सुनयना सोनवणे/पुणे: पुणे शहर आणि आजूबाजूच्या उपनगरात वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे निसर्गाच्या नैसर्गिक संतुलनाला धक्का बसतो आहे. पर्यावरण तज्ञांच्या म्हणण्यानुसार आर्थिक प्रगतीला प्राधान्य देताना आपण पर्यावरणीय सीमा ओलांडत आहोत. शाश्वत विकास आणि पर्यावरण हे हातात हात घालून चालायला हवे, पण सध्या नेमके उलट दिशेने आपण जात आहोत. शहरांची उंची आणि रुंदी दोन्ही वाढत असताना निसर्गाची परिस्थिती मात्र अधिक गंभीर होत चालली आहे. वृक्षतोड, जलाशयांचे गैरव्यवस्थापन आणि प्रदूषण यामुळे नैसर्गिक पारिस्थितिकी संकटात आहे.
बांधकामाचा धुमाकूळ
शहरी विस्तारामुळे शहरातील हिरवे पट्टे आणि जंगल झपाट्याने कमी होत आहेत. मोठमोठे रस्ते, मॉल्स आणि गाळाचे रेसिडेन्शियल प्रकल्प निसर्गाला नुकसान पोहोचवत आहेत. पावसाचे पाणी नद्या आणि तलावांपर्यंत पोहोचण्याऐवजी रस्त्यांवर वाहते, परिणामी ओला-कोरडा दुष्काळ अधिक गंभीर होत आहे. जर आपण बांधकाम आणि निसर्ग यामध्ये संतुलन ठेवले नाही, तर पाणी, माती आणि हवा हे तीनही जीवनस्रोत गंभीर संकटात येतील, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे.
प्रदूषण आणि जैवविविधतेचा नाश
औद्योगिक धूळ, वाहने आणि रासायनिक खतांचा अतिरेक हवेच्या गुणवत्तेला प्रभावित करतो, पाण्यातील प्रदूषण जीवसृष्टीसाठी धोकादायक ठरते. परिणामी काही पक्षी, प्राणी आणि वनस्पती विलुप्त होत आहेत. निसर्ग संवर्धन प्रमुखांच्या म्हणण्यानुसार जैवविविधतेच्या नाशाचा परिणाम केवळ निसर्गावर नाही तर आपल्या आरोग्यावरही होतो.
Navaratri 2025: गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचा शारदोत्सव: भक्ती, परंपरा आणि एकतेचा उत्सव
शाश्वत विकासाची गरज
शाश्वत विकास म्हणजे फक्त आर्थिक प्रगती नाही, तर पर्यावरणाचे रक्षण, सामाजिक न्याय आणि भविष्यातील सुरक्षितता यांचा समन्वय आहे. परंतु सध्या विकासाला प्राधान्य देताना पर्यावरण बाजूला ठेवले जात आहे.
या साठी केवळ शासनानेच नव्हे तर समाजातील प्रत्येकाने एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. यासाठी
विविध उपाय योजना राबविण्यात येतात. त्या संदर्भात नागरिक म्हणून सजग असणे महत्वाचे आहे. वृक्षारोपण आणि हिरवळ राखणे, नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांचा वापर, जलस्रोतांचे शाश्वत नियोजन, प्रदूषण नियंत्रण व कचरा व्यवस्थापन, पर्यावरणीय कायद्यांचे कडक पालन करणे इत्यादी गरजेचे आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपलीच जबाबदारी आहे. अन्यथा या सीमोलंघनाचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील.
पर्यावरणीय सीमोलंघन थांबवण्यासाठी विकास आणि निसर्ग यांचा समन्वय अनिवार्य आहे. आर्थिक प्रगतीसाठी निसर्गाचे बलिदान देणे आता फक्त धोकादायकच नव्हे तर शाश्वत भविष्यालाही धोका ठरणारे आहे. त्यामुळे या दसऱ्याला बाजारात जाऊन पैसे खर्च करून आणलेल्या पानांना सोने म्हणत ते लुटून कचरा करण्यापेक्षा आपट्याचे झाड लावून खऱ्या अर्थाने सीमोलंघन करता येईल.