
वैभवशाली परंपरेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे राजघराण्याकडे असलेली १९३२ सालची मेबॅक कार((1932 Maybach DS8 Zeppelin). जवळपास शतकभर जुनी असलेली ही कार भारतातील सर्वात दुर्मिळ आणि ऐतिहासिक विंटेज कारपैकी एक मानली जाते. कोल्हापूरच्या शाही दसऱ्याच्या मिरवणुकीमध्ये तुम्ही ही कार नक्की पहिली असेल. या कारबद्दल काही खास गोष्टी आज जाणून घेऊयात.
जर्मनीतील प्रसिद्ध मेबॅक कंपनीने ही कार विशेषतः कोल्हापूरच्या राजघराण्यासाठी तयार केली होती. त्या काळात मेबॅक या ब्रँडच्या गाड्या जगातील अत्यंत श्रीमंत व्यक्ती, राजघराणी आणि उच्चपदस्थ व्यक्तींकडेच आढळत असत. त्यामुळे ही कार केवळ वाहन नसून राजेशाही वैभवाचे प्रतीक मानली जाते. ही कार छत्रपती राजाराम महाराज यांनी १९३६ च्या सुमारास स्वतःसाठी खास ऑर्डर देऊन बनवून घेतली होती.
या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती आजही कार्यरत आहे. जवळपास ९४ वर्षांनंतरही तिची देखभाल अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली आहे. कारची मूळ रचना, इंजिन आणि अनेक भाग जतन करण्यात आले आहेत. त्यामुळे विंटेज वाहनप्रेमींसाठी ही कार विशेष आकर्षणाचा विषय ठरते.
Kolhapur Dasara Festival : कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्यास राज्याच्या …
भगव्या रंगाची ही मेबॅक कार कारखान्यातूनच अनेक कस्टमायझेशन करून तयार करण्यात आली होती. कारच्या पुढील भागावर संपूर्ण चांदीपासून बनविलेली देवी महालक्ष्मी श्री अंबाबाईची मूर्ती तसेच देवी भवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतीक असलेले राजचिन्ह बसविण्यात आले आहे. या कारचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचे मोराच्या आकारातील खास इंडिकेटर (टर्न सिग्नल), जे शुद्ध सोन्यापासून तयार करण्यात आले आहेत. तसेच कारच्या ग्रिलच्या वर भगवा ध्वज विराजमान आहे. “कोल्हापूर नं. १” ही नंबर प्लेट या कारच्या राजेशाही वारशाची आणि परंपरेची साक्ष देते.
गेली कित्येक वर्षे ही कार कारखान्यातून ज्या स्थितीत आली होती, त्याच स्वरूपात जतन करण्यात आली आहे. फक्त तिचे टायर बदलण्यात आले आहेत. १९३२ साली ही कार अतिरिक्त पाच टायरांच्या संचासह आली होती. मूळ टायर जवळपास पाच दशकांनंतर, म्हणजे १९८६ मध्ये बदलण्यात आले. विशेष म्हणजे, कारखान्यातून मिळालेले दोन्ही टायर संच आजही राजवाड्यातील गॅरेजमध्ये सुरक्षित ठेवलेले आहेत.
दसऱ्याला कोल्हापूरच्या अंबाबाईची रथारुढ रुपात अलंकार पूजा – Navarashtra
ही कार इतकी दुर्मिळ आणि खास आहे की ती वर्षातून केवळ एकदाच लोकांसमोर येते. तो दिवस म्हणजे कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा उत्सव. या दिवशी ही कार शहरातून भव्य मिरवणुकीत सहभागी होत दसरा चौकाकडे जाते. तेथे हजारो कोल्हापूरकर राजघराण्याकडून पार पडणारे पारंपरिक धार्मिक विधी पाहण्यासाठी एकत्र जमतात.
यावेळी श्री महालक्ष्मी मंदिरातून देवी महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि गुरुमहाराज यांच्या पालख्या दसरा चौकात दाखल होतात. या शाही आणि धार्मिक सोहळ्यात मेबॅक कारचे दर्शन हा कोल्हापूरकरांसाठी विशेष आकर्षणाचा आणि अभिमानाचा क्षण असतो.
आजच्या आधुनिक युगात नवीन आणि अत्याधुनिक गाड्यांची रेलचेल असली तरी कोल्हापूरच्या राजघराण्याची ही मेबॅक कार इतिहास, परंपरा आणि राजवैभव यांचे जिवंत प्रतीक म्हणून ओळखली जाते. जवळपास शतकभराचा वारसा जपणारी ही दुर्मिळ कार महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेव्याचा एक महत्त्वाचा भाग आहे.