८ सप्टेंबर रोजी त्यांचा नव्वदावा वाढदिवस. पण त्यांच्यासाठी कायमच वय हा फक्त एक आकडा आहे. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात, आनंदात, गाण्यात, स्वभावात वय दिसले नाही. खरं तर आपले वय त्या आपल्या जवळच येऊ देत नाहीत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दुबईत त्यांच्या गाण्यांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, याची माहिती देण्याच्या पत्रकार परिषदेतही त्यांचा नेहमीचा उत्साह आणि सकारात्मक दृष्टिकोन अनुभवायला मिळाला. विविध मुद्द्यांवर-प्रश्नांवर त्या बोलल्याच पण त्या गुणगुणल्या तो अनुभव भारीच ठरला. जॅकी श्राॅफ, पद्मीनी कोल्हापूरे, पूनम धिल्लाॅन यांच्या उपस्थितीची दखल आशाजींनी घेत घेत गाण्याचे मुखडे साकारले. तू… तू है वही दिलने जिसे अपना कहा (यह वादा रहा), पूछों ना यार क्या हुआ (जमाने को दिखाना है)… आशाजींना प्रत्यक्षात असे छान गुणगुणताना अनुभवणेही एक विलक्षण अनुभव. त्यांच्या गायकीतील ताजेपणा ही आशा भोसले यांची कमाल. आजही म्हणजे दीर्घकालीन वाटचालीनंतरही त्या आजही आपला इव्हेन्टस असला तरी बरीच रिहर्सल करतात यात त्यांची कलेवरची निष्ठा व व्यावसायिक बांधिलकी दिसून येते. चित्रपट संगीताच्या सोनेरी कालखंडातील त्या शेवटच्या पाश्वगायिका हे खरेच आहे.
आशा भोसले यांच्या क्षमतेबद्दल ‘खरोखरच शब्द अपुरे पडतात’. ती दिसते, सांगावी लागत नाही. कोरोनाच्या काळात त्या लोणावळ्याला होत्या. पण तेव्हा त्यांनी आराम केला, छान हवेत रमल्या, जुन्या आठवणीत हरवल्या असे मुळीच झाले नाही. त्यांनी स्वतः यू ट्यूब चॅनल सुरू केले, त्यात काही जुन्या आठवणी व्यक्त केल्या, त्यातच नवीन आवाजाला त्यांनी आवाहन केले आणि जगभरातून त्यांना अतिशय उत्तम प्रतिसाद मिळालादेखिल. नवीन आवाज त्या ऐकतात हा त्यांच्यातील खूप वेगळा गुण आहे. विशेष म्हणजे आजही त्यांना कामाचा कंटाळा नाही. त्याच काळात एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या कट्ट्यावर त्या आल्या तेव्हा काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना दोन तास वाट पहावी लागली, पण त्या अजिबात कंटाळल्या नाहीत. अगदी दिवसभर थांबायची आपली तयारी होती, आपल्याला काम करायचेच आहे तर थांबायला काय हरकत आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आज सर्वच क्षेत्रात अनेकांना जी घाई झालीय त्यांनी यातून काही शिकायचं ठरवलं तरी पुरे.
आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक लेख लिहिणे’ म्हणजे फक्त एक वाळूचा कण आहे. खूपच मोठी यशस्वी मेहनती वाटचाल आणि त्यातील विविधता. मराठी आणि हिंदी चित्रपट गीते झालीच, अन्य भाषेतील चित्रपटांसाठी पाश्वगायन एकीकडे तर दुसरीकडे भावगीते आणि अनेक प्रकारची गैरफिल्मी गाणी. पण त्यानी मोजून-मापून काम केले आहे अथवा नवीन विक्रम प्रस्थापित करण्यासाठी त्या गायल्या-गातात असे अजिबात नाही. तो हिशेब त्यांनी ठेवला नाही. ती त्यांची वृत्ती नाही. आपल्या कामाचा भरभरून आनंद घेत इतरांनाही तो द्यावा अशा मोकळ्या स्वभावाच्या त्या आहेत. अतिशय गप्पिष्ट असा त्यांचा स्वभाव आहे. असाच एकदा त्यांचा दौरा सुरु होण्यापूर्वी पेडर रोडवरील प्रभू कुंज या त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीचा योग आला असता त्यानी सांगितलेल्या गोष्टींतील काही आवर्जून सांगतो…
फार पूर्वी एकेका चित्रपटाचे, एकेका गाण्याचे रेकाॅर्डिंग म्हणजे खूप मोठा आणि प्रत्येक वेळी वेगळा अनुभव असे. एकेका गाण्यासाठी सिटींग होत, गाण्याची चित्रपटातील जागा, त्या गाण्याचे स्वरुप, कोणावर ते चित्रीत होणार आहे अशा अनेक लहान मोठ्या तपशीलाचा विचार केला जाई, अनेक तास सिटींग चाले, त्यातच अनेक चाली सुचत, विविध कारणास्तव त्या नाकारल्या जात आणि मग एक निश्चित केली जाई. प्रत्यक्ष रेकाॅर्डिंगच्या वेळी त्या चित्रपटातील कलाकार आवर्जून हजर रहात. आपले गाणे पडद्यावर साकारणारी अभिनेत्री प्रत्यक्षात कशी बोलते, कसं ऐकते, कसे पाहते याचा आलेला प्रत्यय आम्हा गायकाना गाण्यात वापरता येई आणि आम्ही नेमके कसे गायलोय, कुठे चढ- उतार घेतले हे त्या अभिनेत्रींनी प्रत्यक्षात अनुभवल्याने त्याचा उपयोग त्या आपल्या अभिनयात करीत. त्यामुळे पूर्वीची अनेक गाणी आम्ही गात नसून ती व्यक्तिरेखा आणि ती अभिनेत्री गातेय असेच वाटते. यामागे अशी अनेक छोटी मोठी कारणे आहेत. तसेच त्यावेळी सगळा वाद्यवृंद्य एकसाथ वादन करे आणि आम्ही गायक त्यासह गात असू. रिहसर्लचा त्यासाठी फायदा होत असला तरी अनेक रिटेक होत. सगळ्याना परफेक्शनचा ध्यास असे. सर्व पातळीवर मेहनत घेतल्याने तेव्हाची गाणी आजही लोकप्रिय आहेत.
आशा भोसले यांच्या बोलण्यात अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता. आशा भोसले यांनी चित्रपट गाण्याच्या रेकाॅर्डिंगच्या बदललेल्या पध्दतीचाही कालांतराने अनुभव घेतला.
रामगोपाल वर्मा दिग्दर्शित ‘रंगीला’ (१९९५) निर्मितीवस्थेत असतानाची गोष्ट. आशा भोसले या चित्रपटातील एका गाण्याच्या रेकाॅर्डिंगसाठी चेन्नई (तेव्हाचे मद्रास) येथे गेल्या. रेकाॅर्डिंग स्टुडिओत पोहचल्यावर त्यांच्या लक्षात आले की, एकही वादक हजर नाही. असे कसे झाले? गाण्याचे रेकाॅर्डिंग म्हणजे अनेक प्रकारच्या वादनासह वादकांचा प्रचंड ताफा हवा. त्यांना इतकीच सूचना मिळाली की “हे गाणे अशा अशा पध्दती”ने (मूडने/शैलीने) गायचे आहे. ‘एक नवीन अनुभव’ असे मानतच त्या गायल्या आणि मुंबईत येऊन आपल्या कामात व्यग्र झाल्या. काही दिवसांनी ‘रंगीला’ची गाण्याची ध्वनिफीत प्रकाशित झाली आणि आशाजीनी गायलेले तेच गाणे त्यांनी ऐकले आणि त्या अवाक् झाल्या. त्या गाण्यावरचा संगीत साझ आणि त्याची उच्च तांत्रिक मूल्ये ‘ऐकून’ त्या गुणगूणू लागल्या. उर्मिला मातोंडकरने आशाजींच्या गायकीचा तो मूड आपल्या सादरीकरणात पकडलाय.
तनहा तनहा यहां पे जीना
यह कोई बात है….
त्या काळात आशाजी आपल्या ‘लाईव्ह काॅन्सर्ट’मध्ये आणि मुलाखतीत हा अनुभव अतिशय रंगवून खुलवून सांगत आणि संगीतकार ए. आर. रेहमानला दाद देत. गाण्याच्या रेकाॅर्डिंगच्या या पध्दतीशी ए. आर. रेहमानने आपल्या प्रतिभेने जुळवून घेतल्याचे त्याना विलक्षण कुतूहल आणि कौतुक असे.
