क्रिकेटनंतर क्रीडाक्षेत्रात भारताचा दबदबा असलेले जे क्रीडाप्रकार आहेत; त्यामध्ये बॅडमिंटन हा एक खेळ आहे. भारतीय खेळाडूंनी बॅडमिंटनमध्ये वेळोवेळी जगातील अव्वल खेळाडूंना हादरविले आहे; अनेक पदके जिंकली आहेत. गतसप्ताहातच चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज या पुरुष दुहेरीच्या जोडीने विश्व बॅडमिंटन संघटनेच्या वर्ल्ड सुपर (१०००) स्पर्धेचे दुहेरीचे विजेतेपद पटकाविले. सुपर वर्ल्ड सिरीजमध्ये या आधी या जोडीने उपांत्य फेरीपर्यंतच मजल मारली होती. मात्र यावेळी त्यांनी गतवर्षीच्या विजेत्या ॲरॉन चिआ आणि सो वूल इक या मलेशियन जोडीला हरविले. या जोडीचे विश्व सिरीज (१०००)चे पहिलेच विजेतेपद आहे.
दोन वर्षांपूर्वी बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकाविले होते. गतसाली थॉमस कप स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देताना पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकाविले होते. चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकी रेड्डी या जोडीचे यश अभूतपूर्व आहे. भारतीय बॅडमिंटन क्षेत्रात पुरुष दुहेरीत आतापर्यंत कुणालाही या उंचीपर्यंत पोहचता आले नाही. याचं श्रेय अर्थातच चिराग-सात्विक या जोडीला आहेच. पण या जोडीला एकत्र आणणाऱ्या प्रशिक्षकांनाही आहे. या जोडीने आपल्या अप्रतिम खेळाच्या बळावर बॅडमिंटन विश्वाताली अनेक दिग्गज जोड्यांना पराभूत केले होते. मला सुवर्णपदक किंवा अंतिम फेरीत, विजेतेपदाच्या जवळ पोहचूनही त्यांना यश मिळत नव्हते. त्यांना ही अडथळ्याची शर्यत पार कशी करायची हे शिकविणाऱ्या पुल्लेला गोपीचंद आणि परदेशी प्रशिक्षक मथायस बोए यांना आहे.
याआधी, म्हणजे ७-८ वर्षांपूर्वी चिरागचा जोडीदार वेगळा होता आणि सात्विकचा. त्यावेळी भारतीय खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी परदेशी प्रशिक्षक आणण्यात आले होते. त्या प्रशिक्षकांनी या दोघांना एकत्र आणले. यांचा खेळ पाहून त्यांनी ही नवी जोडी बांधली. तेव्हापासून यांनी आपल्या खेळाचा आलेख सतत उंचावत नेला. खरं तर चिराग २५ वर्षांचा आहे आणि सात्विक २२ वर्षांचा. त्यांच्यापुढे उमेदीची अनेक वर्षे आहेत. त्यामुळे या जोडीकडून भारताला अनेक आंतरराष्ट्रीय पदके अपेक्षित आहेत. या अपेक्षापूर्तीचे श्रेय सरकारने त्यांना पुरविलेल्या सुविधांना द्यावे लागेल. त्यांना दर्जेदार परदेशी प्रशिक्षक, फिजिओ, चांगले मॅस्युअर देण्याचे भारतीय बॅडमिंटन संघटनेचे प्रस्ताव मंजूर करणाऱ्या यंत्रणेला द्यावे लागेल. आज इंडोनेशियन स्पर्धेतील यशानंतर चिराग-सात्विक जोडी जागतिक क्रमवारीत चक्क तिसऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचली आहे. ८ वर्षांची दोघांची एकत्र केलेली मेहनत आता कुठे फळाला येत आहे.
खरं तर बॅडमिंटन या खेळात मलेशिया, इंडोनेशिया, चीन, कोरियन, डेन्मार्क, काही युरोपीयन देशातील खेळाडूंचे वर्चस्व आणि दबदबा आहे. या देशांच्या खेळाडूंचा एकेरीतील स्पर्धकांचाच वेग एवढा भन्नाट असतो की ‘शटल’ नजरेलाही दिसत नाही. दुहेरीत ‘रॅलीज’ पुष्कळ लांबतात. अशा स्पर्धेत भारतीय खेळाडू टिकणे कठीण आहे. म्हणूनच चिराग- सात्विक जोडीचे यश अधिक मोठे आहे. सात्विक-चिरागच्या यशाचे श्रेय गोपीचंद यांनाही जाते.
