‘मन सैरभैर मात्र…’ हा कवयित्री लता गुठे यांचा कवितासंग्रह. शब्दांशी प्रेम जडलं की त्याचा नाद लागतो. हा नादखुळा कवितेला जन्म देतो. मनातल्या तरल हळव्या भावना, संवेदना मग व्यक्त होतात कवितेच्या वेगवेगळ्या रूपांतून. कधी गझल, कधी मुक्तछंद तर कधी कवी कल्पनेचं घर शब्द, प्रतिमांच्या रूपकांचं गोंदण कवितेच्या अंगावर सजवतं.
या कवितासंग्रहात असंच काहीसं आहे, लता गुठे यांच्या अनेकविध स्वरूपाच्या अनुभूतींचा मुक्तआविष्कार हा संग्रह वाचताना प्रत्ययास येतो.. कवितांनुरूप त्यामधील प्रतिमा, प्रतीकं बदलत जाताना दिसतात.
मनाच्या अंगणात
सांज रेंगाळू लागताच
ती सजवत राहते
आतल्या बाहेरच्या जखमांना
मोगऱ्याच्या पांढऱ्या शुभ्रफुलांनी
तेव्हा…
भास होतो तिला
जखमा सुगंधी झाल्याचा
संपूर्ण कविता संग्रहात प्रेम, विरह, श्रृंगार यांच्या तरल, हळव्या भावनांपासून ते थेट स्त्रीवादी अशा स्पष्ट विचारांपर्यंत मनाची आंदोलनं कविता वाचताना जाणवतात. स्त्री म्हणून, माणूस म्हणून एकाच वेळी हतबलतेची जाणीव आणि मनोनिग्रहाची शक्ती त्यांच्या कवितेत दिसते. ‘पुस्तक’ या कवितेतही हतबलता मांडताना त्या लिहितात-
‘आतल्या आत उद्धवस्त होत
एक दिवस तू म्हणालास,
“माझं आयुष्य म्हणजे…
एक अलिखित पुस्तक आहे
बघ…
तुला लिहिता येतंय का त्यावर काही?
मी विचार करून दमलोय
पण…
वेदना बाहेर येतच नाही
प्रस्तुत संग्रहातील कविता वाचत असताना भगवान श्रीकृष्ण, पंढरीचा विठ्ठल या भोवती घुटमळणारं कवयित्रीचं मन दिसतं. (संवाद, पृ. ३०). पुराण कथांमधील स्त्रियांवर झालेल्या अन्यायाबद्दल त्या ‘असंझालंअसतं’ या कवितेत उद्गारतात,
रामायण महाभारत
जर बाईने लिहिलं असतं
तर…?
चित्र काही वेगळंच असतं
राणीने सांभाळला असता राज्य कारभार
आणि राज्यही तिचचं असतं
तसेच
‘का नसतं’ या कवितेत त्या आजीला प्रश्न विचारून अनुत्तरीत करतात.
एक होती राणी. तिला दोन राजे
एक आवडता दुसरा नावडता…
आजीने ठेवलं बोट ओठावर आणि..
इकडे तिकडे पाहिलं
हळूच कुजबुजली कानात
हे काय तुला विपरीत सुचलं
असं कधी असतं का?
“का नसतं…?”
काही कवितांमध्ये कवयित्रीने नियती शरणता मान्य केली आहे. उदाहरणार्थ, माहेरची सिदोरी, नियती, प्राक्तन आदी. नियतीच्या संकेतानुसार आपण केवळ यंत्रमानव असलो तरी स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक राहात जगण्याचे सूर जुळवून घ्यायला हवेत. मात्र त्यासाठी दुसऱ्या कुणाच्या मदतीची अपेक्षा करणे चूक आहे (रहाट गाडगं, मनोनिग्रह, अन्त दीप भव या कविता) असा सल्लाही त्या देतात.
लता गुठे यांचा हा पाचवा काव्यसंग्रह. याआधी त्यांचे ‘जीवनवेल’, ‘मी आहे तिथे’, ‘पुन्हा नव्याने’ ‘जगण्याच्या आरपार’ हे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. लेख, कथा, गीतलेखन, बालसाहित्य, प्रवासवर्णन आदी साहित्यप्रकारांमध्ये त्यांनी मुसाफिरी केली आहे.
या कवितासंग्रहात त्यांच्या कवितेचा साधेपणा आणि सामाजिकभान प्रकर्षाने जाणवते. कविता संग्रहांत काही चित्रकवितांचाही समावेश आहे.
साहित्यिक डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे आणि लेखक गुरुनाथ तेंडुलकर या दोन सुहृदांना हा कवितासंग्रह त्यांनी अर्पण केला आहे. सुहास भागवत यांचे मुखपृष्ठही सुंदर आहे. अनेकविध स्वरूपाची अनुभूती देणारा हा कवितासंग्रह आहे.
प्रा. रघुनाथ शेटकर
raghunathshetkar0@gmail.com
……………………………….
मन सैरभैर मात्र…
कवी : लता गुठे
मुखपृष्ठ : सुहास भागवत
प्रकाशक : भरारी प्रकाशन, मुंबई
पृष्ठे : ९२, मूल्य : रूपये १३०/-






