काय आहे कॅशलेस आरोग्य विमा; जाणून घ्या फायदे? आणि कसा मिळतो रुग्णालयात उपचार!
अनपेक्षित परिस्थितीमुळे भरमसाठ वैद्यकीय खर्चाची स्थिती ओढवल्यास अनेकांच्या हृदयात धस्स व्हायला होते. अशावेळी ‘आरोग्य विमा’ काढलेला असेल तर अनेकांना मोठी आर्थिक मदत होते. या आरोग्य विम्यामध्ये वैद्यकीय खर्चात डॉक्टरांच्या भेटी, हॉस्पिटलमध्ये राहून घेतलेले उपचार, शस्त्रक्रिया, औषधे आणि प्रतिबंधात्मक सुश्रूषा या सारख्या कितीतरी विस्तृत सेवांचा समावेश असतो. ज्यामुळे ओढवलेले संकट तारून निघण्यास मोठी मदत होते. याच पार्श्वभूमीवर आज आपण कॅशलेस आरोग्य विम्याचे फायदे, त्याची प्रत्यक्ष कामकाजाची पध्दत किंवा नियमावली काय आहे? याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
काय आहे कॅशलेस आरोग्य विमा सुविधा?
कॅशलेस आरोग्य विमा सुविधा या नावाप्रमाणेच कॅशलेस क्लेममुळे पॉलिसीधारक उपचारादरम्यान येत असलेल्या खर्चाची भरपाई न करता विमा कंपन्यांच्या यादीत असलेल्या रुग्णालयामध्ये सहजपणे वैद्यकीय उपचार घेऊ शकतात. या सुविधेद्वारे विमाकर्ता कंपनी रुग्णालयातील खर्चाच्या बिलाची थेट पूर्तता करत असते. तर याउलट सामान्य आरोग्य विम्यामध्ये पॉलिसीधारक रुग्नांना आधी रुग्नालयाचे बिल भरून, ते विमा कंपनीला सादर करावा लागते. त्यानंतर त्यावरील खर्च संबंधित पॉलिसीधारक रुग्नास मिळतो.
(फोटो सौजन्य : istock)
कॅशलेस विम्याचे फायदे
१. त्वरित उपचार, अर्थसहाय्य
पॉलिसीधारकांना ज्यावेळी त्वरित उपचार आवश्यक असतात. त्यावेळी कॅशलेस सुविधेमुळे केवळ त्वरित उपचारच मिळत नाही तर कंपनीकडून थेट वैद्यकीय खर्चाचा भार देखील उचलला जातो. त्यामुळे कुटुंबावरिल आर्थिक भाराचा मोठा बोजा आपोआप कमी होतो.
२. रुग्णालयांची निवड
विमाधारक कंपनी सामान्यत: देशभरातील रुग्णालयांच्या विस्तृत साखळीशी जोडलेली असते. त्यामुळे पॉलिसीधारकांना त्यांच्या वैयक्तिक उपचारांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधांमधून निवड करण्याची संधी मिळते. तसेच त्यांना उत्तम रितीने उपचार घेत संकटावर मात करता येते.
३. मागणीनुसार कॅशलेस सुविधा
काही विमाधारक कंपन्या पॉलिसीधारकांना त्यांना हव्या असलेल्या कोणत्याही रुग्णालयात कॅशलेस उपचाराची परवानगी देतात. पॉलिसीधारकाने निवडलेले रुग्णालय विमा कंपनीच्या यादीत असले किंवा नसले तरीही रुग्णालय निवडीचे स्वातंत्र्य दिले जाते.
४. मानसिक स्थैर्य टिकविण्यास होते मदत
उपचाराचा खर्च विमा कंपनीकडून थेट उचलला जाणार असल्याचे माहित असल्याने विमाधारकाला मानसिक शांतता मिळण्यास मदत होते. त्यामुळे त्यास आर्थिक बाबींची चिंता कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे रुग्नांना उत्तम उपचार घेणे आणि शारीरिक तंदुरूस्ती पुन्हा मिळवणे यावर लक्ष केंद्रित करता येते.
दरम्यान, कोणत्याही सेवेचा लाभ घेताना नियम असतात. त्याचप्रमाणे कॅशलेस सुविधेचा लाभ घेण्यासाठी विशिष्ट पध्दतीचा अवलंब करावाच लागतो. कॅशलेस सुविधेचा लाभ घेण्यासाठी पुढीलप्रमाणे मार्गदर्शक तत्वांचे पायरीनुरूप अनुकरण करावे लागते.
१. पहिली पायरी : आरोग्य विमा पॉलिसी आणि या पॉलिसीअंतर्गत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांची माहिती जाणून घेणे. पॉलिसीत उतरविलेल्या विम्याची रक्कम, पॉलिसीत समाविष्ट असलेल्या सुविधा, वगळलेल्या सुविधा, पॉलिसी सुरु झाल्यानंतर लाभासाठीचा प्रतिक्षा कालावधी, पॉलसीत असलेल्या उपमर्यादांबाबतच्या अटी ही सर्व तांत्रिक माहिती बारकाईने समजून घेणे ही पहिली आणि अतिशय महत्वाची पायरी आहे.
२. दुसरी पायरी : उपचाराआधी पुर्व परवानगी प्रक्रिया सुरू करण्यासाठी रुग्णालय /टीपीए (तृतीय पक्ष प्रशासक) यांना पॉलिसीचा तपशील सादर करणे. रुगणालयामधील इन्शुरन्स विभाग/टीपीएकडे तुमचे आरोग्य विमा कार्ड आणि ओळखीचे पुरावे दाखल करा. आपत्कालीन स्थितीत रुग्णालयात भरती व्हावे लागल्यास उपचार देत असलेले रुग्णालय संबंधित विमा कंपनीला कॅशलेस उपचारासाठी विनंती करून अधिकृतरित्या ही पूर्व प्रक्रिया त्यांच्या पातळीवर सुरू होते.
३. तिसरी पायरी : विमा कंपनीकडून मंजुरीची पुष्टी मिळण्यासाठी प्रतिक्षा करा. विमा कंपनी पूर्व-परवानगीसाठी विनंतीची पडताळणी करते. मंजुरी मिळाल्यावर, पॉलिसीधारकाला विनंती मंजुरीबाबतची माहिती मिळत जाते आणि रग्णालय पॉलिसीधारकावर उपचारास प्रारंभ करु शकते. अशी माहिती मॅग्मा एचडीआय जनरल इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ राजीव कुमारस्वामी यांनी दिली आहे.