सात्विकने बॅडमिंटनचे धडे त्यांच्याच ॲकॅडमीत शिकविले होते. चिराग शेट्टी महाराष्ट्राचा. महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेने चिरागला पुढे जाण्यास मदत केली असे; भारताचे माजी बॅडमिंटनपटू आणि पदाधिकारी, प्रशिक्षक आणि व्यवस्थापक तसेच निवड समितीवर भूमिका बजावलेले प्रदिप गंधे सांगत होते. चिरागमधील गुणवत्ता पाहून महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेने त्यांना स्वखर्चाने एक महिन्याच्या बॅडमिंटन सरावाला इंडोनेशियाला पाठविले होते. त्यावेळी चिराग ज्युनियर खेळाडू होता. भारताच्या सराव चमूत त्याची निवड झाली नव्हती. म्हणून महाराष्ट्र संघटनेने स्वत: खर्च करून चिरागला तेथे पाठविले होते.गंधे अभिमानाने सांगत होते, “ते शिबीर संपले आणि त्यानंतर तेथे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ती चिरागने जिंकल्याची बातमी कळताच महाराष्ट्र संघटनेला चिरागचा सार्थ अभिमान वाटला होता.
दस्तुरखुद्द प्रदिप गंधे हे देखील दुहेरीचेच खेळाडू. त्यांनी १९८२ च्या दिल्ली एशियाडमध्ये लेरॉय डिसासोबत दुहेरीत भाग घेऊन भारताला पुरुष दुहेरीचे आणि सांघिक अशी दोन कांस्य पदके जिंकून दिली होती. प्रदिप गंधे यांनी पार्थो गांगुलीसोबत दुहेरीत खेळताना थॉमस कपच्या अंतिम फेरीत मजल मारली होती व कांस्य पदकही मिळविले होते.
या प्रदिप गंधेचा दुहेरीचा अनुभव दांडगा आहे. ते म्हणत होते; चिराग आणि सात्विक ही जोडी या प्रकारासाठी एक योग्य समन्वय साधणारी जोडी आहे. या जोडीतला मोठा भाऊ आहे चिराग. सात्विक उंचपुरा, धिप्पाड आहे. तो अधिक उंचावरून शटल स्मॅश करू शकतो. एकाचा बचाव भक्कम तर दुसऱ्याचे धारदार आक्रमण. दुहेरीमध्ये तर श्वास घ्यायलाही वेळ मिळत नाही. कारण शटल फार काळ हवेत रहातच नाही. अशावेळी दमछाक राखणे महत्त्वाचे असते. त्यासाठी दोघांमध्ये ताळमेळ चांगला असणे महत्त्वाचे असते. कुणी पुढे शटल घ्यायचे आणि कुणी मागचे ते एकत्र व सातत्याने खेळल्यास साध्य होते. ते चिराग-सात्विक यांना चांगलेच चमले आहे. प्रतिस्पर्धी देखील तुमचा अभ्यास करूनच उतरतात. तुमच्यातील आक्रमक खेळाडूला आक्रमणाची संधीच देत नाहीत. त्याला रोखतात, ‘ब्लॉक’ करतात. अशावेळी तुमचा जोडीदार तुमच्यासाठी मदतनीस सिद्ध होऊ शकतो. बचावात्मक भूमिकेतून तो आक्रमकाच्या भूमिकेत येऊ शकतो. हीच गोष्ट दुसऱ्या खेळाडूंच्याबाबतीत अशीच घडते. चिराग-सात्विक ही जोडी आज जगात पुढे आहे; त्याचे हेच प्रमुख कारण आहे. दोघांचीही कोर्टवरची भूमिका एकमेकांना पूरक अशी आहे. चिराग आणि सात्विक यांच्याबाबतीत एक गोष्ट निर्णायक ठरली आहे. दोघांनीही एकेरीच्या मोहात न पडण्याचा निर्णय घेतला आहे. याचे कारणही दुहेरीवर अधिक लक्ष केंद्रित करणे हेच होते. त्या त्यागामुळेच या दोघांना दुहेरीत यश मिळत आहे.
चिराग व सात्विक यांच्या बाजूने वय आहे. त्यांना एवढ्या लहान वयातच यश मिळाले आहे. गतसाली टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत दुहेरीचे सुवर्णपदक पटकाविणाऱ्या जोडीला फक्त चिराग-सात्विक जोडीनेच पराभूत केले होते. अंतिम चौघात येण्याचे त्यांचे प्रयत्न थोडक्यात अपुरे पडले होते. आता मात्र वर्षभरात त्यांच्या गाठीशी आणखी अनुभव जमा झाला आहे. उदाहरणच द्यायचे तर तब्बल आठवेळा पराभूत झालेल्या जोडीला हरवूनच त्यांनी गतसप्ताहात इंडोनेशियन वर्ल्ड सिरीज (१०००) स्पर्धा जिंकली. अंतिम रेषा पार करणे त्यांना आत्ता जमायला लागले आहे.
– विनायक दळवी
vinayakdalvi41@gmail.com