
Mahindra BE6 ला कशामुळे लागली आग? अखेर कंपनीने दिले 'हे' स्पष्टीकरण
भारतामधील आघाडीची वाहन निर्माता कंपनी महिंद्रा विविध सेगमेंटमध्ये आपली कार ऑफर करते. कंपनीकडून इलेक्ट्रिक एसयूव्ही म्हणून Mahindra BE6 देखील बाजारात उपलब्ध आहे. अलीकडेच या एसयूव्हीला आग लागल्याची घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. या घटनेनंतर महिंद्राने आग लागण्यामागील कारणांबाबत अधिकृत माहिती दिली आहे. नेमके काय कारण होते आणि कंपनीने काय सांगितले आहे? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
उत्तर प्रदेशातील हापूड येथे नुकतीच महिंद्राची इलेक्ट्रिक एसयूव्ही Mahindra BE6 ला आग लागण्याची घटना घडली. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. यानंतर अनेकांनी या घटनेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.
या घटनेनंतर कंपनीकडून सांगण्यात आले की, इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या सेन्सर डेटा आणि सॉफ्टवेअर डायग्नोस्टिक्सची सखोल तपासणी करण्यात आली आहे. तपासणीतून असे स्पष्ट झाले की वाहनातील सर्व सेफ्टी फीचर्स योग्यरित्या कार्यरत होते. यामध्ये ESP, Traction Control System आणि TPMS यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, ऑनबोर्ड डेटामधून असे समोर आले आहे की कारचा मागील उजवा टायर पंचर झाला होता. तरीसुद्धा वाहन 60 किलोमीटर प्रति तास वेगाने 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ चालवण्यात आले. या काळात TPMS प्रणालीकडून अनेक वेळा इशारे देण्यात आले होते. डेटानुसार, खराब झालेल्या टायर आणि रस्त्यामधील जास्त घर्षणामुळे उजव्या चाकाचे तापमान वाढले आणि अलर्ट जारी झाला. त्यानंतरच ही दुर्घटना घडली.
Citroen Aircross X महागली रे! कोणत्या व्हेरिएंटची किती किंमत वाढली? जाणून घ्या
कंपनीने पुढे स्पष्ट केले की प्रथम एसयूव्हीच्या टायरला आग लागली आणि त्यानंतर संपूर्ण वाहन आगीच्या तडाख्यात आले. घटनास्थळी उपस्थित लोकांनी काढलेल्या व्हिडिओ फुटेजमधूनही याची पुष्टी होत आहे.
बुलंदशहर जिल्ह्यातील कोतवाली देहात बुलंदशहरच्या स्याना अड्डा परिसरातील रहिवासी अमन खरबंदा रविवारी आपल्या इलेक्ट्रिक कारने बुलंदशहरहून हापूड येथे कोणत्या तरी कामासाठी जात होते, तेव्हा ही घटना घडली. हाफिजपूर पोलीस ठाणे हद्दीतील कुराणा टोल प्लाझाजवळ पोहोचताच अचानक कारमधून धूर येऊ लागला आणि काही क्षणांतच कारला आग लागली.