
One plus Phone Company (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
काही वर्षांपूर्वी स्मार्टफोन घ्यायचा म्हटलं की अनेक तरुणांच्या तोंडी एकच नाव असायचं तो म्हणजे वनप्लस Oneplus. कमी- किमतीत दमदार फीचर्स, वेगवान परफॉर्मन्स आणि स्वच्छ सॉफ्टवेअर यामुळे या ब्रॅंडने फार कमीवेळात लोकप्रियता मिळवली होती. अनेकांनी महागड्या फोनऐवजी OnePlus निवडला आणि कंपनीने भारतातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
मात्र आता परिस्थिती बदलताना दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, OnePlus हळूहळू काही महत्त्वाच्या देशांमधील आपले कामकाज कमी करण्याच्या तयारीत आहे. सुरुवात अमेरिका आणि युरोपमधून होऊ शकते. त्यानंतर भारतातही पुढील काही काळात कंपनीची उपस्थिती कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे OnePlus वापरणाऱ्या आणि या ब्रँडवर प्रेम करणाऱ्या ग्राहकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, OnePlus ची मूळ कंपनी OPPO सध्या आपल्या व्यवसायात मोठे बदल करत आहे. खर्च कमी करणे, व्यवसायाची नव्याने मांडणी करणे आणि काही बाजारपेठांवरच लक्ष केंद्रित करणे, या धोरणाचा भाग म्हणून हा निर्णय घेतला जात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे OnePlus सोबतच कंपनीच्या इतर ब्रँडमध्येही बदल दिसू शकतात.
भारत हा चीननंतर OnePlus साठी महत्त्वाचा बाजार मानला जातो. गेल्या काही वर्षांत कंपनीच्या अनेक स्मार्टफोनना भारतीय ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे ऑनलाइन सेलमध्ये OnePlus चे फोन सातत्याने मोठ्या प्रमाणावर विकले जात आहेत. त्यामुळे कंपनी तातडीने भारतातून बाहेर पडणार नाही, अशीही चर्चा आहे. काही अहवालांनुसार, पुढील वर्षापर्यंत कंपनी येथे नवीन फोन विकत राहू शकते.
OnePlus बरोबरच अनेक कंपन्या अडचणीत…
OnePlus समोर सध्या अनेक अडचणी उभ्या आहेत. स्मार्टफोन बाजारात स्पर्धा पूर्वीपेक्षा खूपच वाढली आहे. Samsung, Xiaomi, Vivo, Realme आणि Apple यांसारख्या कंपन्या सतत नवीन मॉडेल्स बाजारात आणत आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांना टिकवून ठेवणे OnePlus साठी सोपे राहिलेले नाही.
याशिवाय, कंपनीच्या सुरुवातीच्या काळातील काही खास गोष्टीही आता बदलल्या आहेत. OnePlus ची ओळख बनलेले सॉफ्टवेअर पूर्वीसारखे राहिले नसल्याची भावना अनेक जुन्या ग्राहकांनी व्यक्त केली आहे. कंपनीचे सहसंस्थापक Carl Pei यांनी वेगळी वाट धरल्यानंतर ब्रँडची जुनी ओळख कमी झाल्याचेही काही तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे अनेक निष्ठावान ग्राहक इतर पर्यायांकडे वळले.
कंपनी नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी..
दरम्यान, OnePlus संदर्भातील या चर्चांमध्येही कंपनी नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. लवकरच OnePlus N6X भारतीय बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. त्याचा टीझरही समोर आला असून हा फोन ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध होईल, अशी माहिती मिळत आहे. यापूर्वी कंपनीने OnePlus N6 हा किफायतशीर स्मार्टफोनही सादर केला होता.
सध्या कंपनीकडून भारतातून बाहेर पडण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र जागतिक स्तरावर सुरू असलेल्या बदलांमुळे OnePlus च्या भविष्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पुढील काही महिन्यांत कंपनी नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे स्मार्टफोन बाजारासह ग्राहकांचेही लक्ष लागले आहे.