mRNA vaccine cancer : रशियाची मोठी घोषणा कॅन्सरवर प्रभावी ठरणारी लस लवकरच बाजारात आणणार; वापरासाठी सज्ज ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
mRNA vaccine cancer : जगभरातील लाखो रुग्णांना वर्षानुवर्षे छळणाऱ्या कर्करोगाविरुद्ध आता आशेचा नवा किरण दिसत आहे. रशियाच्या शास्त्रज्ञांनी mRNA-आधारित कर्करोग लस विकसित केल्याचा दावा केला असून, ही लस क्लिनिकल वापरासाठी सज्ज असल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले आहे. रशियाची फेडरल मेडिकल अँड बायोलॉजिकल एजन्सी (FMBA) हिने याबाबत मोठी घोषणा केली आहे. FMBA च्या प्रमुख वेरोनिका स्कव्होर्त्सोवा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लसीने प्री-क्लिनिकल चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून या लसीची काटेकोर तपासणी करण्यात आली आणि सुरक्षितता तसेच परिणामकारकतेच्या दृष्टीने समाधानकारक निष्कर्ष समोर आले आहेत.
ही लस खास mRNA तंत्रज्ञानावर आधारित आहे. प्रत्येक रुग्णाच्या वैयक्तिक आरएनए प्रोफाइलनुसार ती कस्टमाइज केली जाईल. म्हणजेच प्रत्येक रुग्णासाठी ही लस वैयक्तिक पातळीवर तयार केली जाणार आहे, ज्यामुळे त्याचा परिणाम अधिक प्रभावी होईल. चाचण्यांमध्ये असे दिसून आले की, ही लस ट्यूमरचा आकार ६०% ते ८०% पर्यंत कमी करण्यात यशस्वी ठरली आहे. एवढेच नव्हे तर ट्यूमरची वाढ मंदावण्यातही ती सक्षम ठरली आहे. हे निष्कर्ष कर्करोग संशोधन क्षेत्रासाठी ऐतिहासिक मानले जात आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iryna Zartuska : अमेरिकेत युक्रेनियन निर्वासित इरीना जरतुस्का हत्येमुळे वाद; सुरक्षिततेसाठी आलेल्या भूमीवरच तिचा दुर्दैवी अंत
रुग्णांसाठी ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्कव्होर्त्सोवा यांनी स्पष्ट केले. वारंवार वापरूनही त्यात कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसले नाहीत. हे वैशिष्ट्य कर्करोगासारख्या गंभीर आजारावरील उपचारांना नवे युग देऊ शकते.
सुरुवातीला ही लस कोलोरेक्टल कर्करोग (आंत्राचा कर्करोग) रुग्णांसाठी विकसित करण्यात आली आहे. परंतु त्याचवेळी ग्लिओब्लास्टोमा (मेंदूचा कर्करोग) आणि मेलेनोमा (त्वचेचा कर्करोग) यांच्यासाठीही लस तयार करण्याचे संशोधन सुरू आहे आणि ते आता प्रगत अवस्थेत आहे.
FMBA ने यावर्षीच्या उन्हाळ्यातच रशियन आरोग्य मंत्रालयाकडे या लसीच्या मंजुरीसाठी अर्ज सादर केला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर ती रुग्णांच्या प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध होईल. मात्र, ही लस रशियाबाहेर इतर देशांमध्ये कधी उपलब्ध होईल, याबद्दल अद्याप निश्चित माहिती दिलेली नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Balochistan Blackout : बलुचिस्तानमध्ये एका महिन्यात तिसऱ्यांदा इंटरनेट बंद; काहीतरी मोठी योजना आखत आहे मुनीर सेना?
जगभरातील लाखो कर्करोग रुग्णांसाठी ही लस आशेचा नवा किरण ठरू शकते. आतापर्यंत कर्करोगाच्या उपचारांमध्ये शस्त्रक्रिया, केमोथेरपी किंवा रेडिएशन या पद्धती वापरल्या जात होत्या. त्यात रुग्णाला तीव्र वेदना, दुष्परिणाम आणि मानसिक तणाव सहन करावा लागत होता. मात्र, ही नवी लस त्या सगळ्यांपेक्षा वेगळी आणि क्रांतिकारी ठरू शकते. वैज्ञानिकांच्या मते, जर या लसीला लवकरच मंजुरी मिळाली, तर कर्करोग उपचारांच्या क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होईल. ही लस रुग्णाला जीवनदान देणारी ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.