Devendra Fadnavis and Eknath Shinde (Photo Credit- X)
मुंबई: अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मुंबईतील ऐतिहासिक गिरगाव चौपाटीवर आयोजित गणेश विसर्जनाच्या भव्य सोहळ्याने परदेशी पर्यटकांना भुरळ घातली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही यावेळी विशेष दालनाला भेट देऊन बाप्पाची आरती केली. या सोहळ्यात मॉरिशस, कोरिया, अमेरिका, थायलंड, जपान आणि दक्षिण आफ्रिका अशा विविध देशांमधून आलेल्या पर्यटकांनी सहभाग घेतला.
पर्यटकांनी केवळ विसर्जन मिरवणूकच पाहिली नाही, तर त्यांनी गणरायाची पूजा केली, आरतीत सहभाग घेतला आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष केला. पारंपारिक महाराष्ट्रीय वेशभूषेत, ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात हे पर्यटक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात पूर्णपणे रमून गेले.
या उत्सवाचे साक्षीदार ठरलेल्या एका परदेशी पर्यटकाने आपले अनुभव सांगितले. “हा सोहळा फक्त एक उत्सव नाही, तर श्रद्धा, एकता आणि आनंदाचा संगम आहे. लाखो लोक एकाच स्वरात जयघोष करताना पाहून अंगावर रोमांच उभे राहिले,” असे तो म्हणाला. अनेक पर्यटकांनी गणपतीच्या मूर्तींसोबत छायाचित्रे काढून हे अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्यात कैद केले. महाराष्ट्र पर्यटन विभागाने पर्यटकांना गणेशोत्सवाचे महत्त्व समजावून सांगितले, ज्यामुळे त्यांना या सोहळ्याच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पैलूंची माहिती मिळाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गिरगाव चौपाटी, मुंबई येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) गणरायाची आरती करत, आशिर्वाद प्राप्त केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचा महामंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.@Dev_Fadnavis @HelloMTDC#Maharashtra #DevendraFadnavis… pic.twitter.com/A1iERKv98q
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 6, 2025
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारस्याचा अविभाज्य भाग आहे. परदेशी पर्यटकांना या उत्सवात सहभागी करून घेणे, हा आपल्या परंपरांचा जागतिक पातळीवर प्रसार करण्याचा एक सशक्त प्रयत्न आहे. यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवी उभारी मिळेल आणि आपल्या सांस्कृतिक वैभवाची ख्याती जगभरात पोहोचेल, असे पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे. तर, आम्ही पर्यटकांसाठी एक असे व्यासपीठ निर्माण केले, जिथे ते या उत्सवाचा थेट अनुभव घेऊ शकले. अशा उपक्रमांमुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक दृढ होईल, असे पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ.अतुल पाटणे यांनी म्हटले आहे.
पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील म्हणाले, आमच्या विशेष दालनामुळे पर्यटकांना केवळ मिरवणूक पाहण्याचीच संधी मिळाली नाही, तर ते गणेशोत्सवाच्या खऱ्या भावनेशी जोडले गेले. त्यांनी दाखवलेला उत्साह आणि प्रेम पाहून आम्ही प्रेरित झालो आहोत. ढोल-ताशांच्या गजरात, भक्तिमय वातावरणात आणि गणरायाच्या निरोपाच्या हृदयस्पर्शी क्षणात सहभागी होऊन या पर्यटकांनी महाराष्ट्राच्या आतिथ्यशील संस्कृतीचा अनुभव घेतला. हा अनुभव त्यांच्या मनात आयुष्यभर कोरला जाईल.