Representative Image (Photo - Social Media)
Wardha News : यंदा पावसाळ्याच्या दिवसांत जिल्ह्यात अपेक्षेपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याचा परिणाम जलाशयांमधील पाणीसाठ्यावर झाला आहे. जिल्ह्यातील ११ मोठ्या व मध्यम जलाशयांत केवळ ६७ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत सर्वच जलाशय १०० टक्के भरलेले असताना यंदा मात्र पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक बनली आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यापूर्वीच जिल्ह्याला जलसंकटाचा सामना करावा लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
वर्धा जिल्ह्यात बोर, निम्न वर्धा, धाम, पोथरा, पंचधारा, डोंगरगाव, मदन, मदन उन्नई, लाल नाला, वर्धा कार नदी आणि सुकळी लघु असे एकूण ११ जलप्रकल्प आहे. या जलाशयांमधील पाणी शेती, पिण्याच्या पाण्याची गरज तसेच वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी महत्त्वपूर्ण ठरते. मात्र, यंदा पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने अनेक प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा निर्माण होऊ शकलेला नाही.
उपलब्ध आकडेवारीनुसार, बोर प्रकल्पात ६४.४४ टक्के, निम्न वर्धा प्रकल्पात ७०.२१ टक्के, धाम प्रकल्पात ६८.०७ टक्के, पोथरा प्रकल्पात ८०.३१ टक्के, पंचधारा प्रकल्पात ३६.८० टक्के, डोंगरगाव प्रकल्पात ५७.५५ टक्के, मदन प्रकल्पात २०.७० टक्के, मदन उन्नई धरणात १७.९३ टक्के, लाल नाला प्रकल्पात ७८.५४ टक्के, वर्धा कार नदी प्रकल्पात ६०.५८ टक्के, तर सुकळी लघु प्रकल्पात ५४.९२ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.
महाकाळी येथील धाम प्रकल्पाचे महत्त्व अधिक आहे. या प्रकल्पातून वर्धा शहरासह पिपरी मेघे आणि परिसरातील १४ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, या प्रकल्पातही अपेक्षित जलसाठा नसल्याने आगामी काळातील पाणी पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. गतवर्षी सर्व अकराही जलाशयांमध्ये ऑक्टोबर अखेरपर्यंत १०० टक्के उपयुक्त जलसाठा होता. यंदाच्या स्थितीशी तुलना करता पर्जन्यमानातील तूट किती परिणामकारक ठरली, हे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
जलाशयांत उपलब्ध जलसाठा नाममात्र असल्याने प्रशासनासह नागरिकांनीही आतापासून पाणी वापराबाबत नियोजन करणे आवश्यक आहे. पाण्याचा अपव्यय टाळणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि जलसंधारणाच्या उपाययोजनांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. अन्यथा उन्हाळ्यात पाणी टंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Ans: जिल्ह्यातील ११ मोठ्या आणि मध्यम जलप्रकल्पांमध्ये एकूण ६७ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध असल्याची माहिती आहे.
Ans: मदन उन्नई प्रकल्पात सर्वांत कमी म्हणजे १७.९३ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. त्यानंतर मदन प्रकल्पात २०.७० टक्के पाणीसाठा आहे.
Ans: महाकाळी येथील धाम प्रकल्पातून वर्धा शहर, पिपरी मेघे आणि परिसरातील १४ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.






