Chandrapur News: गॅस संपला, केरोसिन मिळाले... पण जाळायचे कसे? स्टोव्ह नसल्याने नागरिकांसमोर नवा पेच
Raigad News: जिल्हा परिषदेत अध्यक्षपद ठरलं; आता ‘मलाईदार’ खात्याकडे सर्वांचे लक्ष
युद्धामुळे राज्यात एलपीजी गॅस टंचाई निर्माण झाली. मात्र शासन टंचाई नसल्याचे भासवित असले तरी नागरिक पहाटेपासूनच गॅस एजंसीसमोर रांगा लावत असल्याचे दृष्य निदर्शनास येत आहे. युद्ध केव्हा संपेल व एलपीजी गॅस वितरणाची परिस्थिती केव्हा पूर्वपदावर येईल, हे अद्यापही अनिश्चित आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रेशन दुकानातून पात्र शिधापत्रिकाधारकांना पुन्हा केरोसिन पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत दरमहा प्रती शिधापत्रिका ३ लिटर केरोसिन अनुज्ञेय असेल आणि हे वितरण विशेषतः ग्रामीण व निमशहरी भागात प्राधान्यक्रमाने केले जाणार आहे.
कोविड महामारी सुरू झाल्यापासून २०१९ मध्ये केरोसिन पुरवठा पूर्णपणे बंद झाल्यानंतर घरातील स्टोव्ह आणि शेगड्या अडगळीत गेल्या किंवा भंगारात निघाल्या. आता बाजारपेठेतही हे साहित्य सहज उपलब्ध नाही. त्यामुळे रॉकेल मिळाले तरी ते जाळण्यासाठी लागणारे साधन कोठून खरेदी करावे, असा प्रश्न सर्वांना सतावत आहे.
रेशन दुकानदारांमार्फत हे वाटप होणार असले, तरी त्यांच्याकडे सध्या केरोसिन साठवणुकीसाठी टाक्या किंवा मोजमापाची परिमाणे उपलब्ध नाहीत. साठवणुकीसाठी स्वतंत्र गोदाम किंवा खोली नसल्याने हे केरोसिन नेमके ठेवायचे कुठे, असा पेच दुकानदारांपुढे निर्माण झाला आहे.
प्रतिकुटुंब ३ लिटर केरोसिन एका महिन्यासाठी पुरेसे नाही. शिवाय, बाजारात स्टोव्ह किंवा शेगडी सहज उपलब्ध होईल की नाही, याबाबत शंकाच आहे. – प्रतिमा मेश्राम, गृहिणी, पिपर्धा
शासनाने केरोसिन पुरवठ्यासोबतच स्टोव्ह किवा शेगडीसुद्धा वाजवी किमतीत उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून नागरिकांची धावपळ थांबेल, सध्या बाजारात स्टोव्ह किंवा पंपाच्या शेगड्या उपलब्ध नसल्याने ग्राहकापुढेही पेच निर्माण झाला आहे.- सविता शेरकुरे, पळसगाव
चिमूर तालुक्याची ग्रामीण भागासाठी प्रतिकुटुंब ९५ हजार लिटरची मागणी आहे, ती पाठविली आहे. – प्रवीण वानखेडे, पुरवठा निरीक्षक, चिमूर






