फोटो सौजन्य: Freepik
देशभरात सर्वत्र वादळी वाऱ्यासह पाऊस जोमाने बरसत आहे. या पावसाळ्यात जर तुम्ही इलेट्रीक कार्सचा वापर करत असाल तर इलेक्ट्रिक कारला चार्ज करण्याची समस्या नेहमीच उद्भवते. पावसाळ्यात इलेक्ट्रिक कार चार्ज करणे कितपत सुरक्षित आहे आणि चार्जिंग करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
पूर्वीच्या कार्समध्ये फक्त पेट्रोल आणि डिझेल वापरले जायचे. पण बदलत्या काळानुसार, अनेक कार्स प्रगतशील होऊ लागल्या. कालांतराने इलेक्ट्रिक कार्सचा जोर मार्केटमध्ये वाढू लागला. पण या कार्सची एक मोठी समस्या म्हणजे मर्यादित ठिकाणी असणारे चार्जिंग पॉईंट्स. तसेच पावसाळ्यात या कार्सना चार्ज करणे अजूनच कठीण होऊन बसते. पण काही गोष्टी लक्षात ठेवल्यास इलेक्ट्रिक कार सहज चार्ज करता येते.
जेव्हा कोणतीही कंपनी आपली इलेक्ट्रिक कार बाजारात आणते, तेव्हा अनेक टप्प्यांत त्याची चाचणी केली जाते, त्यानंतरच ती कार बाजारात आणली जाते. सर्व प्रकारच्या हवामानात काम करण्यासाठी अनेक ब्रॅण्ड्स इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जर आणि कनेक्टर बनवतात. यासोबतच त्यांचा दर्जाही चांगला ठेवला जातो. ईव्ही कार बनवताना त्याचे चार्जर आणि कनेक्टर पूर्णपणे वॉटरप्रूफ बनविले जातात. तसेच त्यांना धूळ, माती किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या कणांपासून वाचवण्यासाठी विशेष तंत्रज्ञान वापरले जाते. यामुळेच पावसाळ्यात तुमच्या इलेकट्रीक कारला चार्ज करणे नक्कीच सुरक्षित आहे.
तुम्ही तुमची कार चार्ज करण्याच्या तयारीत असाल तर गाडी चालवल्यानंतर लगेच चार्जिंगला लावू नका. कारण गाडी चालवल्यामुळे बॅटरीचे तापमान वाढते आणि चार्जिंगवर ठेवल्याने त्याचे तापमान अधिक वाढू शकते. तसेच, पावसाळ्यात आपली कार कुठल्यातरी शेड खाली पार्क करा, जेणेकरून चार्जरवर पाण्याचे थेट थेंब पडणार नाहीत.