगमेंटमध्ये १४,३७५ बाइक्सची विक्री करून ११ टक्के हिस्सा मिळवला आहे. या श्रेणीत हिरो सध्या रॉयल एनफिल्ड आणि बजाज ऑटोच्या मागे असली, तरी आगामी प्रीमियम बाइक्ससाठी हा एक भक्कम पाया ठरला आहे.
या गाड्यांसाठी कंपनी आपले प्रीमियम शोरूम्स नेटवर्कही वाढवत असून, सध्या १३० हून अधिक प्रीमियम आउटलेट्स सुरू आहेत.
जागतिक घसरणीनंतर हार्लेचा नवा डाव
२०१९ ते २०२५ दरम्यान जागतिक बाजारपेठेत हार्ले-डेव्हिडसनच्या विक्रीत ४० टक्क्यांची मोठी घसरण झाली होती. त्यामुळे केवळ महागड्या बाइक्सवर अवलंबून न राहता, सर्वसामान्यांच्या बजेटमधील आणि परफॉर्मन्स देणाऱ्या बाइक्स आणून जागतिक विक्री वाढवण्याचा हार्लेचा हा प्रयत्न आहे.