अहमदाबादचा हा साबरमती आश्रम म्हणजे अनेक लहान मध्यम झोपडीवजा कुटयांच्या समुह आहे. या समुहाच्या मध्यभागी महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांचे निवास असलेली ‘हृदयकुंज’ ही कुटी आहे. या कुटीत १९१७ ते १९३० पर्यंत म्हणजे तेरा वर्ष त्यांचा मुक्काम होता. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाचा साबरमती आश्रम केंद्रबिंदू होता. सत्याग्रह आणि आश्रमाच्या जीवनाची ही प्रयोग भूमी होती. त्या काळातली एक आधुनिक प्रयोगशाळाच होती. स्वराज्य, संघर्ष आणि आणि लोकशिक्षणाची नवीन पिढी या आश्रमात तयार झाली. कुठेही आधुनिकतेचा स्पर्श अजुनपर्यंत आश्रमाला झालेला नाही. बहुतेक कुट्या आसपासच आहेत. अत्यंत साध्या आणि प्राथमिक राहणीमानाच्या वास्तव्याच्या प्रत्येक कुटीला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. कारण देशातल्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेत्यांचे महात्मा गांधींसहित येथे वास्तव्य होते. २१ वर्ष दक्षिण आफ्रिकेत राहुन व अनेक आंदोलने करून ते १९१५ कायमचे भारतात आले.
आश्रम स्थापनेच्या वेळेस महात्मा गांधी हे बिहारमधल्या चंपारण येथील ‘निळी’च्या शेतीच्या सत्याग्रहात व्यस्त होते. तत्पूर्वी अहमदाबादचे उपनगर असलेल्या ‘कोचरब’ येथे महात्मा गांधी यांचे मित्र बॅरिस्टर जीवनलाल देसाई यांच्या घरी किरायाने गांधीजींनी पहिला ‘सत्याग्रहाश्रम’ २५ मे १९१५ ला सुरू केला. ‘सत्याच्या आग्रहावर चालणारा आश्रम’ म्हणून आणि सेवा व सेवेची पद्धती याचे दर्शन या नावात होत असल्याने सर्वानुमते हे नाव आश्रमाला देण्याचे निश्चित झाले. त्या वेळेस आश्रमात सुरवातीला २५ लोक होते आणि त्यापैकी १३ लोक हे तामीळ होते. सर्वांचे एकत्रित कुटुंब होते आणि एकत्रित जेवण होते. पुढे गांधीजींना शेती, पशुपालन, ग्रामोद्योग असे अनेक प्रयोग करावयाचे असल्याने जागा कमी पडायला लागली आणि हा कोचरबचा आश्रम १७ जून १९१७ ला साबरमतीच्या नदी किनारी स्थानांतरीत करण्यात आला. या आश्रमाला सत्याग्रहश्रम, गांधी आश्रम आणि हरिजन आश्रम असेही म्हटल्या जाते.
आश्रमाच्या मधोमध असलेले गांधीजींचे ‘हृदय कुंज’, विनोबा भावे यांचे ‘विनोबाकुटीर’, त्यांची इंग्रज शिष्या मेडली एन स्लॅड उर्फ मिराबेन यांचे ‘मिराकुटीर’, मगनलाल गांधी यांचे ‘मगन निवास’, अतिथिगृह ‘नंदिनी’, आणि सकाळ सायंकाळची प्रार्थनाभूमी याच प्रामुख्याने उल्लेख करता येईल. या संपूर्ण आश्रमाचे शिल्पकार हे महात्मा गांधी यांचे पुतणे मगनलाल गांधी असून तेच या आश्रमाचे व्यवस्थापकीय संचालक होते. महात्मा गांधी यांचा डेस्क, चष्मा, खादीचा कुर्ता, अनेक पत्रे बघायला मिळतात. या आश्रमात खादी, सुतकताई, ग्रामोद्योग, गोपाळन, सफाई आणि शिक्षा, अस्पृश्यता निवारण, हरिजनांना प्रवेश आणि स्वातंत्र्याचे रणशिंग, आंदोलन यावर भर दिला जाई. प्रत्येक कुटी बघताना आपण त्या काळात नकळत जातो आणि मन सुन्न होते.