आशा भोसले यांनी महेश कोडियाल दिग्दर्शित “माई” (२०१३) या चित्रपटात शीर्षक भूमिका साकारली. या चित्रपटात राम कपूर आणि पद्मिनी कोल्हापूरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली तेव्हा त्यांचे प्रत्यक्षातील वय ७९ इतके होते तर ही भूमिका अल्मायझर झालेल्या ६४ वर्षांच्या स्रिची होती. गायन असो वा अभिनय; यात सोपे असे काहीच नाही असे त्यानी यावेळी मत व्यक्त केले होते. तर आजच्या चित्रपट गीत संगीतामधून एक्सप्रेशन मेलडी (गाण्याचा भावार्थ) पूर्णपणे हरवला आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक गाण्याला आपलं एक व्यक्तीमत्व असते आणि तेच आज नेमके हरवले आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आशा भोसले यांच्या करिअरचा वेध घ्यायचा तर ओटीटीवर एक महामालिका तयार करावी लागेल, तरीही त्यात काही कमतरता राहिल. इतके आणि असे अफाट कर्तृत्व आणि प्रतिभा असलेले हे कायमच मनाने तारुण्यात असलेले व्यक्तिमत्व आहे.
आईये मेहरबां (हावडा ब्रिज), आजा आजा मै हू प्यार तेरा (तिसरी मंझिल), चुरा लिया है तुमने जो दिलको (यादों की बारात), दिल चीज क्या है मेरी (उमराव जान), मेरा कुछ सामान (इजाजत) ही पाचही गाणी एकाच गायिकेची आहेत यावर पटकन विश्वास बसू नये, पण ती आशा भोसले यांनीच गायलीत ही वस्तुस्थिती आहे, यातच त्यांच्या गायिकीची रेंज, त्यावरचे प्रभूत्व लक्षात येते. आणि आपल्या जगभरातील अनेक देशांत स्टेज शोजमध्येही त्या संपूर्ण स्टेजवर आपल्या व्यक्तिमत्व आणि उत्फूर्त गायनाचा प्रभाव दाखवतात, अशी त्यांची वैशिष्ट्ये वाढत वाढत जाताहेत….आशा भोसले यांची सर्वच गाणी दर्जेदार. त्यामुळे त्यातील ‘निवडक आशा’ असं ठरवायचं कसं? ‘नया दौर ‘( १९५७) मधील मोहम्मद रफींसोबतचे उडे जब जब जुल्फे तेरी आणि साथी हाथ बढाना, ‘पेईंग गेस्ट’ (१९५७) मधील किशोरकुमारसोबतचे छोड दो आंचल, ‘काला पानी’ (१९५८) मधील मोहम्मद रफींसोबतचे अच्छा जी मै हारी, ‘चलती का नाम गाडी’ (१९५८) मधील किशोरकुमारसोतचे हाल कैसा है जनाब का, ‘नवरंग’ (१९५९)मधील महेंद्र कपूरसोबतचे आधा है चंद्रमा रात आधी, ‘सुजाता’ (१९५९) मधील काली घटा छाये मोरा, ‘बम्बई का बाबू’ (१९६०) मधील देखने मे भोला है, साहिब बीवी और मकान (१९६२) भंवरा बडा नादान है, ‘मुझे जीने दो’ (१९६३)मधील नदीनाले न जाओ शाम, ‘काश्मिर की कली’ (१९६४) मधील रफींसोबतचे इशारो इशारो मे दिल लेनेवाले, ‘हरे राम हरे कृष्ण’ (१९७२) मधील दम मारो दम, प्राण जाए पर वचन न जाए’ (१९७४) मधील चैन से हमको कभी जीने ना दिया… हा सोनेरी खजिना असाच आणखीन वाढणारा आहे. अभिनेत्री अनेक, आवाज मात्र एक आणि तोदेखील त्या अभिनेत्रींचा वाटावा हे कसब व कौशल्य. मराठी चित्रपट गीतांचा नजराणा वेगळाच. बरं, गाणी अनेक मूडची आणि व्यक्तिमत्वाची आणि त्यात आवाज एकच, आशा भोसले. काही गुणीजणांबाबत सांगावे, बोलावे, ऐकावे तेवढे थोडेच. आशा भोसले चित्रपट संगीताच्या सुवर्ण काळापासून ते आजच्या रीमिक्स युगांपर्यंतचा आवाज. रीमिक्सचा गोंधळ त्यांना मान्य नाही. त्यापेक्षा त्यांनीच आपल्या काही जुन्या गाण्यांना नव्याने गात (मेरे सोना रे सोना) स्वतः आनंद घेतला आणि तो इतरांनाही दिला. तोच त्यांचा स्वभाव. तोच त्यांचा आनंद.
आशा भोसले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा…
– दिलीप ठाकूर