महात्मा गांधी यांनी वापरलेल्या आणि दैनिक उपयोगाच्या अनेक वस्तु बघायला मिळतात. विनोबा भावे स्वत: नदी वरुन पाणी आणून येथील कुटीत ठेवत असत. ती जागा, भांडे अजुनही जपून ठेवली आहे. आश्रमाच्या जीवन पद्धती मध्ये सकाळ आणि संध्याकाळच्या प्रार्थनेला विशेष महत्व होते. विविध धर्माच्या अनेक प्रार्थना येथे म्हटल्या जात असत. आकाशाच्या सानिध्यात, प्रसन्न वातावरणात, खुल्या जागेवर जमिनीवर बसून आणि कुठलीही मूर्ती समोर न ठेवता या प्रार्थना महात्मा गांधी यांच्या उपस्थितीत होत असत. शास्त्रीय संगीताचे दिग्गज पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य असलेले पंडित नारायण मोरेश्वर खरे हे आश्रमवासी बनले आणि त्यांनी संगीतासोबत भजन आणि प्रार्थनेची जबाबदारी घेतली. पुढे त्यांनी अनेक भजनावलीचे संपादन केले. येथे बालकांचे भोजनालय असून १५ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय आश्रमाने येथे केली आहे. या वातावरणात विद्यार्थ्यांची किलबिल मनाला खुप आनंद देऊन जाते.
मोठे ग्रंथालय, गांधी साहित्याचे विक्री केंद्र आणि आकर्षक संग्रहालय येथे असून त्यात चरख्याचे आणि खादीचे विविध प्रकार बघायला मिळतात. चौकोनी मातीचे आंगण असलेल्या प्रार्थना स्थळावर भेट दिली असता आजही अनेक लोक मौनव्रत धारण करून आणि प्रार्थना करत बसलेले दिसले. सुविचारांचे अनेक फलक लक्ष वेधुन घेतात. लेखकाने परिचय दिल्यानंतर येथे कार्यरत असलेल्या कस्तुरीभाई आणि श्यामभाई या गांधी सेवकांनी आम्हाला जवळपास अडीच तास या आश्रमाची सखोल माहिती देऊन संपूर्ण आश्रम दाखविला आणि प्रत्येक कुटीरचा इतिहास आणि त्यात वास्तव्य करणार्या महान पुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्या काळात आम्ही हरखून गेलो. थोडक्यात साध्या सरळ राहणीमानाचा त्या काळातला उच्च आदर्श साबरमती आश्रमात बघायला मिळतो.
आश्रम स्थापनेच्या वेळेस येथे फक्त कॅनव्हासचा आडोसा आणि टिनाच्या पत्राचे स्वयंपाक घर होते. १९१७ च्या वर्षा अखेर मोकळ्या जागेत आणि झाडांच्या सावलीत चाळीस लोकांचा परिवार होता. सत्य, अहिंसा आत्मससंयम, विराग आणि समानता या सिद्धांतावर आधारित महात्मा गांधी यांनी साधे जीवन जगण्याचा एक महान प्रयोग या आश्रमात सुरू केला होता. ते सर्वांचे ‘बापू’ झाले. बापू ही पदवी त्यांना सुभाषचंद्र बोस यांनी दिली. हा प्रयोग म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक क्रांति या विषयाचे महात्मा गांधी संकल्पनेतुन प्रत्यक्षात साकारलेल्या अहिंसात्मक असहयोगाचे ते प्रतीक होते. या काळात गांधीजींनी असहकाराच्या पहिल्या राष्ट्रव्यापी आंदोलनाचे नेतृत्व केले आणि ‘सत्याचे प्रयोग’ ही आत्मकथा लिहली. इंग्रज सरकारने १९२२ मध्ये गांधीजींवर राजद्रोहाचा आरोप लावला आणि गांधीजींना सर्वप्रथम वयाच्या ५३ व्या वर्षी कारावासाची शिक्षा झाली. साबरमती जेलमधून त्यांना पुण्याच्या ‘येरवडा’ जेलमध्ये पाठविण्यात आले. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांना शेवटचा कारावास घडला.
१२ मार्च १९३० ला साबरमती आश्रमातून महात्मा गांधी यांनी ऐतिहासिक जगप्रसिद्ध ‘दांडी यात्रा’ सुरु केली आणि स्वातंत्र्य मिळेपर्यंत आश्रमात परतणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली. या शीर्षस्थ यात्रेने सारा भारत देश उजळून निघाला. इंग्रजांनी लावलेल्या मिठाच्या कराविरुद्धचा ऐतिहासिक ‘दांडीयात्रा’ हा सत्याग्रह होता. सुरवातीला यात्रे केवळ ७८ सत्याग्रही होते. ही दांडीयात्रा रोज १५/१६ किलोमीटर चालायची. ३८५ कि.मी. चे अंतर कापून २५ दिवसांनी दक्षिण गुजरातच्या समुद्रतटावर वसलेल्या ‘दांडी’ येथे पन्नास हजार लोकांची यात्रा पोहोचली आणि त्यांनी नियम मोडला. चारवेळा दक्षिण आफ्रिकेत आणि आठ वेळा भारतात महात्मा गांधी यांच्या हत्येचा प्रयत्न झाला. ‘बापूंचा महात्मा’ झालेला असा हा साबरमती आश्रम. आजही आपण महात्मा गांधी यांच्या सानिध्यात वावरत असल्याचा येथे भास होतो.
– श्रीकांत पवनीकर






